By  
on  

Birthday Special: हटके सिनेमांची वाट चोखाळणारा ‘चितचोर’ अभिनेता

अमोल पालेकर यांचं नाव डोळ्यसमोर येताच अनेक हटके सिनेमांची यादी डोळ्यासमोर येते. आज त्यांचा वाढदिवस आहे. भारतीय सिनेमांच्या 70-80च्या दशकात हिरोंची इमेज ‘लार्जर दॅन लाईफ’ अशी असताना कॉमन मॅनची व्यक्तिरेखा साकारणं हे धाडस होतं. पण अमोल पालेकर यांच्या अदाकारीने या नायकाला प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनवलं. ‘शांतता कोर्ट चालू आहे’, तुच माझी राणी या मराठी सिनेमात काम केल्यानंतर त्यांनी हिंदी सिनेमांकडे मोर्चा वळवला.

70 च्या दशकात जिथं एका वेळी दहा माणसांना मारणा‌-या, हिरॉईनसोबत झाडांमागे नृत्य करणा-या नायकांची चलती होती. तिथे यापैकी रुढार्थाने कोणतंही हिरोटाईप मटेरियल नसलेल्या अमोल पालेकरांनी स्वत:ची जागा बनवली. रोज बसने ये जा करणारा, स्टॉपवरील मुलीकडे चोरून पाहणारा, बॉसची बोलणी खाणारा, कधी महानगरात स्वत:चं घर घेण्याची स्वप्न बघणारा नायक प्रेक्षकांना आवडला. ‘छोटीसी बात’, ‘रजनीगंधा’,’चितचोर’, ‘घरोंदा’, ‘गोलमाल’, ‘श्रीमान श्रीमती’ या सिनेमांनी अमोल यांना खास ओळख दिली. 

अभिनयात खास ओळख बनवल्यानंतर अमोल यांनी दिग्दर्शनातही स्वत:ची छाप पाडली. ‘थोडासा रुमानी हो जाये’, ‘बनगरवाडी’, ‘अनाहत’, ‘ध्यासपर्व’, ‘पहेली’, समांतर हे सिनेमे पाहताना त्यावरील अमोल पालेकर टच कायम जाणवतो. सुरुवात नाटकापासून केलेले अमोल पुन्हा एकदा रंग़भूमीकडे परतले आहेत. जवळपास 25 वर्षांनी ‘कसूर: द मिस्टेक’ या नाटकातून रंगभूमीवर येणार आहेत. संध्या गोखले यांनी या नाटकाच्या लेखन-दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या नाटकामध्ये एका निवृत्त एसीपी अधिका-याच्या भूमिकेत ते दिसणार आहेत. अमोल पालेकर यांना पीपिंगमून मराठीकडून वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा...

Recommended

PeepingMoon Exclusive