By  
on  

तर रंगबाज फिरसेच्या सेटवर स्पृहा जोशीसोबत झाला असता मोठा अपघात

अभिनेत्री स्पृहा जोशी रंगबाज या वेबसिरीजमध्ये झळकणार असल्याचं आम्ही तुम्हाला सांगितलं होतंच. आता पीपिंगमूनशी तिने या सेटवरील अनेक बाबी शेअर केल्या आहेत. स्पृहाने यावेळी तिच्यासोबत होऊ घातलेल्या अपघाताचा किस्सा शेअर केला आहे. ती म्हणते, ‘ आरामबाग भोपाळ येथील त्या दिवशी सेट असलेल्या ठिकाणी प्रचंड पाऊस होता. सगळीकडे कमरेएवढं पाणी आणि चिखल होता. मला तिथून चालत येणं अशक्य होतं. 

 

 

अशावेळी मला कोणीतरी सेटवर असलेल्या घोड्यांवरून येण्याचं सुचवलं. मी घोड्यावर थोडावेळ हायसं वाटलं. पण काही अंतरातच घोड्याचे पाय चिखलात रुतु लागले. त्यामुळे तो मला पाठीवरून फेकून देण्याचा प्रयत्न करू लागला. मी प्रचंड घाबरले होते. केवळ दैव बलवत्तर म्हणून मी त्या अपघातामधून वाचले.’ यावेळी तिने जिमी शेरगिलसोबत काम करण्याचा अनुभवही शेअर केला.

ती म्हणते, ‘ जिमी सरांसोबत काम करणं म्हणजे माझं लहानपणाचं स्वप्न पूर्ण झाल्यासारखं आहे. जिमीसरांना सेटवर काम करताना पाहणं एक वेगळाच अनुभव असतो. तो मला या निमित्ताने घेता आला.’ या वेबसीरिजमध्ये स्पृहा जोशी रुक्मिणी नावाची भूमिका साकारत आहे. ही वेबसिरीज 2018 साली आलेल्या 'रंगबाज' या वेबसिरीजचा सिक्वेल आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive