By  
on  

PeepingMoon 2019: हे वर्ष गाजवलं या मराठी सिनेमांनी, पाहा तुमचा आवडता सिनेमा आहे का यात

मराठी सिनेमा बदलतोय. त्याचा परीघ दिवसेंदिवस विस्तारत आहे. चोखंदळ मराठी प्रेक्षक अर्थातच हा बदल मनापासून स्विकारत आहे.     यावर्षीही मराठी सिनेमामध्ये अनेक नवनवीन प्रयोग केले गेले. त्यामुळे यावर्षी काही सिनेमे पीपिंगमून मराठीच्या टॉप टेन सिनेमांच्या यादीत आहेत. हे वर्ष अनेक विषयांवर बेतलेल्या सिनेमांचं उत्तम कोलाज होतं. त्यामध्ये बायोपिक, ऐतिहासिक सिनेमे, कौंटुंबिक सिनेमे या सगळ्यांचा समावेश असतो. पाहुयात कोणते आहेत हे सिनेमे....

आनंदी गोपाळ: हा सिनेमा ऐतिहासिक धाटणीचा बायोपिक होता. भारतातील भारतातील पहिल्या महिला डॉक्टर असलेल्या आनंदीबाई जोशी आणि गोपाळराव जोशी यांच्या जीवनाचा संघर्ष हा आनंदी गोपाळचा विषय आहे. सोशिक आनंदी बाईंची भूमिका भाग्यश्री मिलिंद आणि कर्तव्यकठोर गोपाळरावांची भूमिका ललित प्रभाकर यांनी साकारली आहे. 

 

ठाकरे: या वर्षातील बहुचर्चित बायोपिक म्हणजे ठाकरे. हिंदीमध्ये प्रदर्शित झालेला हा सिनेमा मराठीमध्ये डब केला गेला. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरें' सारख्या गरजणाऱ्या वाघाची रोखठोक वृत्ती, स्पष्टवक्तेपणा, आक्रमकता, त्याग, संघर्षाची कथा पडद्यावर पाहता आली. अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने ही भूमिका साकारली होती. 

 

टकाटक: मराठीमध्ये बोल्ड सिनेमांचा नवा अध्याय या सिनेमाने सुरु झाला. 'टकाटक' सिनेमात प्रथमेश परब, अभिजीत आमकर, प्रणाली भालेराव, रितिका श्रोत्री या कलाकारांच्या प्रमुख भूमिका होत्या. अनेक गरमा गरम दृश्य आणि द्वयर्थी संवाद यामुळे हा सिनेमा प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला होता. 

 

डोक्याला शॉट: ‘डोक्याला शॉट’ हा शब्दप्रयोग अनेकदा वैताग आणणा-या किंवा कंटाळवाण्या बाबींसाठी वापरला जातो. पण चक्क या नावाचा सिनेमाही आला. विनोदी धाटणीच्या या सिनेमाची कथा काहीशी हटके आहे. मराठी मुलगा आणि दाक्षिणात्य मुलगी यांच्या लग्नाची गोष्ट पण त्यामध्ये आलेला मजेदार ट्वीस्ट मनोरंजक होता. 

 

मोगरा फुलला: नावातच प्रसन्नता असलेला हा सिनेमा प्रेक्षकांच्या मनात नात्यांचा दरवळ ठेवून गेला. लग्न होत नसलं तरी आईवर जीवापाड प्रेम करणाऱ्या मुलाच्या भूमिकेत स्वप्नील जोशीने रंग भरले. तसेच नीना कुलकर्णी, संदीप पाठक, चंद्रकांत कुलकर्णी यांच्या भूमिकांनी सिनेमा रंगतदार बनवला.

 

गर्लफ्रेंड: आपल्याला एक गर्लफ्रेंड असावी असं प्रत्येक तरुणाला वाटतं. एखादा इंट्रोव्हर्ट मुलगा ‘गर्लफ्रेंड’ च्या शोधात असेल तर काय गंमती-जमती घडतात याचा मनोरंजक प्रवास ‘गर्लफ्रेंड’ सिनेमात दाखवला आहे. या सिनेमात अमेय वाघ आणि सई ताम्हणजकर मुख्य भूमिकेत आहेतच. याशिवाय सागर देशमुख, रसिका सुनील, ईशा केसकर, कविता लाड, यतीन कार्येकर, तेजस बर्वे, सुयोग गोऱ्हे, उदय नेने यांच्या भूमिका आहेत. एकंदरीत या सिनेमात यंग ब्रिगेड असल्याने फ्रेश टच लाभला आहे. 

 
खारी बिस्कीट: भाऊ बहिणीच्या नात्याला अनेक पदर असतात. एकमेकांशी कितीही भांडले तरी एकमेकांवर प्रेम करणारे, काळजी घेणारे बहीण-भाऊ दिसतात. संजय जाधव दिग्दर्शित 'खारी बिस्कीट' या सिनेमात बहीण-भावाचं हे गोड नातं अनुभवायला मिळतं.  पाहता येत नसलेल्या खारीसाठी तिचा भाऊ बिस्कीट हा आई-बाबा आदि जबाबदारी पार पडत असतो. वर्ल्डकपचा माहोल असल्याने खारी सुद्धा बिस्कीटजवळ सचिन तेंडुलकरला भेटण्याची आणि वर्ल्डकप पाहण्याची इच्छा व्यक्त करते. तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी बिस्कीटचे प्रयत्न या सिनेमात दाखवले आहेत. 

 

हिरकणी: “सूर्यास्तानंतर गडाचे दरवाजे बंद झाल्यामुळे, आपले बाळ घरी एकटे असेल...भूकेले असेल या विचाराने व्याकूळ झालेल्या आईचे अतुल्य धाडस हिरकणी सिनेमात दाखवलं आहे.  शाळेत शिकवलेली हिरकणीची गोष्ट आजही तशीच्या तशी पडद्यावर साकारण्यात दिग्दर्शक प्रसाद ओकला यश आलं आहे. हिरकणीच्या व्यक्तिरेखेत सोनाली कुलकर्णीने रंग भरले आहेत. या सिनेमात सोनाली कुलकर्णी आणि अमित खेडेकर मुख्य भूमिकेत आहे.

 

फत्तेशिकस्त: ऐतिहासिक सिनेमांच्या लाटेत हा एक महत्त्वाचा सिनेमा म्हणजे फत्तेशिकस्त. ‘भारतातील पहिली सर्जिकल स्ट्राईक’ अशी या सिनेमाची टॅगलाईन आहे. गनिमी काव्याने शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची तोडलेली बोटं हा या सिनेमाचा विषय आहे. या सिनेमात  मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, निखिल राऊत, आस्ताद काळे, तृप्ती तोरडमल, रमेश परदेशी, नक्षत्रा मेढेकर, हरीश दुधाडे, अजय पुरकर, अंकित मोहन, समीर धर्माधिकारी, मृण्मयी देशपांडे अशी कलाकारांची मोठी फौज आहे.  या सिनेमानेही प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं होतं.

Recommended

PeepingMoon Exclusive