By  
on  

पियुष मिश्रांनी दाखवले गायकीचे जलवे, गायलं या मराठी सिनेमात गाणं

ब्लॅक फ्रायडे चित्रपटातील 'अरे रुक जा रे बंदे', गुलाल मधलं 'आरंभ है प्रचंड है' ही चेतना उत्तेजित करणारी गीते असतील किंवा हळव्या प्रेमाची कहाणी सांगणारं 'हुस्ना' हे गीत असेल आजही आपल्याला एका ट्रान्स मध्ये घेऊन जातं. या गीतांतील प्रत्येक शब्दन-शब्द आपल्या भावनांना हात घालतो. विषयानुरूप शब्दांची अचुक मांडणी करीत मैफिल जमावणारा हा शब्दजादूगार दुसरा-तिसरा कुणी नसून हिंदीतील सुप्रसिद्ध गीतकार पियुष मिश्रा आहे हे काही वेगळं सांगायला नको. लेखक, गीतकार, संगीतकार, गायक, कलाकार अशा सगळ्याच क्षेत्रात चौफेर मुशाफिरी करणाऱ्या पियुष मिश्रांना आता मराठीची भुरळ पडली आहे. मराठी चित्रपटक्षेत्रात असणारे नावीन्य त्यांना ही आपल्याकडे आकृष्ट करण्यापासून अडवू शकले नाही ह्याची प्रचिती भावेश काशियानी फिल्म्स,आयड्रिम्झ फिल्मक्राफ्ट प्रस्तुत 'कॉलेज डायरी' या मराठी चित्रपटाच्या निमित्ताने आली.

अनिकेत जगन्नाथ घाडगे दिग्दर्शित 'कॉलेज डायरी' या मराठी चित्रपटात एक नव्हे... दोन नव्हे तर तब्ब्ल पाच भाषांतील गाणी असणार असून मराठी, हिंदी, इंग्लिश, संस्कृत आणि तामिळपैकी हिंदी भाषेतील गाणं पियुष मिश्रा यांनी स्वतः गायलं आहे. निरंजन पेडगावकरांच्या संगीताने समजलेल्या गणेश-सुरेश या द्वयीच्या शब्दांना पियुष मिश्रांनी आपला धीरगंभीर आवाज देत चारचाँद लावलेत. 'कॉलेज डायरी' १६ फेब्रुवारीपासून महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

'कॉलेज डायरी'ची कथा कॅम्पसमध्ये घडते. कॉलेज म्हणजे केवळ मजा-मस्ती-धम्माल असे मानणाऱ्या काही मित्रांच्या आयुष्यात अनपेक्षितपणे घडणाऱ्या घटनांचा मागोवा घेणारी ही कथा खिळवून ठेवणारी आहे.कॉलेज डायरी'ची कथा अनिकेत जगन्नाथ घाडगे यांनी लिहिली असून संवाद अनिकेत जगन्नाथ घाडगे आणि विशाल सांगले यांचे आहेत. या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते सचिन दूबाले पाटील असून या चित्रपटात विशाल सांगळे, आनंद बुरड, समीर सकपाळ, वैष्णवी शिंदे, शरद जाधव,प्रतीक्षा शिवणकर,शिवराज चव्हाण,अविनाश खेडेकर, प्रतीक गंधे,शुभम राऊत, हेमलता रघू, जनार्दन कदम, आदींच्या भूमिका आपल्याला पाहता येतील.१६ फेब्रुवारीला 'कॉलेज डायरी' संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असून त्याआधी चित्रपटामधील विविध भाषांतील ही पाच गाणी प्रेक्षकांची मनं जिंकतील यात काही शंका नाही.

Recommended

PeepingMoon Exclusive