अंबरनाथ फिल्म फेस्टीव्हलचा बिगुल वाजला, या सिनेमाला मिळाली तब्बल १५ नामांकनं

By  
on  

कलाकाराला मिळणारा पुरस्कार ही त्याच्या कलेला आणि कार्याला मिळालेली सर्वोत्कृष्ट पावती असते. अंबर भरारी संस्थेच्या वतीने अंबरनाथ फिल्म फेस्टिवल मध्ये कलाकारांचा गुणगौरव करण्यासाठी त्यांना विविध पुरस्कारांनी गौरवण्यात येणार आहे. विशेष कौतुकाची बाब म्हणजे साई सिनेमा प्रस्तुत, संतोष सोनावडेकर निर्मित आणि गिरीश मोहिते दिग्दर्शित ‘लाल बत्ती’ या चित्रपटाला एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल १५ नामांकने या सोहळ्यात मिळाली आहेत.

कर्तव्यकठोर, खाकी वर्दी आड दडलेल्या पोलीसांमधल्या माणसाचा मागोवा घेणारा ‘लाल बत्ती’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘प्रदर्शनापूर्वी चित्रपटाला एवढी नामांकने मिळणे ही चित्रपटाला मिळालेली शाबासकी आहे. ही शाबासकी आम्हाला आणखी चांगले काम करण्याचे प्रोत्साहन देईल’ अशा भावना चित्रपटाचे निर्माते संतोष सोनावडेकर यांनी व्यक्त केल्या तर ‘हा चित्रपट पोलिसांच्या वास्तविक आयुष्याचे चित्रण करत असून, ही नामांकनं आणि पुरस्कार म्हणजे एक सुरुवात आहे. याच पाठबळावर आम्ही रसिकांसाठी अधिक उत्तमोत्तम कलाकृती निर्माण करू’ असा विश्वास दिग्दर्शक गिरीश मोहिते यांनी व्यक्त केला.

‘लाल बत्ती’ चित्रपटाला मिळालेली नामांकने पुढीलप्रमाणे ‘सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपट- लाल बत्ती’, ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता- मंगेश देसाई’, ‘सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- गिरीश मोहिते’, ‘सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- भार्गवी चिरमुले’, ‘सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता- रमेश वाणी’, ‘सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेता- तेजस सोनावडेकर’, ‘सर्वोत्कृष्ट कथा- अभय दखणे’, ‘सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक- अवधूत गुप्ते’, ‘सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत- अविनाश विश्वजीत’, ‘सर्वोत्कृष्ट कलादिग्दर्शक- दिगंबर तळेकर’, ‘सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शक- संतोष भांगरे’, ‘सर्वोत्कृष्ट साऊंड डिझाईन- राजकृष्णन’, ‘सर्वोत्कृष्ट डी आय कलरिस्ट- संतोष पवार’, ‘सर्वोत्कृष्ट वेशभूषाकार- प्रिया वैद्य’, ‘सर्वोत्कृष्ट छायाचित्रकार- कृष्णा सोरेन’

अंबर भरारी संस्था आयोजित ‘अंबरनाथ फिल्म फेस्टिव्हल’ रविवार २० जानेवारी रोजी अंबरनाथ येथील गावदेवी मैदानात सायंकाळी ६.३० वाजता संपन्न होणार आहे.

 

Recommended

Share