By  
on  

PeepingMoon Exclusive:  'चार दिवस... मालिका करतानाची गंमतच निराळी होती, 13 वर्षात देशमुख कुटुंबावरचा फोकस कधीच हलला नाही'

मराठी मालिका म्हटलं की कुटुंबासोबत एकत्र बसून त्या पाहणं हे चित्र महाराष्ट्रातल्या तमाम घरांमध्ये दिसतं. मालिकेच्या जगात प्रेक्षक नकळत रममाण होतात. त्यांच्या कुटुंबात कधीकधी आपल्याच कुटुंबाचं प्रतिबिंब पाहतात. मालिकेतल्या सूनेसारखी आदर्श सून आपल्यालाही हवी अशी तमाम सासूबाई वर्गाची इच्छा असते.
 

काही वर्षांपूर्वी मराठी मालिकांची शिर्षक गीतं घराघरांतून ऐकू यायची आणि सर्वजण टीव्हीसमोर एकत्र जमायचे. त्या दर्जेदार मालिका आजही रसिक प्रेक्षक पुन्हा पुन्हा डिजीटल माध्यमातूंन मोठ्या आवडीने पाहतात. या दर्जैदार मालिकांपैकीच एक महामालिका त्या काळी प्रचंड गाजली, ती म्हणजे चार दिवस सासूचे. तब्बल १३ वर्षे या मालिकेने रसिकांचं मनोरंजन केलं. या मालिकेचा आजही खुप मोठा चाहता वर्ग आहे. मालिकेचं शिर्षक गीत सुरु होतं नं होतं तोच आई, आजी, काकू आणि घरातील इतर मंडळी हातातलं काम टाकून यायचे. देशमुख कुटुंबाची ही गोष्ट सर्वांनाच भावली. म्हणूनच पिपींगमून मराठीने टेलिव्हिजन जगतातल्या जुनं ते सोन या नव्या को-या सदरात या मालिकेच्या आठवणी पुन्हा ताज्या करण्याचं ठरवलंय. मालिकेतील देशमुख कुटुंबाच्या प्रमुख आशालता देशमुख म्हणजेच ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांच्यासोबत केलेली ही  दिलखुलास बातचित. 

 

 

तब्बल 13 वर्ष चार दिवस सासूचे या मालिकेने रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन केलं, या मालिकेशी निगडीत तुमच्या आठवणी...

-    चार दिवस सासूचे ह्या महामालिकेने तब्बल 13 वर्ष रसिक प्रेक्षकांवर गारुड केलं. हे कसं झालं ते आम्हालाही कळलंच नाही. अनेक कलाकार ,मोठं कुटुंब असलेली मालिका म्हणजे सतत शूटींग सुरुच असणार असं एकंदर आत्ता समिकरण असतं. पण चार दिवससाठी मी महिन्यातले 12 दिवसांपेक्षा जास्त दिवस कधी दिल्याचं मला आठवत नाही. उत्तम नियोजन हे आमच्या मालिकेच्या यशाचं गमक म्हणू शकतो. या मालिकेबाबत एक गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटतेय. देशमुख कुटुंब हे मालिकेमधलं प्रमुख कुटुंब होतं. अनेक वर्ष ही मालिका चालली. परंतु शेवटपर्यंत देशमुख कुटुंबावर असलेला फोकस कायम होता. अनेक वळणं मालिकेने घेतली परंतु देशमुख कुटुंबाचा फोकस कधीच हलला नाही. 
सामान्य कुटुंबाऐवजी मोठ्या श्रीमंत घराण्यातील कुटुंबाची लार्जर दॅन लाईफ पहिल्यांदाच मराठी टेलिव्हिजनवर रसिक प्रेक्षकांना अनुभवायला मिळाली, तसंच आशालता देशमुख ह्या गर्भश्रीमंत असल्या तरी देशमुख कुंटूंब विस्कळीत होऊ नये म्हणून त्यांची सतत चालेली धडपड, कुंटुंबाला बाधून ठेवणारी सून म्हणून अनुराधा या सर्वांमुळेच या मालिकेने रसिक प्रेक्षकांच्या मनात घर केलं. 

 

 

 

मालिकेसाठी मिळालेली कुठली अविस्मरणीय दाद आठवतेय का, एखादा किस्सा सांगू शकाल ? 

-    तुमची मालिका खुप छान आहे, आम्ही नियमित मालिका पाहतो. तुमचं काम आणि तुमची भूमिका आम्हाला फार आवडते, असं कौतुक ब-याचदा प्रत्यक्ष भेटून व फोन-मेसेजसद्वारे होतच असतं. पण एक किस्सा मला आवर्जून सांगावासा वाटतो, तो म्हणजे एकदा पेण-अलिबागला आम्ही कोणत्या तरी  निमित्ताने जात होतो. तेव्हा मी आणि माझे पती आम्ही दोघेच होतो. प्रवासात एके ठिकाणी आम्ही नाश्त्यासाठी थांबलो तेव्हा तिथे एक कुटुंब चहा-नाश्ता करुन निघण्याच्या तयारीत होतं. त्यातील एक गृहस्थ मला पाहून पुढे आले व म्हणाले तुमच्याशी बोलू शकतो का...मी त्वरितच त्यांना हो म्हटलं..ते म्हणाले तुमची मालिका आम्हाला फार आवडते आणि त्याचं कारण म्हणजे ही मालिका मी माझे आई-वडील व मुलांसोबत बसून एकत्र पाहू शकतो. इतकी छान ही कौटुंबिक मालिका आहे... कुठेही ज्यादाचं चढवून न सांगता किंवा गाजावाजा न करता  त्यांनी  मनापासून दिलेली दाद माझ्या कायम स्मरणात राहील. 
  त्यानंतर काही शिक्षक व मुख्याध्यापक मंडळींकडून आमच्या मालिकेचं  कौतुक झालं तेव्हा तेसुध्दा आमची मालिका पाहतात, हे ऐकून फारच आश्चर्य वाटलं होत.

 

 

चार दिवस सासूचे पासून ते तुम्ही ‘होणार सून मी ह्या घरची’, ‘सुखी माणसाचा सदरा’ या अलिकडच्या अनेक सुपरहिट मालिकांमध्येसुध्दा प्रमुख भूमिका साकारल्या ..तेव्हाची मालिका आणि आत्ताची मालिका यात काय तफावत जाणवते? 

-    हो बरीच जाणवते. तेव्हा मूळ कथानकाला किंवा मालिकेतील ट्रॅकला धक्का बसण्याचा कधीच प्रश्न येत नव्हता. चॅनल त्यावेळेस कुठलाच हस्तक्षेप करत नसे. त्यामुळे दिग्दर्शक लेखकाला आपली कथा जशी हवी तशी मांडण्याची मुभा होती. पण आत्ता तसं नसतं. प्रायोजक किंवा चॅनेलच्या मागणीनुसार मालिकेचा ट्रॅक वळवावा लागतो. एखादा सण-उत्सवाचा प्रसंग ओढून-ताणून दाखवावा लागतो. त्यावेळेस तसं अजिबात नसायचं. तसंच अगदी नियोजनबध्द काम सुरु असायचं. मी आधीच म्हटल्याप्रमाणे महिन्यातले केवळ 12-13 दिवस मी या डेलीसोपसाठी द्यायचे आणि त्यामुळेच मी माझे बाकीचे प्रोजेक्ट्स जसं की सिनेमे, नाटक हे करु शकायचे. पण आत्ता तसं नसतं. थोडं पॅक्ड शेड्यूल असंत. चार दिवसची मालिका करतानाची गंमतच निराळी होती. आम्ही सर्वच कलाकारांनी मालिकेचे ते दिवस फारच एन्जॉय केले. 
 

Recommended

PeepingMoon Exclusive