By  
on  

PeepingMoon Exclusive: 'दामिनी'मुळे लोकं मला खरीखुरी पत्रकारच समजायचे : प्रतिक्षा लोणकर

मराठी मालिका म्हटलं की कुटुंबासोबत एकत्र बसून त्या पाहणं हे चित्र महाराष्ट्रातल्या घरा-घरांमध्ये दिसतं. मालिकेच्या जगात प्रेक्षक नकळत रममाण होतात . त्यांच्या कुटुंबात कधीकधी आपल्याच कुटुंबाचं प्रतिबिंब पाहतात आणि त्यात सामिल होतात. मालिकेतल्या सूनेसारखी आदर्श सून किंवा आदर्श लेक आपल्यालाही हवी अशी इच्छा बाळगतात. 

डेली सोपचा पायंडा ज्या मालिकेने मराठी मनोरंजन विश्वात पाडला ती पहिली वहिली दैनंदिन मालिका म्हणजेच दामिनी. या मालिकेने  रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. 'दामिनी' ही व्यक्तिरेखा तडफदार, सत्यप्रिय, लोकांची मदत करणारी म्हणून रेखाटण्यात आली होती आणि प्रतीक्षा लोणकरने ती पडद्यावर जिवंत केली. मालिकेतील अन्यायाला वाचा फोडणारी धडाडीची पत्रकार दामिनी प्रत्येकालाच आपलीशी वाटली, म्हणूनच पिपींगमून मराठीने टेलिव्हिजन जगतातल्या ‘जुनं ते सोनं’ या नव्या को-या सदरात या मालिकेच्या आठवणी पुन्हा ताज्या करण्याचं ठरवलंय. मालिकेतील सर्वांची लाडकी दामिनी म्हणजेच सशक्त अभिनेत्री प्रतिक्षा लोणकर  यांच्यासोबत केलेली ही दिलखुलास बातचित. 

 

बेधडक पत्रकार दामिनी साकारुन तुम्ही अवघ्या महाराष्ट्राच्या लाडक्या बनल्यात, काय सांगाल मराठीतल्या या पहिल्या दैनंदिन मालिकेबदद्ल?

-    अनेकांना करिअरमध्ये बराच संघर्ष केल्यानंतर इतकी छान आव्हानात्मक भूमिका मिळते, पण मला अशी भूमिका माझ्या करिअरच्या सुरुवातीलाच मिळाली,  हे मी माझं भाग्य समजते. माझ्या करिअरमध्ये ह्या मालिकेचा खुप मोलाचा वाटा ठरला. माझा चेह-याला आणि मला एक ओळख मिळाली.ज्यावेळी दैनंदिन मालिका म्हणजेच आत्ताचे डेली सोप्स हा शब्दही प्रचलित नव्हता त्यावेळेस ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि तिने अल्पावधितच मनं जिंकली. मराठीच नाही तर अमराठी रसिकांनासुध्दा ती खुप भावली.  याच मालिकेमुळे मी स्वत:ला कलाविश्वात प्रस्थापित करु शकले. अनेकांना तर माझं नाव प्रतिक्षा लोणकर आहे हे दिर्घकाळ माहितच नव्हतं ते फक्त आणि फक्त दामिनी म्हणूनच मला ओळखायचे.  सत्याच्या बाजूने ठाम उभी असणारी दामिनी. 

सिनेविश्वातील जवळपास सर्वच कलाकारांनी दामिनी मालिकेत अनेक लहान-मोठ्या भूमिका साकारल्या  आणि त्या लोकप्रियसुध्दा ठरल्या. सुरवातीला  काही कलाकार मंडळी काय दामिनी मालिकेत काम करायचं..., काय आहे त्यात एवढं.. असं म्हणत होते आणि पुढे त्याच कलाकारांनी आमही इतक्या भूमिका केल्या पण दामिनी मालिकेत साकारलेल्या भूमिकेमुळे आम्हाला ओळख मिळाली हे माझ्यासमोर कबुलही केलं आहे. 

 

कुणीतरी मनापासून दिलेली दाद आठवतेय का ?

-    मालिका सुरु असताना मला अनेक पत्रं यायची. त्यावेळेस आत्तासारखे फोन-मेसेजेस किंवा सोशल मिडीया नव्हतं. त्यामुळे पत्राद्वारे किंवा जिथे कुठे मी कार्यक्रमानिमित्त जायचे तिथे लोक आवर्जून माझ्या कामाचं कौतुक करायचे. पण मला विशेष याचं वाटतं, की अनेक तरुणी प्रत्यक्ष किंवा मग पत्राद्वारे ताई आम्हाला तुझ्यासारखंच पत्रकार व्हायचंय, कोणता कोर्स करु..त्यासाठी योग्य पात्रता काय असं मनापासून सांगायच्या तेव्हा भरुन यायचं. मी त्या होतकरु तरुणींसाठी एक प्रेरणा होते, याचा मला खुप आनंद झाला. 
   कधी कधी तर असे अनेक किस्से घडले आहेत,  की लोक मला पत्रकार म्हणून; समजायचे आणि एखादी समस्या असेल तर ती सोडवण्याची विनंती करायचे, किंवा यावर तुम्ही काय भूमिका घ्याल म्हणून विचारायचे. मग मला त्या सर्व चाहत्यांना शांतपणे समजावून सांगावं लागायचं की मी खरीखुरी पत्रकार नसून अभिनेत्री आहे. मला वाटतं हेच माझ्या दामिनी भूमिकेचं खरं यश आणि मला मिळालेली दाद होती. 

 

 

दामिना  मालिकेनिमित्ताने घडलेला एखादा खास किस्सा 

-    मी आधी म्हटल्याप्रमाणे लोक मला खरी खुरी पत्रकारच समजायचे. एकदा तर विदर्भातून थेट एक गृहस्थ मुंबईत मला भेटायला आले. त्यांच्यासोबत काहीतरी भ्रष्टाचाराचा प्रकार घडला होता. ती फाईलही त्यांनी सोबत आणली होती. मला भेटून त्यांनी सांगितलं की, तुमच्यामुळे आणि तुमच्या मालिकेमुळे मला लढण्याचं बळ मिळालंय. मग मीसुध्दा त्यांचं यासाठी खुप अभिनंदन केलं व शुभेच्छा दिल्या. मग ते लगेचच म्हणाले, अभिनंदन कसलं करताय चला माझ्यासोबत आपल्याला मंत्रालयात जायचंय.याविरोधात योग्य ती कारवाई करायचीय.  असेच काही काही भाबडे लोक त्यांच्या मंत्रालयात अडकलेल्या फाइल्स घेऊन  माझ्याकडे यायला लागले .

दामिनीने तुम्हाला आयुष्यभरासाठी काय शिकवण दिली?

-    एखादी अशी नाही सांगता येणार पण जे काही या मालिकेने शिकवलंय ते नक्कीच सांगते. जे काम तुम्ही प्रामाणिकपणे आणि निष्ठेने करता त्याचं फळ तुम्हाला मिळतंच. तसंच तुम्ही एखादी भूमिका समरसून जगलात तर ती प्रेक्षकांच्या हदयाला भिडते हे मला या मालिकेमुळे कळलं. ते मी माझ्या आत्ताच्या सर्वच भूमिकांमध्ये ते नित्यनेमाने अंगिकारते.

Recommended

PeepingMoon Exclusive