Exclusive: निसर्गाकडून मिळणारी सकारात्मकता ही शाश्वत असते : शशांक केतकर

By  
on  

मागील काही वर्षापासून पर्यावरण ही गोष्ट अधिक गांभीर्याने घेण्याची गरज निर्माण झाली आहे. जगभरातील वणवे, पुर, यामुळे जगाला त्रास सहन करावा लागला आहे. त्यामुळेच यंदाच्या पर्यावरण दिवसाचा विषयही खास आहे. पुर्नकल्पना, पुर्ननिर्माण, जीर्णोद्धार या संकल्पनेवर यंदाचा पर्यावरण दिवस साजरा केला जातो आहे. या विषयाला अनुसरुनच पीपिंगमून मराठीशी अभिनेता शशांक केतकरने खास बातचीत केली आहे.

 

पर्यावरणाशी संदर्भात कोणत्या Ngo शी जोडला गेला आहेस का?

शशांक: अजून तरी नाही. मला पर्यावरणाशी संबधित बाबी अनेकदा स्वत: जोपासायला आवडतात. मला असं वाटतं आपण या पृथ्वीचा अगदी सुक्ष्म पण महत्त्वाचा भाग आहोत. त्यामुळे त्यातल्या प्रत्येक घटकासोबत आपण किती काळजीपुर्वक वागतो आहे याचं भान ठेवणं गरजेचं आहे. नाहीतर एकदा निसर्गाच्या मनात आलं तर विनाश घडवल्याशिवाय रहात नाही. पूर, भुकंप या विपत्तींच्या माध्यमातून निसर्ग एकप्रकारे मानवी हव्यासावर आणि अहंकारावरच घाला घालतो. हेच टाळण्यासाठी आसपासच्या पर्यावरणाचं संवर्धन करणं ही मुलभूत जबाबदारी आहे असं मी मानतो. निसर्गाकडून मिळणारी सकारात्मकता ही कमालीची असते. तुम्हीच पाहा, निसर्गातील लहानातील लहान जीवही आपल्या काहीतरी शिकवून जातो.

 

तू तुझ्या व्यस्त वेळापत्रकातून पर्यावरणसंबंधित आवडींसाठी वेळ कसा काढतोस?

शशांक :  मी वेगळा वेळ या सगळ्यांसाठी काढत नाही. मी फक्त इतकंच करतो की, माझ्यामुळे कुठेही प्रदुषण होऊ नये किंवा प्रदुषणाला हातभार लागू नये याची काळजी वेळोवेळी घेत असतो. मला वाटतं आपण प्रत्येकाने स्वत:चा खारीचा वाटा उचलला तरी पुरेसं आहे. बाकी निसर्ग सगळा समतोल साधून घेतो.

 

तुझ्या लाईफस्टाईलमध्ये काही इको फ्रेंडली गोष्टी वापरतोस का?

शशांक: मुळातच मी शाकाहारी आहे. याशिवाय मी शाकाहाराबाबत आग्रही असतो. पण शाकाहाराला उत्तेजन देण्याकडे माझा ब-यापैकी कल आहे. याशिवाय माझा रोजच्या वापरातील टुथब्रश हा प्लॅस्टिकचा नसून लाकडाचा आहे. मी लेदर म्हणजेच प्राण्यांच्या कातड्यापासून बनवलेल्या वस्तू वापरणंही कटाक्षाने टाळतो. त्यामुळे माझ्या या प्रयत्नांमुळे थोडा जरी फरक पडत असेल तर मला याचा आनंद आहे. मला या पर्यावरण दिनानिमित्त मला इतकंच सांगायचं आहे की, पृथ्वी जितकी आपली आहे तितकीच इतर सजीवांचीही आहे. याचं भान ठेवून आपण प्रत्येकाने वागणं अतिशय गरजेचं आहे.

Recommended

Loading...
Share