PeepingMoon Exclusive: करिअरच्या सुरुवातीलाच ‘ऊन पाऊस’ सारखी मालिका मिळाली हे माझं भाग्य - अनिकेत विश्वासराव

By  
on  

जुन्या मालिकांची बातच निराळी होती. तेव्हा प्रायोजित मालिकांची नुकतीच सुरुवात झाली होती. उत्कृष्ट कथानक, दमदार कलाकारांची फौज आणि मनाचं ठाव घेणारं शिर्षक गीत. आजही त्या मालिका  प्रेक्षकांच्या हदयावर अधिराज्य गाजवतात. पुन्हा पुन्हा यूट्यूबवर त्या पाहाव्याशा वाटतात. जुनं ते सोनं म्हणतात ते हेच. 
'चॉकलेट हिरो' म्हणून प्रसिद्ध असलेला अभिनेता अनिकेत विश्वासराव अनेक मालिका, सिनेमे आणि नाटकांमधून रसिक प्रेक्षकांवर छाप पाडतो. करिअरच्या सुरुवातीच्या काळात ऊन पाऊस या मालिकेद्वारे अनिकेतने नायक साकारत घराघरांत स्थान मिळवलं. आधी उर्मट, बड्या घरचा बेशिस्त तरुण ते नंतर आपली चुक सुधारण्यासाठी तळमळणारा शांत सुस्वभावी सागर सर्वांनाच भावला, ह्या मालिकेने अनिकेतला खरी ओळख मिळवून दिली. स्मिता तळवलकर, मोहन जोशी, सविता प्रभुणे, विद्याधर जोशी, सुहास जोशी, उदय टिकेकर, हर्षदा खानविलकर आदी दिग्गज कलाकारांच्या अभिनयाने ही मालिका सजली होती. 
म्हणूनच पिपींगमून मराठीने टेलिव्हिजन जगतातल्या ‘जुनं ते सोनं’ या नव्या को-या सदरात या मालिकेच्या आठवणी पुन्हा ताज्या करण्याचं ठरवलंय. मालिकेतील सर्वांचा लाडका सागर म्हणजेच अभिनेता अनिकेत विश्वासराव सोबत केलेली ही दिलखुलास बातचित. 


‘ऊन पाऊस’ मालिकेतील सागरच्या भूमिकेसाठी तुझी निवड कशी झाली.?

-    करिअरच्या सुरुवातीलाच मला  ‘ऊन पाऊस’सारखी मालिका मला मिळाली, दिग्गज कलाकारांसोबत काम करायला मिळालं, त्यांच्याकडून भरपूर शिकता आलं, हे मी माझं भाग्य समजतो. ज्येष्ठ अभिनेत्री स्मिता तळवलकर यांच्या अस्मिता चित्रची निर्मिती असलेली आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक संजय सूरकर यांनी दिग्दर्शित केलेली ही मालिका होती. संजय सूरकर हे एकदा माझं ‘नकळत सारे घडले’ हे नाटक बघायला आले होते आणि त्याच दरम्यान त्याचं  ‘ऊन पाऊस’ मालिकेसाठीचं प्लॅनिंग सुरु होतं, त्यामुळे ते नाटकानंतर माझ्याशी चर्चा करण्यासाठी आले आणि माझी सागर या मुख्य भूमिकेसाठी निवड झाली. 

 

‘ऊन पाऊस’ मालिकेचं वेगळेपण काय सांगशील ?

-   ही एक अप्रतिम कलाकृती होती. अनिल बर्वे यांच्या प्रदर्शित न झालेल्या कादंबरीवर आधारित होती. प्रत्येक पात्रं त्यात अचूक रेखाटण्यात आली होती.   ‘ऊन पाऊस’ मालिकेचं एक वेगळेपण सांगायचं म्हणजे या मालिकेची खुपच एक्सक्लुझिव्ह कास्ट होती. ह्यात काम करणारे सर्वच कलाकार त्यावेळेस फक्त ‘ऊन पाऊस’ मध्येच काम करत होते, त्यामुळे एक उत्तम प्रेक्षकवर्ग या मालिकेने कमावला. सर्वच व्यक्तिरेखा लोकप्रिय ठरल्या.  मी, अभिजीत केळकर, प्रिया खोपकर या आम्हा तरुण कलाकारांसह सर्वच दिग्गज कलाकारांमध्ये मालिका करताना प्रचंड उत्साह होता आणि तोच उत्साह मालिका लोकप्रिय ठरण्यात महत्त्वाचा दुवा ठरला. 

या मालिकेमुळे तुला मिळालेल्या स्टारडमविषयी जाणून घ्यायचंय? 

-    जर तुम्हाला रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहचायचं असेल तर टेलिव्हिजनसारखं माध्यम नाही. मला नायक म्हणून कसं स्टारडम मिळालं ते माझं मलाच कळलं नाही. मी फक्त अभिनय हे करिअर म्हणून निवडलं होतं. मग मला ही मालिका मिळाली. माझं काम प्रामाणिकपणे व मेहनत घेऊन करत होतो. त्यामुळे मालिकेतला सागर लोकांना खरा वाटला आणि मी घराघरांत पोहचलो. 

रसिक प्रेक्षकांनी या मालिकेवर भरपूर प्रेम केल. चाहत्यांचा एखादा असा किस्सा सांगता येणार नाही. आत्तासुध्दा लॉकडाऊनमध्ये युट्युवर मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक ‘ऊन पाऊस’ ही मालिका पाहतायत. मला आवर्जून मेसेजेस, मेल्स करतायत. 15 वर्षानंतरसुध्दा प्रेक्षकांचं प्रेम आजही तसंच आहे व मालिकासुध्दा पाहताना ताजी टवटवीतच वाटते. या मालिकेने खरंच खुप काही दिलं असं मी म्हणेन. 


निर्माती आणि अभिनेत्री म्हणून तुला स्मिता तळवलकर यांच्यासोबत काम करायला मिळालं, त्यांच्याविषयीच्या काही आठवणी आहेत का?

-    स्मिता ताईंबदद्ल काय सांगू आणि काय नको असं होतं मला या प्रश्नावर. त्या खुप गोड  आणि मायाळू होत्या. निर्माती म्हणून त्यांचा धाक कधी जाणवलाच नाही. उलट त्या नेहमीच आमचे लाड करायच्या. विशेषत: खाण्यापिण्याचे. मालिकेचे सुरुवातीचे काही एपिसोड्स पुण्यात शूट झाले. तेव्हा मालिकेतील आम्ही तरुण मुलांची गॅंग स्मिताताईंच्या लॉ कॉलेज रोडवरील फ्लॅटवर रहायचो. आमची सात ते सात शिफ्ट असायची त्यामुळे शिफ्ट संपल्यावर आम्ही सर्व मुलं आठ पर्यंत फ्लॅटवर पोहचायचो आणि स्मिताताई न चुकता दररोज तिथे यायची व प्रेमाने आम्हाला मासे-चिकन असं चमचमीत जेवण प्रेमाने खाऊ घालायची. मग एकदा आम्ही सर्व टीम त्यांच्या फार्महाऊसवर मजा करायला गेलो होतो.कोणती निर्माती असं करते, मला खरंच माहित नाही. पण स्मिता ताई ही स्मिता ताई होती. ती सर्वांची आपुलकीने  व प्रेमाने काळजी घ्यायची.
-    एकदा स्मिताईंसोबत ‘ऊन पाऊस’ मालिकेच्या प्रमोशनसाठी फिरत होतो. तेव्हाच त्यांचा आनंदाचं झाड हा सिनेमा प्रदर्शित होणार होता. तेव्हा त्या प्रत्येक थिएटरशी, तिथल्या माणसांशी सिनेमाबाबत बोलत होत्या. सिनेमाबाबत सर्व काही गोष्टींकडे जातीने लक्ष देत होत्या. त्या मी अनुभवल्या आहेत. यशस्वी झाल्यावरसुध्दा ताई आपलं प्रत्येक प्रोजेक्ट हे पहिलं प्रोजेक्ट असल्यासारख्या हाताळतात आणि हे त्यांच्याकडून शिकायला मिळालं ह्यासारखं दुसरं भाग्य नाही. 

 

Recommended

Loading...
Share