EXCLUSIVE : “मला अनेक वर्षांपासून हा जॉनर करायचा होता”, ‘समांतर -2’ साठी समीर विद्वांस यांचं दिग्दर्शन

By  
on  

लॉकडाउन सुरु होण्याच्या काळात 'समांतर' सारखी उत्तम वेबसिरीजही प्रदर्शित झाली होती. त्यामुळे एक थ्रिलर जॉनर असलेली ही वेबसिरीज ओटीटीवर प्रेक्षकांना पाहायला मिळाली. सुहास शिरवाळकर यांच्या समांतर या कादंबरीवर आधारित वेब सिरीजचं दिग्दर्शन सतीश राजवाडे यांनी केलं होतं. अभिनेता स्वप्निल जोशी, तेजस्विनी पंडित, नितीश भारव्दाज, जयंत सावरकर या सिरीजमध्ये मुख्य भूमिकेत झळकले. प्रेक्षकांना ही वेब सिरीज प्रचंड आवडली आणि याला भरघोस प्रतिसाद मिळाला. मात्र अपूर्ण राहलेली कथा आता पुढे कशी जातेय हे पाहण्यासाठी प्रेक्षक दुसऱ्या भागाच्या प्रतिक्षेत आहेत. मात्र या दुसऱ्या भागासाठी आता दुसऱा दिग्दर्शक असणार आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक समीर विद्वांस या दुसऱ्या भागासाठी दिग्दर्शन करत आहेत.


पिपींगमून मराठीशी एक्सक्लुझिव्ह बातचीत करताना समीर यांनी याविषयी बऱ्याच गोष्टी सांगीतल्या. आत्तापर्यंत नातेसंबंधांवर आधारित उत्तम सिनेमे करणार समीर या वेब सिरीजच्या निमित्ताने पहिल्यांदाच थ्रिलर जॉनर करत आहेत. ते सांगतात की,  “मी आत्तापर्यंत थ्रिलर केलेलं नाही. माझा आवडता जॉनर आहे हा खरतर. फिल्म किंवा नाटकांमध्येही थ्रिलर काहीच केलेलं नाही. मात्र मला अनेक वर्षांपासून हा जॉनर करायचा होता. या निमित्ताने तो मला करायला मिळतोय. त्याचबरोबर दिग्दर्शक म्हणून ज्या गोष्टी मला करायला आवडतात नातेसंबंध, त्यात काय सुरु आहे त्या गोष्टी यात असतील.”

य़ा दुसऱ्या भागाचं चित्रीकरण लवकरच सुरु होणार आहे.  याविषयी समीर म्हटले की, “चित्रीकरणासाठी अजून तारीख ठरवलेली नाही पण ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये चित्रीकरण सुरु करू असं डोक्यात ठरवलय. सरकारच्या नियमांनुसार ते करायचय तर तो वेळ आम्ही आता घेत आहोत.”


नव्या भागात कशा पद्धतिचे बदल असतील हेही ते सांगतात. ते म्हटले की, “पहिला सिझन जिथे संपलाय तिथे ही कादंबरी अर्धी आहे. त्याच्यापुढे कादंबरीमध्ये बऱ्याच गोष्टी घडतात.पुढच्या सिझनमध्ये आणण्यासाठी जे थोडेसे बदल लागतात ते थोडेसे बदल आम्ही करतोय. मात्र कादंबरीचा जो मूळ गाभा आहे त्याला धक्का न लावता आम्ही काही गोष्टी केल्या आहेत.”
शिवाय दुसऱ्या भागात काही नवीन कलाकारांचाही समावेश असल्याचं त्यांनी या मुलाखतीत सांगीतलं. मात्र पहिल्या भागाला मिळालेला प्रतिसाद लक्षात घेता. या दुसऱ्या भागाच्या कामासाठी कशी सुरुवात असेल हे त्यांनी सांगीतलं. “माझ्यासाठी हे नवं काम आहे. त्याच्यामुळे ती प्रत्येक कामाप्रमाणे जबाबदारी आहेच. जबाबदारी आहे पण ताण नाही. मी प्रत्येक काम शून्यापासून सुरु करतो. माझ्यासाठी ते नवीन असतं. त्यामुळे नवीन काम म्हणूनच प्रत्येक गोष्टी पाहतो. त्याला मोठा प्रतिसाद मिळालाय आणि एक प्रेक्षकवर्ग आहे जे दुसऱ्या सिझनची वाट पाहत आहेत. त्यामुळे जबाबदारी शंभर टक्के आहे.”
 याच वर्षी नोव्हेंबर महिन्यात ‘समांतर-2’ सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची शक्यता समीर यांनी वर्तवली आहे. 

Recommended

Loading...
Share