By  
on  

‘गॉनकेश’ सौंदर्याच्या पारंपरिक चौकटी मोडणारा सिनेमा: दीपिका देशपांडे अमीन

नाटक, सिनेमा आणि मालिका अशा तिन्ही माध्यमातील प्रसिद्ध चेहरा म्हणजे दीपिका देशपांडे अमीन. दिल्लीत वाढलेल्या दीपिका खुप कमी वयापासून नाटकांशी जोडल्या गेल्या आहेत. कवी अनिल आणि कुसुमावती देशपांडे यांच्यासारख्या सारस्वतांचा वारसा लाभलेल्या दीपिका यांना ‘फरमान’ या मालिकेतून ओळख मिळाली. याशिवाय दीपिका यांनी आतपर्यंत सोनू के टिटू कि स्वीटी, रांझणा, फॅन, ह्म्प्टी शर्मा की दुल्हनिया या सिनेमात अभिनय केला आहे. त्या आता ‘गॉनकेश’ सिनेमातून रसिकांच्या समोर येत आहेत. या विषयी पीपिंगमूनने त्यांच्याशी केलेली बातचीत.

घरी साहित्याचं वातावरण असूनही अभिनय क्षेत्रात कसं यावसं वाटलं?

मी लहानपणापासूनच शाळा, कॉलेजमधील नाटकांशी जोडले गेले होते. माझी जडण घडण दिल्लीमध्ये झाल्याने तिथे बॅरी जॉन यांच्या मार्गदर्शनाखाली काही काळ थिएटर केलं. त्यानंतर मुंबईला आल्यानंतर मात्र मला ‘फरमान’मध्ये काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर माझा प्रवास अजून सुरुच आहे.

‘गॉनकेश’ बद्दल काय सांगाल?

‘गॉनकेश’ हा माझ्या मनाच्या सगळ्यात जवळ असलेला सिनेमा आहे. आपल्याकडे दुर्दैवाने कमी बजेट सिनेमांना म्हणावी तितकी प्रसिद्धी मिळत नाही. पण आता हे चित्र थोड बदलताना दिसत आहे. या सिनेमाला मिळालेले रिव्ह्यु पाहता आम्हाला याची खात्री पटलीये. या सिनेमाला मिळालेल्या रिव्ह्युमुळे कष्टाचं चीज झाल्याची भावना मनात आली. ही कथा सिलिगुडीमधील एका त्रिकोणी कुटुंबाची आहे. या कुटुंबातील मुलीला अ‍ॅलोपेशिया नावाचा आजार होतो. या आजारात तिचे केस मोठ्याप्रमाणावर गळू लागतात. एका टीनएजर मुलीच्या आयुष्यात असा प्रसंग येतो तेव्हा तिचं भावविश्व बदलतं. ही कथा वरवर बघता सामान्य वाटते. पण आपण जेव्हा या मुलीच्या आणि तिच्या पालकांच्या नजरेतून जगाकडे पाहतो त्यावेळी या समस्येचं गांभीर्य कळतं. मुळातच आपण स्त्रिच्या सौंदर्याच्या चौकटी इतक्या घट्ट करून ठेवल्या आहेत. मुळात एखाद्या मुलीने असंच दिसलं पाहिजे किंवा असंच राहिलं पाहिजे समाजाच्या या चौकटीने एखाद्या मुलीचं आयुष्य खडतर बनत जातं. अशा वेळी स्वत:ला आहे तसं स्विकारण्याचा संदेश या सिनेमातून दिला गेला आहे. त्यामुळेच गॉनकेश हा सिनेमा वेगळ्या धाटणीचा सिनेमा ठरतो.

तुमचे आगामी प्रोजेक्ट काय आहेत?

आता मी सीमा भारद्वाज यांच्या ‘पिंडदान’ या सिनेमातून रसिकांच्या भेटीला येत आहे. या एक सुंदर सिनेमा आहे. या सिनेमात मला नसरुद्दीन शहा, कोंकणा सेन शर्मा, सुप्रिया पाठक यांसारख्या कलाकारांसोबत काम करायला मिळालं. याशिवाय एका वेबसिरीजच्या तिस-या भागातही मी काम करत आहे. ही वेबसिरीज लवकरच रिलीज होईल.

मराठी सिनेमात काम करण्याची इच्छा आहे?

हो. खुप. मी ही एखादं मराठी प्रोजेक्ट माझ्याकडे येण्याची वाट पाहात आहे. त्याद्वारे मी मराठी रसिकांच्या समोर येऊ शकेन.

 

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive