मराठी सिनेसृष्टीतील सुंदर आणि गोड अभिनेत्री म्हणून प्रार्थना बेहरे ओळखली जाते. प्रार्थना सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. तिचा खुप मोठा चाहतावर्ग आहे. आपल्या प्रत्येक प्रोजेक्टसंदर्भात चाहत्यांशी कनेक्ट राहण्यास प्रार्थना पसंती देते.
तुम्हाला माहितच असेल मागील काही दिवसांपासून प्रार्थना आपल्या आगामी सिनेमाच्या शूटींगसाठी लंडनमध्ये आहे. छूमंतर असं तिच्या आगामी सिनेमाचं नाव आहे. याच दरम्यान प्रार्थना लंडनच्या रस्त्यांवर मनसोक्त थिरकताना पाहायला मिळाली. तिचा हा डान्स व्हिडीओ खुप व्हायरल होतोय.
पहला नशा...पहला खुमार ह्या गाण्यावर प्रार्थना बेधुंद नाचली आणि तिने तो व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला. चाहत्यांनासुध्दा हा व्हिडीओ प्रचंड आवडला असून त्यांनी त्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
आगामी छूमंतर या सिनेमात प्रार्थनासोबत रिंकू राजगुरु, सुव्रत जोशी, ऋषी सक्सेना हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. समीर जोशी ह्या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळतायत.