कायद्यालाही झुकवणारं प्रेम - लॉ ऑफ लव्ह ट्रेलर झाला प्रदर्शित

By  
on  

प्रेमरूपी महासागरात स्वछंदी वावरणारे प्रेमी नेहमीच आपल्याला दिसतात. पण या समाजात आजही असे काही लोकं आहेत जे प्रेम करणाऱ्यांच्या मध्ये "कायदेरूपी" कुंपण घालतात. वेदिका फिल्म क्रिएशन आणि जे. उदय निर्मित "लॉ ऑफ लव्ह" हा सिनेमा असेच काहीसे भाष्य करून जातो. येत्या ४ फेब्रुवारीला हा चित्रपट महाराष्ट्रात  प्रदर्शित होणार असून नुकताच सोशल मीडियाद्वारे याचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. 

स्मार्ट, डॅशिंग, दोस्तांमध्ये फेमस असा "आदित्य" त्याच्याचं कॉलेज मध्ये असलेल्या "साक्षी" च्या प्रेमात पडतो. साक्षीदेखील सुंदर, जास्त न बोलणारी पण तितकीच कणखर अशी मुलगी. सर्व काही सुरळीत चालू असताना त्या दोघांच्या आड वेगवेगळी संकटे येतात ज्यामुळे त्यांना विरह सहन करावा लागतो. पण अखेर त्यांच्या प्रेमाला समाज कबुली देईल का....? याचे उत्तर चित्रपटगृहात नक्की मिळेल. 

चित्रपटाच्या मुख्य भूमिकेत निर्माते जे. उदय असून त्यांच्यासोबत शालवी शाहने नायिका साकारली आहे. जेष्ठ अभिनेते मोहन जोशी, यतीन कार्येकर, अनिल नगरकर, रवी कदम, योगेश पवार आणि सचिन मस्के तसेच अभिनेत्री प्राची पालवे यांच्यादेखील महत्वाच्या भूमिका आहेत. लॉ ऑफ लव्ह सिनेमाचे संगीत दिग्दर्शक पी. शंकरम असून सिनेमाची २ गाणी नुकतीच प्रदर्शित झाली आहेत. सदर गाण्यांना प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळताना सध्या दिसत आहे.

चित्रपटाच्या ट्रेलर बद्दल निर्माते आणि अभिनेता जे. उदय सांगतात, "प्रेमाच्या महिन्याची सुरुवात प्रेमाच्या सिनेमाने होते ही  आमच्यासाठी महत्वाची बाब आहे. या चित्रपटामुळे तुमचा 'व्हॅलेंटाईन' नक्कीच छान होईल याची आम्हाला खात्री आहे."
 

Recommended

Loading...
Share