दिशा बनली ‘कन्याकुमारी’, पाहा Video

By  
on  

लग्न म्हणजे कौटुंबिक उत्सवच... मित्रमंडळी, सगेसोयरे यांच्यासोबतच दोन जीवांना, दोन घरांना एकत्र आणणारा मिलनसोहळाच. प्रत्येकाची लग्नाविषयी स्वत:ची काही स्वप्नं असतात. परिकथेत रमणाऱ्या, भावी जोडीदाराची स्वप्न पहाणाऱ्या एका कन्याकुमारीची लगीनघाई आपल्याला ‘व्हिडिओ पॅलेस’ निर्मित ‘कन्याकुमारी’ या मराठमोळया अल्बममधून पहायला मिळणार आहे. नुकताच या गीताचा प्रकाशन सोहळा पारंपारिक पद्धतीने दिमाखात संपन्न झाला. एका सुंदर गीताला मिळालेली उत्तम सूर, संगीताची साथ सोबत अप्रतिम छायांकन आणि नृत्यदिग्दर्शन यामुळे ही मराठमोळी ‘कन्याकुमारी’ नववधूच्या साजिऱ्या रुपात आपल्यासमोर अवतरली आहे. लगीनघरातील माहोल, पाहुण्यांची लगबग, बच्चेकंपनीची धमालमस्ती आणि नववधूच्या मनातील हूरहूर याचे सुरेख चित्रण या गीतामध्ये पहायला मिळणार आहे. दिशा परदेशी या सुंदर अभिनेत्रीवर हे गीत चित्रीत झाले असून तिला अक्षय वाघमारे या हँडसम अभिनेत्याची उत्तम साथ लाभली आहे.

मंदार चोळकर व मिताली जोशी यांचे शब्द, चिनार-महेश या संगीतकार जोडीची उत्तम चाल आणि त्याला वैशाली सामंत सारख्या सुरेल गायिकेचा स्वर यामुळे अद्भुत रसायन जुळून आले आहे. नृत्यदिग्दर्शिका फुलवा खामकर हिने नृत्यदिग्दर्शनाची जबाबदारी अतिशय उत्तम सांभाळली आहे. अमोल गोळेच्या छायांकनाने हे गाणं सजलं असून गुरु पाटील यांनी या गीताचे संकलन केले आहे.

‘एखादया चित्रपट गीताप्रमाणे दिलेली ट्रीटमेंट खूपच कमाल असून याचं श्रेय व्हिडिओ पॅलेसच्या नानूभाई यांना देते, असं सांगत गायिका वैशाली सामंतने नानूभाईंचे आभार मानले. मोठया स्केलवरचं लग्नाचं गाणं करण्याची माझी इच्छा होती. ‘कन्याकुमारी’च्या निमित्ताने प्रेक्षकांना एक चांगलं गाणं आम्ही देऊ शकलो, असं सांगत नानूभाईंनी सर्व टीमच्या मेहनतीचे कौतुक केले. अतिशय कमी कालावधीत या गाण्यावर नृत्य करणं हा माझ्यासाठी एक टास्क होता. पण तो मी यशस्वीपणे पूर्ण केला आणि एक सुरेख गाणं करण्याची संधी मिळाल्याचा आनंद दिशा परदेशीने यावेळी व्यक्त केला. लग्नाची सगळी धमाल मस्ती या गाण्यातून दिसेल. मी स्वत: हे गाणं खूप एन्जॉय केल्याचं नृत्यदिग्दर्शिका फुलवा खामकर हिने सांगितलं. हे गाणं करायला मिळाल्याचा आनंद व्यक्त करताना अभिनेता अक्षय वाघमारे यांनी लग्नाची एक सुरेख फिल्म पाहिल्याची अनुभूती प्रेक्षकांना या गाण्यातून मिळेल असं यावेळी सांगितलं. येत्या काळात प्रत्येक लग्नसोहळयात हे गीत नक्की वाजेल असा विश्वास ‘कन्याकुमारी’च्या टीमने व्यक्त केला आहे.

 

 

Recommended

Loading...
Share