By  
on  

सलील कुलकर्णी यांच्यासोबत स्टोरीटेलिंग आणि नाती या विषयावर स्टॅनफोर्डमध्ये चर्चा

स्टॅनफोर्ड : ‘एकदा काय झालं!!’ या चित्रपटाची चर्चा भारतात तर झालीच, पण आता ती सातासमुद्रापारही होत आहे. याचं कारण म्हणजे केवळ चित्रपटाचे खेळ परदेशात लागले आहेत हे नसून आणखी एक खास कारण या चर्चेमागे आहे. मराठी चित्रपटसृष्टीला अभिमान वाटावा असा क्षण नुकताच अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठात दिग्दर्शक डॉ. सलील कुलकर्णी यांनी अनुभवला. ‘एकदा काय झालं!!’ या चित्रपटाच्या निमित्ताने संवाद साधण्यासाठी डॉ. सलील यांना स्टॅनफोर्ड विद्यापीठाने आमंत्रित केलं होतं. एका परदेशी नामांकित विद्यापीठाने एका मराठी चित्रपटाच्या दिग्दर्शकांना संवाद साधण्यासाठी विद्यापीठात बोलावणं ही सर्व मराठी लोकांसाठी अभिमानाची बाब आहे. 

‘एकदा काय झालं!!’ या चित्रपटाला परदेशातही उत्तम प्रतिसाद मिळतोय. चित्रपटाच्या विषयाला अनुसरून संवाद आणि चर्चा स्टॅनफोर्ड विद्यापीठात आयोजित करण्यात आली होती. यावेळी डॉ. अनुराग मेहराल यांनी सलील यांच्याशी संवाद साधला. मुलाखतीत, आपल्या आयुष्यात गोष्टींचं महत्त्व, कोरोनानंतर बदलेले नातेसंबंध, शिक्षकांसाठी स्टोरीटेलिंगचं महत्त्व, गोष्ट सांगणाऱ्या व्यक्तिचा आवाज, त्याचा स्पर्श तसेच मुलं व पालक यांच्यातील नाजूक नातं या विषयांवर चर्चा झाली. शाळेत मुलांना गोष्टी सांगितल्याच पाहिजेत, मात्र त्यांना गोष्टी तयार करता येते का, शिक्षकांनी त्यासाठी मुलांना कशी मदत करावी तसेच स्टोरीटेलिंग हा अभ्यासक्रमाचा भाग होणं गरजेचं आहे अशा काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर डॉ. सलील यांनी भाष्य केले.  

‘एकदा काय झालं!!’ या चित्रपटाला आता ५० दिवस पूर्ण होतील आणि अशातच स्टॅनफोर्ड सारख्या ठिकाणी या चित्रपटाविषयी चर्चा होणं ही संपूर्ण मराठी कला विश्वासाठी अभिमानाची गोष्ट आहे.

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive