जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा हे गाणं आपण शालेय जीवनापासून ऐकत आलो आहे. प्रत्येक वेळेस ते ऐकताना आपला ऊर अभिमानाने भरुन येतो. आपल्या महाराष्ट्राचं हे अभिमान गीत ऐकून अंगावर रोमांच उभे राहतात.विवर्य राजा बढे लिखित ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ या गीतामधील दोन कडव्यांना महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून स्वीकारण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत मंगळवारी घेण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून १९ फेब्रुवारीपासून हे गीत अंगीकारण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने शाहीर साबळे यांचे नातू केदार शिंदे यांनी एक पोस्ट शेअर करत याबद्दल व्यक्त झाले आहेत.
सोशल मिडीयावर सतत सक्रीय असणारे केदार शिंदे पोस्टमध्ये लिहतात,
My real Hero. #महाराष्ट्रशाहीर साबळे. बाबा, तुमच्या जन्मशताब्दी वर्षात पुन्हा एकदा तुमचा झंझावात निर्माण होतोय. महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार जय जय महाराष्ट्र माझा हे महाराष्ट्र गीत आता राज्यगीत म्हणून जाहीर करण्यात आलं. तुमच्या मनात खरच ही इच्छा असणार. १९६० पासून अव्याहतपणे तुम्ही हे गौरव गीत जगभर गाऊन प्रसिद्ध केलत. तुम्ही आता नसताना पुढच्या कितीतरी पिढ्या आता याच गाण्याला मानसन्मान देतील. या वर्षात तुमच्या जीवनावर आधारित सिनेमा सुध्दा येईल. आत्मा जागृत असतो. आणि तो जे आपल्याला हवं ते करून घेतो. तुम्ही करताय. आम्ही केवळ निमित्तमात्र. २८ एप्रिल रोजी जेव्हा तमाम जनता सिनेमा पाहील आणि तुमच्या कार्याला मानाचा मुजरा करेल, तेव्हाच मी जन्माला येण्याचं सार्थक झालं असं मला वाटेल.
दिग्दर्शक केदार शिंदे कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारित एक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात शाहीर साबळेंची भूमिका अभिनेता अंकुश चौधरी साकारतोय.