'वाजवूया बँड बाजा' चित्रपटात दिसणार अभिजीत आणि कांचनची धमाल

By  
on  

आपल्या विनोदी अंदाजात प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवणारे कलाकार नेहमीच प्रेक्षकांच्या आठवणीत आणि स्मरणात राहतात. या आठवणीत राहणाऱ्या कलाकारांच्या यादीत असलेले एक नाव म्हणजे अभिजीत चव्हाण. मराठी मालिका तसेच अनेक चित्रपट आणि कॉमेडी शोज मधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यात अभिजीतचा हातखंड म्हणायला हरकत नाही. आणि दुसरे नाव म्हणजे कांचन पगारे.

विनोदाच्या बऱ्याच परिक्रमा पूर्ण करण्यात या कलाकारांचा खारीचा वाटा आहे. अभिजीत आणि कांचन एका नव्या कोऱ्या चित्रपटातून एकत्र येत आपल्या विनोदी अंदाजात कॉमेडीचा एक मोठा धमाका प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आले आहेत. अमोल लक्ष्मण कागणे प्रस्तुत राष्ट्रीय पुरस्कार विजेते लक्ष्मण एकनाथराव कागणे निर्मित आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते शिवाजी लोटन पाटील दिग्दर्शित 'वाजवूया बँड बाजा' या चित्रपटातून हे दोघे मुख्य भूमिकेतून विनोदाचा धमाका सादर करण्यास सज्ज झाले आहेत. या चित्रपटात अभिजीत चव्हाण डॉक्टरच्या भूमिकेत आहेत. तर कांचन पगारे मुख्य नायकाच्या मित्राच्या भूमिकेत दिसले आहेत.

तीन भावांच्या आयुष्यातल्या गमती जमतींवर भाष्य करणारा वाजवूया बँड बाजा चित्रपटाची मजेशीर कथा संदीप नाईक लिखित असून प्रसंगानुरुप हास्याची कारंजे उडवणारी पटकथा आणि संवाद निशांत नाथराम धापसे यांनी लिहिले आहेत. या चित्रपटात समीर धर्माधिकारी, मंगेश देसाई, चिन्मय उदगीरकर, प्रीतम कांगणे, रुचिरा घोरमोरे, अश्विनी खैरनार आदी कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. छायाचित्रण नागराज दिवाकर यांचे असून संगीत - विजय गटलेवार,  गायक - आदर्श शिंदे, संकलन-निलेश गावंड आणि कलादिग्दर्शक-संतोष समुद्रे अशी इतर श्रेयनामावली आहेत. 

प्रेम आणि विनोदाचा समतोल राखणाऱ्या या चित्रपटात गंमतीशीर पद्धतीने केलेली मांडणी नक्कीच प्रेक्षकांच्या अंगळवळणी पडेल यांत शंकाच नाही. येत्या 20 मार्च 2020ला हा वाजवूया बँड बाजा चित्रपट सर्वत्र महाराष्ट्रात प्रदर्शित होईल.

Recommended

Loading...
Share