Movie Review : संजय जाधव यांचा धम्माल बोल्ड कॉमेडी सिनेमा ‘लकी’

पण ‘लकी’ निमित्ताने एक बोल्ड कथा आणि त्याला धम्माल कॉमेडीचा तडका घेऊन दिग्दर्शक संजय जाधव पहिल्यांदाच प्रेक्षकांसमोर येतायत. 

दिग्दर्शक:  संजय जाधव

कलाकार: अभय महाजन, दीप्ती सती, चेतन दळवी, शशांक शेंडे, शुभांगी तांबाळे, अतुल तोडणकर, आरती वाडबाळकर

लेखक:   अरविंद जगताप

वेळ: 2 तास

रेटींग :  3.5 मून

आजच्या तरुणाईची झिंगच काही वेगळी आहे. त्यांचं संपूर्ण जग कॉलेजभोवती आणि मित्र-मैत्रिणींभोवती फिरतं. अशीच नेहमीची तरुणाईचं विश्व उलगडणारी पण थोडी हटके कथा ‘लकी’ या सिनेमातून अनुभवायला मिळतेय. आजपर्यंत मराठीत बोल्ड विषयांवर सिनेमे तसे जरा कमीच पाहायला मिळतायत. पण ‘लकी’ निमित्ताने एक बोल्ड कथा आणि त्याला धम्माल कॉमेडीचा तडका घेऊन दिग्दर्शक संजय जाधव पहिल्यांदाच प्रेक्षकांसमोर येतायत.

 

कथानक

ही कथा तुमच्या आमच्या कुटूंबातली किंवा आसपास घडावी तशीच आहे. एका सर्वसामान्य घरातला मुलगा लकी भोवती सिनेमाचं कथानक उलगडतं. ज्याने कधीच आयुष्याची खरी मजा घेतलेली नाही. जो नाकासमोर चालतो आणि सातच्या आत घरी येतो असा आजच्या व्हॉट्सअॅप युगातला मुलगा आहे. पण कॉलेजमध्ये जाणा-या लकीला आपलं आयुष्यही एक्साइटिंग असावं असं वाटत असतं. आपल्या इतर मित्रांप्रमाणेच आपल्याही एखादी गर्लफ्रेंड असावी अशी लकीची इच्छा असते. याचवेळी लकी आणि त्याच्या मित्राची कॉलेजमधील सगळ्यात हॉट मुलीला पटवण्याची पैज लागते. ही पैज म्हणजे अस्मितेचा प्रश्न समजून लकीही या मुलीला पटवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतो. त्यातूनच घडतात अनेक गमती जमती. हा सिनेमा तुम्हाला हसत ठेवण्यात यशस्वी होतो. आता या मुलीला पटवण्यात लकी यशस्वी होतो का? ही हॉट मुलगी लकीला भाव देते का? कमरेभोवती टायर ट्युब लावून लकीला का पळावं लागतं? या प्रश्नांची उत्तरं सिनेमा पाहताना मिळतील.

 

 

दिग्दर्शन

संजय जाधव यांचा खास टच या सिनेमालाही लाभला आहे. विनोद आणि रोमान्स यांचा ख-या अर्थाने मेळ साधलाय तो या सिनेमात. या सिनेमातील गाणीही भन्नाट आहेत. त्यामुळे आजच्या तरुणाईला ती आपलीशी वाटतील यात शंका नाही. बोल्ड कॉमेडी या प्रकारात मोडत असलेला हा सिनेमा तुम्हाला पोट धरून हसायला भाग पाडतो.

 

 

 

अभिनय

या सिनेमाचा कथानक अगदीच आपल्याच तारुण्यातली कथा आहे, की काय असंच कधीकधी भासतं आणि ह्याचं संपूर्ण क्रेडीट अभय महाजनला जातं. सर्वसामान्य कुटूंबातला मुलगा त्याने अगदी हुबेहूब साकारला आहे. त्याने साकारलेला नायक अफलातून आहे. दीप्तीबदद्ल सांगायचं झालं तर तिचा हा पहिला मराठी सिनेमा. पण तिने ते कुठेच जाणवू दिलं नाही. तिने आत्तापर्यंत अनेक तेलुगू आणि तमिळ सिनेमांमध्ये नायिका साकारलीय. तिच्या निमित्ताने एक बोल्ड अभिनेत्रीने मराठीत पदार्पण केलं आहे.

 

 

सिनेमा का पाहावा?

आजच्या तरुणाईची व्याख्या सांगणारा लकी हा सिनेमा मनोरंजनाची हमखास गॅरण्टी देतोय. त्यामुळे जणू काही आपल्याच आयुष्यात घडतेय अशी रोमॅण्टीक धम्माल या व्हॅलेण्टाईनच्या महिन्यात आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत अनुभवण्यासाठी तुम्हाला हा सिनेमा पाहावाच लागेल.

 

Leave a Reply

avatar
  Subscribe  
Notify of