By  
on  

विकी कौशलच्या फिल्मी करियर विषयी या अनोख्या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

बॉलीवूड एक अशी मायानगरी आहे की जिथे स्वतःचं अस्तित्व टिकवणं ही सर्वात कठीण गोष्ट आहे. अनेकजण या मायानगरीत स्वतःचं नशीब आजमावायला येतात. खुप जण इथे येतात आणि जातात हे कधी कोणाला कळत नाही. परंतु काहीजण मात्र चिकाटीने स्वतःच्या कामाच्या जोरावर या मायानगरीत स्वतःच्या कामाचा ठसा उमटवतात. अशा व्यक्तींमधलं एक नाव म्हणजे अभिनेता विकी कौशल. आज 16 मे विकी कौशलचा वाढदिवस आहे.

विकी कौशलचा जन्म १६ मे १९८८ ला मुंबईत झाला. विकी कौशलचे सुरुवातीचे काही दिवस मुंबईतल्या चाळीत गेले. विकी कौशलचे बाबा श्याम कौशल हे बॉलीवूडमधील प्रसिद्ध एक्शन डायरेक्टर आणि स्टंट समन्वयक आहेत. त्यांनी '3 इडियट्स', आणि 'बजरंगी भाईजान' यांसारख्या सिनेमांसाठी काम केलं आहे. २००९ साली विकीने इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकॉम इंजीनियर या विषयाची पदवी संपादन केली. ग्रॅज्युएशन झाल्यावर आपल्या अभिनयाला विकीने खऱ्या अर्थाने सुरुवात केली.

ग्रॅज्युएशननंतर विकीला नोकरीच्या अनेक संधी चालून आल्या. परंतु अभिनयाला प्राधान्य देऊन विकीने 'किशोर नमित कपूर' यांच्या अॅक्टींग स्कूलमध्ये ऍडमिशन घेतलं. सुरुवातीला थोडाफार संघर्ष वाट्याला आला तरी २०१० मध्ये 'गैंग्स ऑफ वासेपुर' या सिनेमासाठी त्याने दिग्दर्शक अनुराग कश्यप सोबत असिसस्टंट म्हणून काम केलं आहे. पुढे दिग्दर्शक नीरज घयावन यांनी आपल्या आगामी 'मसान' सिनेमासाठी विकीला ऑडिशनसाठी बोलावलं. पुढे विकीची 'मसान' सिनेमासाठी निवड होऊन या सिनेमातून विकीने अभिनय करून प्रेक्षक आणि समीक्षक सर्वांची मनं जिंकली. त्यानंतर विकीने मागे वळून पाहिलं नाही. उत्तमोत्तम भूमिका साकारून त्याने सर्वांची मनं जिंकली.

 

गेल्यावर्षी विकीने 'राझी' आणि 'संजू' सारख्या सिनेमांत काम केले. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या 'उरी- द सर्जिकल स्ट्राईक' या सिनेमातील त्याच्या भूमिकेचं सर्वच स्तरांकडून कौतुक झालं. विकीला संजू सिनेमातील भूमिकेसाठी सर्वोत्क्रुष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. तसेच 'लव्ह पर स्क्वेअर फूट' आणि 'लस्ट स्टोरीज' सारख्या वेबसिरीज केल्याने ऑनलाईन माध्यमात सुद्धा विकी कौशलचा बोलबाला आहे.

विकी सध्या 'तख्त' आणि 'सरदार उधम सिंग' यांसारख्या सिनेमावर काम करत आहे. बॉलीवूडमधला हा हरहुन्नरी कलाकार नवनवीन सिनेमांतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत राहो, ही पीपिंगमून मराठीतर्फे विकीला सदिच्छा!

Recommended

PeepingMoon Exclusive