By  
on  

अजय देवगणच्या तानाजीमध्ये सैफनंतर आता सलमान खानची वर्णी?

अभिनेता अजय देवगणच्या तानाजी द अनसंग वॉरियर या महत्त्वकांक्षी सिनेमाच्या चित्रिकरणाला सुरुवात झालीय हे आपल्याला माहितच आहे. लोकमान्य एक युगपुरुषफेम मराठमोळा दिग्दर्शक ओम राऊत या ऐतिहासिकपटाचे दिग्दर्शन करणार आहे. या सिनेमात सैफ अली खान हा खलनायक रंगवणार असल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वीच आले होते. आता या सिनेमाबाबत आणखी एक इंटरेस्टिग गोष्ट हाती आली आहे.

एका वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, तानाजी द अनसंग वॉरियर या सिनेमात आता बॉलिवूड दबंग सलमान खानसुध्दा महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या सिनेमात सलमान खान छत्रपती शिवाजी महाराजांची महत्त्वपूर्ण भूमिका साकारु शकतो.

स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणा-या शिवाजी महाराजांच्या या संघर्षात अनेक शिलेदारांची मोलाची साथ लाभली. त्यापैकी शूरवीर योध्दे तानाजी मालुसरे यांचा सिंहाचा वाटा होता.‘आधी लगीन कोंढाण्याचं मग आमच्या रायबाचं’, असं म्हणणाऱ्या एकनिष्ठ तानाजी मालुसरे यांच्या तडफदार भूमिकेत खुद्द अजय देवगणलाच पाहायला मिळणार आहे. तर या बिग बजेट सिनेमात बॉलिवूडमधील अनेक बडे कलाकारसुध्दा महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार असल्याची एक जबरदस्त चर्चा रंगलीय.

शिवाजी महाराजांच्या भूमिका कोण साकारणार याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलं आहे. अजय देवगणच्या या सिनेमात कोणता अभिनेता कोणती भूमिका साकारणार याबाबतच्या अधिकृत घोषणेची सर्व आतुरतेने वाट पाहत आहेत. सलमान खान जर शिवाजी महाराज साकारणार असेल तर सर्वांनाच त्याला या लूकमध्ये पाहायचं आहे.

ओम राऊत दिग्दर्शित ‘तानाजी : द अनसंग वॉरियर’ हा सिनेमा पुढील वर्षी २२ नोव्हेंबर २०१९ रोजी प्रदर्शित होणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive