कपूर कुटुंबिय आर.के स्टुडिओ या प्रसिध्द उद्योग समूहाला विकण्याच्या तयारीत

By  
on  

बॉलिवूडच्या अनेक कलाकारांच्या कारकिर्दीचे चढ-उताराचा साक्षीदार व अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाचा वाटा उचलणारा कपूर कुटुंबियांचा प्रसिध्द आर. के स्टुडिओ लवकरच विकण्याचा निर्णय खुद्द कपूर कुटुंबियांनीच काही महिन्यापूर्वी घेतला होता. त्यामुळे अनेक उलट-सुलट चर्चा रंगल्या. मुंबईच्या चेंबूर येथील विस्तीर्ण अशा भूखंडावर असलेल्या या स्टुडिओला विकत घेण्याऱ्यांच्या नावाबाबत बॉलिवूड आणि उद्योग जगतात बरीच उत्सुकता होती.

एका आघाडीच्या इंग्रजी दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार, कपूर कुटुंबिय आर.के स्टुडिओ हा गोदरेज प्रॉपर्टीजसोबत    विकण्याच्या तयारीत असून या व्यवहाराची चर्चा एजंटसोबत करत आहेत. लवकरच ही डील होण्याच्या मार्गावर असल्याची चिन्हे दिसतायत. सर्व कपूर कुटुंबाकडे असणाऱ्या भूभागाच्या मालकी हक्कांच्या पडताळणीनंतर पुढील रितसर नोंदणी करण्यात येणार आहे. पण अजूनही तीन, चार व्यक्तींशी या व्यवहाराविषयी बोलणी सुरु आहेत. त्यामुळे  येत्या महिनाभरात सर्व गोष्टी स्पष्ट होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

यंदाच्या गणेशोत्सवात संपूर्ण कपूर कुटुंबिय आर.के स्टुडिओत जमले होते, तेव्हा हा त्यांचा या स्टुडिओतील अखेरचा गणेशोत्सव असल्याच्या अफवांना ऊत आला होता. परंतु आता, ते खरं होताना दिसंतय.

जवळपास 70 वर्षांपासून सिनेमांची मायानगरी अनुभवणा-या या आर.के स्टुडिओला मागच्यावर्षी भीषण आग लागली होती, या आगीत स्टुडिओचा एक मोठा भाग जळून खाक झाल्याने नुकसान झाले होते. म्हणूनच याची डागडुजी करणं उचित नसल्याचे समजून कपूर परिवाराने हा स्टुडिओ विकण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती कळते.

अभिनय, सिनेमा निर्मिती, दिग्दर्शन या क्षेत्रांमध्ये आपला ठसा उमटवत ‘शो मॅन’ म्हणून प्रसिध्द असलेले अभिनेता राज कपूर यांनी आर.के.स्टुडिओची स्थापना केली होती.

Recommended

Loading...
Share