By  
on  

‘बाहुबली’च्या वेब सीरिजमध्ये शिवगामीची भूमिका साकारणार ही मराठी अभिनेत्री

‘बाहुबली’ आणि ‘बाहुबली 2’ या दोन्ही सिनेमांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. भारतातील सर्वात बिग बजेट आणि एकापेक्षा अधिक भाषांमध्ये प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच भुरळ पाडली. आता या ‘बाहुबली’ सिनेमाची एक प्रिक्वल वेब सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

माहिश्मती साम्राज्याच्या राजमाता शिवगामी यांची कथा यात साकारण्यात येणार आहे. ‘बाहुबली: बिफोर द बिगनिंग’ असं या सीरिजचं नाव असून यातील कलाकारांचा उलगडा नुकताच झाला आहे. ही वेब सिरीज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

या प्रिक्वलमध्ये 'लव्ह सोनिया' सिनेमाद्वारे झळकलेली मराठमोळी अभिनेत्री मृणाल ठाकूर शिवागामीची भूमिका साकारणार आहे. तर अभिनेता राहुल बोस स्कंददासाच्या भूमिकेत आहे. वेब सीरिजमध्ये मृणाल ठाकूर, राहुल बोस यांच्यासोबतच अतुल कुलकर्णी, वकार शेख, जामील खान, सिद्धार्थ अरोरा आणि अनुप सोनी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

‘बाहुबली : द बिगनिंग’ आणि ‘बाहुबली : द कन्क्लुजन’ या दोन्ही भागांत रम्या कृष्णा यांनी शिवगामीची भूमिका साकारली होती. एक सामान्य स्त्री ते कणकखर व मायाळू अशी माहिश्मती साम्राज्याची राजमाता शिवगामीपर्यंतचा हा प्रवास या प्रिक्वल वेब सिरीजमध्ये रेखाटण्यात येणार आहे.

‘बाहुबली: बिफोर द बिगनिंग’ ही वेबसिरीज एकूण नऊ भागांची असणार आहे. आता सर्वांनाच या वेब सिरीजच्या प्रदर्शनाची उत्सुकता लागली आहे. बाहुबली सिनेमाने भारतात जितकी रेकॉर्डब्रेक कमाई केली, तितकंच जबरदस्त यश या वेब सिरीजलासुध्दा मिळेल का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive