By  
on  

स्वातंत्र्यवीर सावरकरांवर येतोय हिंदीत सिनेमा, महेश मांजरेकर करतायत दिग्दर्शन

, स्वातंत्र्यसैनिक 'वीर सावरकर' बनून रणदीप हुडा आता प्रेक्षकांसमोर येतोय. या ऐतिहासिक सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा प्रसिध्द दिग्दर्शक महेश मांजरेकर करतायत. 'स्वतंत्र वीर सावरकर ' या सिनेमाच्या चित्रीकरणाला जून २०२२ पासून सुरुवात होणार आहे. या सिनेमाचं चित्रीकरण लंडन, महाराष्ट्र, अंदमान-निकोबारमध्ये केलं जाणार असल्याचंही दिग्दर्शक मांजरेकर यांनी सांगितलं आहे. सिनेमाची निर्मिती संदीप सिंह करणार आहे. या सिनेमात भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील वेगवेगळे टप्पे दाखवले जाणार आहेत.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांची भूमिका साकारण्यासाठी आपण खूप उत्सुक असल्याचं रणदीप हुडा यानं सांगितलं आहे. रणदीपनं पुढं सांगितलं की, ' स्वातंत्र्य लढ्यामध्ये अनेक सेनानी सहभागी झाले होते. या लढ्यामध्ये त्या सर्वांनी अतिशय मोलाचं योगदान दिलं आहे. परंतु त्यातील अनेकांना योग्य ते महत्त्व दिलं गेलं नाही. विनायक दामोदर सावरकर यांना देखील कुणीच समजून घेतलं नाही. उलट त्यांच्याबद्दल अनेक चुकीच्या गोष्टी दाखवत त्यांना चूक ठरवलं गेलं आहे. अशा सेनानींच्या गोष्टी सर्वांसमोर यायलाच हव्यात.' रणदीपन दुसऱ्यांदा संदीप सिंहबरोबर काम करत आहे. याआधी त्यानं २०१६ मध्ये आलेल्या 'सरबजीत' सिनेमात काम केलं होतं. वीर सावरकर यांची भूमिका साकारणं हे माझ्यासाठी अत्यंत आव्हानात्मक असल्याचं रणदीपनं आवर्जून सांगितलं.

  दिग्दर्शक महेश व्ही मांजरेकर म्हणतात, “आम्ही ज्या कथांकडे दुर्लक्ष केले होते ते सांगण्याची हीच योग्य वेळ आहे.  स्वतंत्र वीर सावरकर हे एक उत्कंठावर्धक सिनेमॅटिक कथन असेल जे आपल्याला आपल्या इतिहासाची उजळणी करण्यास भाग पाडेल.  मला संदीप सिंगसोबत काम करायचे होते आणि हा चित्रपट आम्ही एकत्र करत आहोत याचा मला आनंद आहे.”  दिग्दर्शक त्यांच्या संशोधन पथकासह जवळपास वर्षभरापासून या विषयावर काम करत आहेत.
 

Recommended

PeepingMoon Exclusive