प्रसिद्ध फॅशन डिझायनर व मॉडेल मुस्कान नारंगने आत्महत्या केल्याचं धक्कादायक वृत्त आहे. २५ वर्षीय मुस्कानने बेडरुममध्ये गळफास घेत जीवन संपवलं. याबाबत माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. मुस्कानचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रवाना केला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथील राम गंगा विहार कॉलनीत मुस्कानचं कुटुंब राहतं. मुस्कानने देहरादून येथे फॅशन डिझायनिंगचा कोर्स केला होता. त्यानंतर मुंबईत येऊन ती फॅशन डिझायनिंगमध्ये जॉब करत होती.
आत्महत्या करण्यापूर्वी मुस्कानने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन व्हिडीओ शेअर केला होता. “हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे. यानंतर कदाचित मी तुम्हाला कधी दिसणार नाही. प्रॉब्लेम शेअर केल्यानंतर सगळं व्यवस्थित होतं, असं लोक म्हणतात. पण, असं काहीच होत नाही. माझे आई-वडील, बहीण, भाऊ, मित्रमैत्रिणींबरोबर बोलण्याचा मी खूप प्रयत्न केला. पण सगळे मलाच समजवायला लागले. आज मी जे काही करणार आहे, ते माझ्या इच्छेने करत आहे. यासाठी कोणालाही दोषी ठरवलं जाऊ नये,” असं तिने व्हिडीओत सांगितलं होतं.