By  
on  

‘ये ‘सदमा’ भूल ना पायेंगे, हुरहुर लावून गेलेल्या ‘चांदनी' श्रीदेवीचा आज प्रथम स्मृतीदिन

बॉलिवूडला पडलेलं सुंदर स्वप्न म्हणजे श्रीदेवी, अभिनयातील परकाया प्रवेशाची सम्राज्ञी म्हणजे श्रीदेवी, एका क्षणात चेह-यावर असंख्य हावभाव आणणारी कसलेली अभिनेत्री म्हणजे श्रीदेवी.

आज वर्षापूर्वी ती आपल्यामधून निघून गेली. अत्यंत अनपेक्षित प्रकारे तिच्या जाण्याने प्रत्येकालाच धक्का बसला आहे. बॉलिवूडवर राज्य करणा-या या बॉलिवूड सम्राज्ञीचा बाथटबमध्ये बुडून मृत्यू व्हावा यासारखं दुर्दैव कोणतं. ‘बॉलिवूडची पहिली महिला सुपरस्टार’ असा किताब मिळवलेल्या श्रीदेवीचा आज प्रथम स्मृतीदिन. श्रीदेवीने जवळपास पाच दशकं बॉलिवूडवर राज्य केलं.

तिने वयाच्या चौथ्या वर्षापासून बॉलिवूडवर राज्य करायला सुरुवात केली. तर ‘सोलवा सावन’ हा तिचा पहिला हिंदी सिनेमा. ‘हिम्मतवाला’ सिनेमाने तिला बॉलिवूडमध्ये उभं रहायची हिम्मत दिलीच याशिवाय अभिनेत्री म्हणून नाणं खणखणीत वाजायला सुरुवात झाली.

त्यानंतर तिने मागे वळून पाहिलंच नाही. मि. इंडिया, चांदनी, सदमा, नगिना, चालबाज, लम्हे, खुदा गवाह, लाडला, जुदाई हे सिनेमे उल्लेखनीय ठरले. बोनी कपूरशी लग्न केल्यानंतर जान्हवी अणि खुषी या मुलींच्या जन्मानंतर श्रीदेवी पडद्यापासून लांब राहिली. पडद्यावरची ही चांदनी, पडद्यामागे मुलींची आई म्हणून मिरवण्यात धन्यता मानू लागली.

https://www.instagram.com/p/BmY_9-BBful/?utm_source=ig_web_copy_link

पण श्रीदेवीमधील अभिनयाचा जीन्स तिला स्वस्थ बसू देईना. या दरम्यान मुलीही थोड्या मोठ्या झाल्या होत्या. श्रीदेवीने पुन्हा पदार्पण करण्याचं ठरवलं. यावेळी तिला नवरा आणि मुलींची खंबीर साथ होती. इंग्लिश विंग्लीशमधून तिने पदार्पण केलं आणि तिच्या अभिनयातील करिष्मा कायम असल्याचं जाणवून दिलं. त्यांनतर आलेल्या ‘मॉम’ने तिच्यातील सशक्त अभिनेत्रीचा प्रत्यय आला. तिच्या चाहत्यांना आजही तिची उणीव भासते. पण एकदा टी.व्ही ऑन केलात तर दिसेल, ही ‘चांदनी’ कुठे गेलीच नाही. ती आजही आपल्या मनात लूकलूकत आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive