By  
on  

मिशन मंगल Review: सामान्य महिलांच्या असामान्य कर्तृत्वाची रोमांचक कहाणी

मिशन मंगल

कलाकार:अक्षय कुमार, विद्या बालन, तापसी पन्नु, सोनाक्षी सिन्हा, किर्ती कुल्हारी, शर्मन जोशी

दिग्दर्शक: जगन शक्ती

रेटींग: 4.5 मुन्स

अंतरीक्ष किंवा स्पेस सायन्सवर सिनेमा बनवणं हे एक शिवधनुष्यच. कल्पनेत दिसणारी गोष्ट त्यातली वास्तविकता जपत रुपेरी पडद्यावर हुबेहुब मनोरंजक पद्धतीने प्रेक्षकांना दाखवणं हे कोणत्याही दिग्दर्शकासाठी एक आव्हानच. हे आव्हान जर यशस्वी झालं तर 'स्वदेस' सारखं कौतुक होतं अन्यथा 'झीरो' सारखी फजिती होते. परंतु दिग्दर्शक जगन शक्ती यांनी हे आव्हान यशस्वीरित्या पेललं आणि भारताच्या मंगळमोहीमेमागची रोमांचक कहाणी 'मिशन मंगल'मधुन रुपेरी पडद्यावर साकारली.

कथानक:
बेंगळुर शहरापासुन सिनेमाची गोष्ट सुरु होते. कुटूंब आणि नोकरी ही तारेवरची कसरत सांभाळाणा-या विवाहीत महिलेच्या भुमिकेत विद्या बालन दिसते. भारताचे संशोधनकेंद्र GSL फॅट बाॅय लाँच करण्याच्या तयारीत आहे. परंतु काही कारणातास्तव हे लाॅन्चिंग असफल होतं. त्यानंतर वैज्ञानिक राकेश धवन(अक्षय कुमार) हा विद्यासह मंगळयान लाँच करण्याचं स्वप्न पाहतो. त्यासाठी त्याला अनुभवी टीमची मदत हवी असते. परंतु अनुभव कमी असलेल्या काही नावांची यादी राकेशला दिली जाते. त्यानंतर एकएक करुन ही नावं राकेशला जोडली जातात. पुढे मंगळयानाचं स्वप्न साकार होण्यासाठी या टीमसमोर अनेक अडचणी येतात. परंतु तरीही सर्वजण जिद्दीने या अडचणींचा सामना करुन मंगळयान मोहीम कशी पुर्ण करतात याची उत्कंठावर्धक गोष्ट 'मिशन मंगल' मधुन पाहायला मिळते. 

दिग्दर्शन: 
हा सिनेमा भारताच्या मंगळमोहीमेवर आधारीत असल्याने जगन शक्ती यांनी सिनेमाची वास्तविकता जपण्याचा प्रयत्न केला आहे. मध्यंतरापर्यंत त्यांनी प्रत्येक व्यक्तिरेखेची ओळख प्रेक्षकांन् करुन दिली आहे. मध्यंतरानंतर मात्र हा सिनेमा वेग पकडतो आणि प्रेक्षकांना खुर्चीवर बांधुन ठेवतो. घर आणि ऑफीस तितक्याच तत्परतेने सांभाळणा-या महिलांचं योग्य चित्रण जगन शक्तींनी केलं आहे. 

 

अभिनय:
अक्षय कुमार हा सध्या आपल्या करियरच्या परमोच्च शिखरावर आहे. 'मिशन मंगल'मधुन अक्षयने पुन्हा एकदा कडक परफाॅर्मन्स दिला आहे. वरवर पाहता हा सिनेमा महिलाप्रधान आहे. परंतु तरीही अक्षय आपल्या अभिनयाची छाप सोडतो. विद्या बालनने नेहमीच्या सहजतेने आणि डोळ्यांमधल्या निरागस भावांनी महिला वैज्ञानिक साकारली आहे. इतर भुमिकांमध्ये असलेले तापसी पन्नु, शर्मन जोशी, सोनाक्षी सिन्हा, किर्ती कुल्हारी या कलाकारांनी आपल्या भुमिका चोख साकारल्या आहेत. 

सिनेमा का पाहावा?
अक्षय कुमारच्या करियरमधला आणखी एक दर्जेदार सिनेमा पाहण्यासाठी हा सिनेमा अजिबात चुकवु नये असा आहे. अक्षय कुमार आणि विद्या बालनच्या अभिनयाची जुगलबंदी पाहायला मजा येते. खुपवेळेस मोठ्या मोहीमेमागची मेहनत समोर येत नाही. भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणा-या या वैज्ञानिकांची मेहनत आणि कष्ट 'मिशन मंगल' अनुभवायला मिळतील.

Recommended

PeepingMoon Exclusive