By  
on  

Exclusive: राष्ट्रीय पुरस्कार विजेते ज्येष्ठ संगीतकार खय्याम यांच्या प्रकृतीत सुधारणा

हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय संगीत दिग्दर्शक खय्याम यांना प्रकृती बिघडल्यामुळे मुंबईतील सुजॉय हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आहे. खय्याम यांची प्रकृती खूप नाजूक आहे. पिपिंगमुनने एक्सक्लुझिव्हली सुजॉय हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांशी बातचीत केली. खय्याम यांच्या प्रकृती संदर्भात विचारणा केली असता कर्मचारी म्हणाले,''फुफ्फुसांमध्ये इन्फेक्शन झाल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं होतं. परंतु आता त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत आहे. सुरुवातीला ते उपचारांना रिस्पॉन्स देत नव्हते. परंतु आता ते उपचारांना योग्य तो प्रतिसाद देऊन थोडंसं बोलत सुद्धा आहेत. त्यांची तब्येत आधीपेक्षा निश्चितच सुधारली आहे.''

खय्याम यांची पत्नी सुद्धा हॉस्पिटलमध्ये दाखल होती. परंतु त्यांच्या तब्येतीत सुधारणा होऊन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. खय्याम यांनी हिंदी सिनेसृष्टीतील अनेक लोकप्रिय सिनेमांना संगीत दिले आहे. 'कभी कभी', 'उमराव जान'  या दोन सिनेमांमधील त्यांनी संगीतबद्ध केलेली गाणी आजही ऐकली जातात. 'उमराव जान' सिनेमांमधील गाण्यांसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

वयाच्या १७ व्या वर्षापासून  त्यांनी संगीत दुनियेतील आपल्या प्रवासाला सुरुवात केली. त्यांना आजवर राष्ट्रीय तसेच फिल्मफेयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 

Recommended

PeepingMoon Exclusive