भावनिक कथेला मनोरंजनाची झालर असलेल्या ‘बबली’ सिनेमाचा फर्स्ट लूक

By  
on  

मराठी चित्रपट त्याच्या आशयघनतेसाठी प्रसिद्ध आहे. मराठी सिनेमांनी कायम दुहेरी यश मिळवत जगभरातील मराठी रसिकांचा आनंद द्विगुणित केला आहे. काही मराठी सिनेमे देशविदेशांतील सिनेमहोत्सवांमध्ये मराठीची पताका उंचावत रसिकांच्या भेटीला येतात, तर काही थेट बॉक्स ऑफिसवर आपली कमाल दाखवतात. विषयाचे वेगळेपण ही मराठी चित्रपटांची ओळख झाली आहे. अशाच एका आगळ्यावेगळ्या विषयावर आधारित एक नवीन सिनेमा येऊ घातलाय ज्याचं नाव आहे ‘बबली’. लेखक-दिग्दर्शक यांनी एका भावनिक कथेला मनोरंजनाची झालर लावत एक उत्तम सिनेमा तयार केला आहे.

सर्व पालक आपल्या मुलांना कुठल्यातरी टोपण नावाने बोलावत असतात. बेबी, बंटी, पिंकी, बबली किंवा तत्सम. पुढे मोठे झाल्यावर ही टोपण नावं, हवी-नको असली तरी, चिकटूनच राहतात. काही वर्षांपूर्वी अभिषेक बच्चन आणि राणी मुखर्जी यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘बंटी और बबली’ नावाचा चित्रपट येऊन गेला. सत्य घटनांवर आधारित हा चित्रपट हिट ठरला होता व आता त्याचा सिक्वेल ही येऊ घातलाय. मराठी प्रेक्षकांसाठी एक नवीन चित्रपट येतोय ज्याचे नाव आहे ‘बबली’. ही बबली आणि राणी मुखर्जी ची बबली यांच्यात नावाव्यतिरिक्त काहीही साधर्म्य नाहीये. लेखक-दिग्दर्शक यांनी मराठी ‘बबली’ मधून एका गोड मुलीची कहाणी चित्रित केली आहे. त्या व्यक्तिरेखेचा प्रवास लहानपणापासून ते तिच्या तारुण्यातील लग्नाच्या निर्णयापर्यंत पोहचण्यापर्यंतचा आहे. नुकतेच या चित्रपटाच्या चित्रफलकाचे अनावरण करण्यात आले व  सिनेमाबद्दलची उत्सुकता वाढली आहे.

मराठी संस्कृती मध्ये साधारणतः समोरच्याला आदराने दादा, ताई, काकू, भाई अशा विविध आदरार्थी वचनांनी संबोधले जाते. परंतु हल्लीच्या तरुणाईमध्ये दादा किंवा ताई म्हटलं की त्यांना सहसा ते आवडत नाही. ‘तू काही बी म्हण बबले पण दादा नको म्हणू’ अशी टॅगलाईन असलेला ‘बबली’ हा चित्रपट त्याच्या कथानकाबद्दल बरंच काही सांगून जातो असं वाटत असलं तरीही कथानकातील वळणं प्रेक्षकांना आश्चर्यचकित करण्याची शक्यता आहे असे दिग्दर्शकाचे म्हणणे आहे. रॉबर्ट मेघा यांनी दिग्दर्शनाची धुरा वाहिली आहे. कथा सतीश सामुद्रे यांची असून त्यांनीच निर्मितीची जबाबदारी घेतली आहे.

पॅशन मुव्हीज प्रा.ली.ची प्रस्तुती असलेला ‘बबली’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

 

Recommended

Loading...
Share