By  
on  

बाळासाहेबांच्या कृपेमुळे मृत्यूच्या दाढेतून परतले होते बिग बी

बॉलिवुड शहनशाह अमिताभ बच्चन यांना ‘कुली’ सिनेमाच्या सेटवर झालेल्या त्या भीषण अपघाताच्या ‘त्या’ आठवणीचा नेहमीच आवर्जून उल्लेख केला जातो. बंगळूर येथे शूटींगदरम्यान बिग बींना जबर दुखापत झाली होती. 26 जुलै 1982 सालची घटना आहे. तीन दिवस हॉस्पिटलमध्ये असलेल्या बिग बींवर कुठलेच उपचार लागू पडत नव्हते. तब्येतीत काहीच सुधारणा नव्हती उलट ती बिकटच होत चालली होती. देशभरातील त्यांच्या चाहत्यांकडून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी प्रार्थना सुरू होत्या. अनेकांनी तर देव पाण्यात ठेऊन उपास-तापास आणि नवससुध्दा केले.

मग त्यानंतर लगेचच बिग बींना मुंबईला हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. पण इथे एक मोठी अडचण होती ती सांताक्रूझ विमानतळावरुन त्यांना दक्षिण मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात नेण्यासाठी मोठ्या अॅम्ब्युलन्सची आवश्यकता होती. तेव्हा डॉ.भडकमकर मार्ग (लॅमिंग्टन रोड) येथील शिवसेना शाखेत अशी मोठी अॅम्ब्युलन्स होती. तेथील नगरसेवक आणि शाखाप्रमुखांना जसं कळलं की अमितजींना या अम्ब्युलन्सची आवश्यकता आहे, तसं त्यांनी लगेचच व्यवस्था केली.

अपघातातून पूर्णपणे बरे झाल्यानंतर बिग बी यांनी पुन्हा कुलीच्या शूटींगला सुरुवात केली. काही दिवसानंतर एप्रिल महिन्यात दक्षिण मुंबईतील त्या शिवसेना शाखेचा वर्धापन दिन धोबीतलाव येतील रंगभवन येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी अमिताभ बच्चन हे प्रमुख पाहुणे होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि बिग बी एखाद्या कार्यक्रमात एकत्र मंचावर येण्याची ही पहिलीच वेळ होती. यावेळी खुद्द अमिताभ बच्चन यांनीच उपस्थितांसमोर भावूक होत, शिवसेनेमुळे आपल्यावर कसे वेळीच उपचार घडले हे सर्वांना सागितले. त्यानंतर कधीही ‘कुली’ सेटवरील अपघाताचा विषय निघाल्यावर अमिताभ बच्चन शिवसेनेच्या मदतीचा उल्लेख करायला विसरत नसत.

तसंच बिग बी यापूर्वी अनेकदा म्हणाले होते, बाळासाहेब आणि माझे घरोब्याचे संबंध आहेत. अनौपचारिक भेटीत आम्ही अनेक विषयांवर चर्चा करतो. जेव्हा बाळासाहेबांचं निधन झालं होतं तेव्हा हजारोंच्या गर्दीत शांतपणे बसलेले अमिताभजी आजही सर्वांना आठवत आहेत. अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब ठाकरे यांच्याशी जोडलेली हि आठवण नक्कीच आपल्या सर्वांना भावुक करणारी आहे. 

Recommended

PeepingMoon Exclusive