By  
on  

Movie Review: 'पानीपत'चा रणसंग्राम रुपेरी पडद्यावर आवर्जुन अनुभवा

सिनेमा: पानिपत 

दिग्दर्शक: आशुतोष गोवारीकर 

कलाकार: अर्जुन कपूर, क्रिती सेनन, संजय दत्त, मोहनीश बेहेल आणि इतर 

रेटिंग: ४ मुन्स 

 

भारतीय इतिहासातलं एक ज्वलंत पर्व म्हणजे 'पानीपत'ची लढाई. आशुतोष गोवारीकर 'पानीपत' सिनेमातुन हे ज्वलंत पर्व भव्य रुपात प्रेक्षकांसमोर आणले आहे. 'पानीपत'च्या लढाईचा काहीसा गुंतागुंतीचा इतिहास आशुतोश गोवारीकरांनी अत्यंत सफाईने सिनेरसिकांपर्यंत पोहचवला आहे. 

कथानक:
'पानीपत'ची गोष्ट घडते 18 व्या शतकात. जिथे 'पानीपत'ची तिसरी लढाई झाली. अहमदशहा अब्दालीची अफगाण सेना आणि सदाशिवराव भाऊसोबत असणारे पेशवे यांच्यामधील घनघोर युद्धावर हा 'पानीपत' आधारलेला आहे. अहमदशाह अब्दालीने मराठ्यांचा या लढाईत पराभव केला हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. परंतु यामागचं तत्कालिन राजकारण, मराठेशाहीचा सुवर्णकाळ आशुतोष गोवारीकरांनी 'पानीपत' मधुन दाखवला आहे. सदाशिवराव भाऊंची ताकद आणि त्यांच्यामागे असलेली पार्वतीबाईंची भक्कम साथ या सर्व गोष्टी 'पानीपत' मधुन प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यशस्वी झाले आहेत. 

अभिनय:

मध्यांतरापूर्वीचा 'पानीपत' तुम्हाला खिळवून ठेवतो आणि मध्यांतरानंतर आपण अधिकाअधिकच त्यात गुंतत जातो. सदाशिव रावांच्या भूमिकेतून अर्जुन कपूरने सिनेमात आपल्या अभिनयाची चुणूक दाखवण्यात यश मिळवलं आहे. मराठा साम्राज्याचं त्याकाळचं वैभव आणि त्या दिमाखाला साजेशाच भूमिका अर्जुन कपूर आणि क्रिती सेनॉनने साकारल्या आहेत. इथे क्रितीचा उल्लेख प्रामुख्याने करावा लागेल. तिने अगदी सहज-सुंदर पार्वतीबाई साकारुन प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. ती अगदी सरप्राईज पॅकेजप्रमाणे सिनेमात वावरली. काही सीन्समधली अर्जुन-क्रितीची रोमॅण्टीक केमिस्ट्री भावते. तर आपल्या मराठमोळ्या पानिपतकारांची तर बातच न्यारी ! रविंद्र महाजनी, गश्मीर महाजनी, पद्मिनी कोल्हापुरे आपापल्या भूमिकांमधून नेहमीप्रमाणेच भाव खाऊन गेले आहेत.

सिनेमा का पाहावा?
आजच्या पिढीला सहजसोप्या पद्धतीने 'पानीपत'च्या लढाईचा रणसंग्राम या सिनेमातुन कळुन येईल. मराठेशाहीचा पराभव कसा झाला आणि त्यानंतरही या लढाईचा परिणाम किती सर्वदुर झाला, याची कहाणी 'पानीपत' मधुन अनुभवता येईल. ऐतिहासिक सिनेमांचे चाहते असणा-यांना 'पानीपत' एक पर्वणी असणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive