Movie review: समाजाच्या रुढीवादी विचारावर दिलेली सणसणीत ‘थप्पड’

By  
on  

पुरुषप्रधान समाजात स्त्रियांना कायमच नमतं घेण्याची शिकवण दिली जाते. यदाकदाचित तिने अन्यायाविरोधात आवाज उठवलाच. तर त्याची जबर किंमत अनेकदा चुकवावी लागते. पण त्यामुळेच मानसिकदृष्ट्या, शारिरीकदृष्ट्या तिचं खच्चीकरण होताना दिसतं. थप्पडमधून घरगुती हिंसेच्या मुद्द्यावर प्रकाश टाकला आहे. ‘सहन कर’ या प्रवृत्तीचा विरोध या सिनेमातून प्रभावीपणे केला आहे. 

 

 

अमृता (तापसी पन्नू) पती विक्रम आणि सासू (तन्वी आजमी) सोबत राहात असते. अमृता संसाराशी कुटुंबासाठी खुपच एकनिष्ठ असते. घरी असलेल्या पार्टीमध्ये नशेत असलेल्या पतीची समजूत काढताना तो तिच्यावर हात उचलतो. सगळ्यांसमोर झालेल्या या कृतीने अमृता स्तब्ध होते. त्यानंतर विक्रम तिला समजावयाचा खुप प्रयत्न करतो.

पण ती त्याची ही कृती विसरू शकत नाही. अमृता विक्रमपासून वेगळं होण्याचा निर्णय घेते. आई-वडिलांच्या घरी जाऊन राहते. या कायदेशीर बाबीमध्ये अमृताला नेत्रा राजहंस (माया सराओ) मदत करते. आता अमृताचा कायदेशीर घटस्फोट होतो का? अमृता विक्रमचं म्हणणं ऐकते का? अमृता आत्मसन्मानासाठी काय करते? हे सिनेमा पहिल्यावर कळेल. 

सिनेमासाठी दिग्दर्शक अनुभव सिन्हाचं अभिनंदन करायला पाहिजे. कारण मुळात पत्नी वर सहज हात उचलणे हा गुन्हा याची अनेकांना माहितीच नसते. त्यामुळे घरगुती हिंसेचे प्रकार आजही राजरोस होताना दिसतात. या सिनेमात अमृताशी जोडलेल्या पाच वेगवेगळ्या परिस्थितीतील स्त्रियांचं आयुष्यही समोर येताना दिसतं. त्यामुळेच हा सिनेमा कृत्रिम किंवा जड न वाटता आपल्या आसपास घडताना वाटतो.

हा सिनेमाची महत्त्वाची बाब म्हणजे अभिनय. तापसीच्या अभिनयाने सिनेमात जान ओतली आहे. पण त्याला पुरक ठरला आहे इतर कलाकारांचा अभिनय. याशिवाय दमदार पटकथा सिनेमाला ट्रॅकशी बांधून ठेवते. वेगळा दृष्टीकोन देणारा हा सिनेमा जरूर पाहायला हवा.

Recommended

Loading...
Share