By  
on  

Exclusive : “मी बासू दा यांचे सिनेमे पाहत मोठी झाली आहे”, बासू चॅटर्जी यांच्या निधनांतर अभिनेत्री उषा जाधवने जागवल्या या आठवणी 

प्रसिद्ध दिग्दर्शक बासू चॅटर्जी यांचं वृध्दापकाळाने गुरुवारी सकाळी निधन झालं आहे. ते 90 वर्षांचे होते. त्यांची सिनेसृष्टीत बासू दा अशी ओळख होती. सिनेसृष्टीतील त्यांच्याकडून प्रेरणा मिळालेल्या कित्येक कलाकारांचं त्यांना भेटायचं स्वप्न असेल, त्यांच्यासोबत काम करण्याचं स्वप्न असेल. मात्र अशीच एक अभिनेत्री आहे जिला त्यांना भेटण्याची संधी मिळाली होती. आणि ही भेट तिच्यासाठी अविस्मरणीय आहे. 
राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री उषा जाधवला बासू चॅटर्जी यांना भेटण्याची संधी मिळाली होती. ‘धग’ या मराठी सिनेमासाठी उषाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. 60व्या या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात बासू दा यांना उषा भेटली होती. पिपींगमून मराठीला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत उषाने त्या भेटीची खास आठवण शेयर केली आहे. उषा म्हणते की, “मी बासू यांचे सिनेमे पाहत मोठी झाली आहे. मला त्यांचे सिनेमे प्रचंड आवडतात आणि त्यांचे सिनेमे मी कित्येकदा पाहिले आहेत. माझ्या आयुष्यात एक असा क्षण आला होता जेव्हा 2013मध्ये मला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला तेव्हा बासू दा हेड ऑफ द ज्युरी होते. मी त्यांना भेटले आणि तेव्हा मी खूप आनंदी होते. ज्यांचे सिनेमे मला प्रचंड आवडतात त्यांना भेटले होते, त्यांच्यासोबत बोलत होते. त्यांनाही माझा सिनेमा आवडला होता. मी काम केलेल्या सिनेमाचं आणि माझ्या कामाचं ते कौतुक करत होते.”

 

याविषयी बोलत असताना उषा पुढे सांगते की, “बासू दा हे स्पीच देत होते. तेव्हा त्या स्पीचमध्ये त्यांनी माझं नाव घेतलं होतं. कुणाचही नाव न घेता त्यांनी माझं नाव घेतलं होतं ते मला कायमच लक्षात राहील. ते मला बोलले होते की ”सध्या मी फिल्म बनवत नाही. पण बनवत असतो तर तुझ्यासोबत काम करायला मला आवडलं असतं.”बासू चॅटर्जी यांच्या सिनेमांची उषा ही मोठी चाहती आहे. याविषयी ती म्हटली की, “‘छोटीसी बात’, ‘बातों बातों में’, ‘रजनीकांत’ त्यांचे हे सिनेमे मला प्रचंड आवडतात. या सिनेमांमधली गाणीही मला प्रचंड आवडतात. आणि लहानपणापासून हे सिनेमे खूप पाहिले आहेत. आजही कधी हे सिनेमे टेलिव्हीजनवर लागले तर मी सगळं काम सोडून ते पाहते. ते कायमच आपल्या आठवणीत राहणार आहेत. त्यांच्या सिनेमांच्या माध्यमातून ते कायम स्मरणात राहतील.”

 

बासू चॅटर्जी यांच्या सिनेमाचं वैशिष्ट्य म्हणजे सामान्य आणि मिडल क्लास लोकांच्या कथा ते अगदी सुंदर पद्धतिने मांडायचे.त्यांच्या निधनाने सिनेविश्वात शोककळा पसरली आहे. हेही तितकच खरयं की  त्यांच्या सुंदर सिनेमांमधून ते कायमच सिनेप्रेमींच्या ह्दयात राहतील आणि प्रेक्षकांचं मनोरंजन करतील.

Recommended

PeepingMoon Exclusive