By  
on  

Mother’s Day Exclusive: पडद्यावरच्या नम्रतामध्ये जी तुम्ही प्रचंड उर्जा पाहाताय ती फक्त आणि फक्त माझ्या लेकामुळेच- हास्यक्वीन नम्रता आवटे- संभेराव

आई ही आई असते मग ती पडद्यावरची असो किंवा मग पडद्यामागची. मुलांवर निस्सीम प्रेम करणं त्यांना घडवणं  हे ती तिचं आद्य कर्तव्य समजते. म्हणूनच जगात आईला तोड नाही. आई या दोन शब्दांत मुलाचं अवघं जग सामावतं. 
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या विनोदी कार्यक्रमातून रसिक प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणारी आणि विविध धमाकेदार कॅरेक्टर्समधून मनं जिंकणारी  महाराष्ट्राची हास्यक्वीन  अभिनेत्री नम्रता आवटे-संभेरावसोबत  यंदाच्या मदर्स डे निमित्ताने पिपींगमून मराठीने केलेली ही खास बातचित

 

तुझा मुलगा रुद्राजच्या जन्माची एखादी खास आठवण सांगशील का? 

-   माझा मुलगा रुद्राज हा केवळ दोन वर्षांचा आहे. तो माझ्या आयुष्यात आनंद आणि भरभराट घेऊन आला आहे. पडद्यावरच्या नम्रतामध्ये आता जी तुम्ही प्रचंड उर्जा पाहाताय ती फक्त आणि फक्त रुद्राजमुळेच आहे. त्याच्या जन्माची आठवण माझ्यासाठी खुप स्पेशल आहे.
जेव्हा पहिल्यांदा महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात झळकण्याची संधी मला चालून आली, तेव्हा मी खुप आनंदात होते. मी लगेचच यासाठी माझा होकार कळवून टाकला. आमच्या कार्यक्रमाला, रिहर्सल्सला सुरुवात झाली होती आणि काही महिन्यातच मी आई होणार असल्याची गोड बातमी मला मिळाली.  मी आनंदात तर होतेच, पण आता काय करायचं बाळासाठी  शो मला अर्ध्यावर सोडून द्यावा लागतोय का काय अशी भीती मानत बाळगून होते, पण हास्यजत्रेच्या निर्मात्यांनी माझी ती चिंतासुध्दा दूर केली. प्रेग्नेंट असूनही मी माझं करिअर माझी अभिनयाची आवड जोपासली. अनेक स्किट्स केले आणि रुद्राजच्या जन्मानंतर  तीन महिन्यांची सक्तीची सुट्टी घेऊन पुन्हा नव्या जोमाने शोमध्ये परतले. 

 


 

करिअर निमित्ताने सतत घराबाहेर असताना आपण आपल्या मुलाच्या जडण-घडणीसाठी वेळ देऊ शकत नसल्याचा गिल्ट येतो का ? 
-  हो येतो, खुप गिल्ट येतो. आता हेच पाहा ना, आपल्या महाराष्ट्रात करोना लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर चित्रिकरणाला बंदी आहे. त्यामुळेच गेले 10-12 दिवसांपासून आम्ही महाराष्ट्राची हास्यजत्राची संपूर्ण टीम दमणमध्ये शूटींग करतोय. म्हणून मी इतके दिवस झाले माझ्या मुलाला प्रत्यक्ष भेटू शकत नाहीय, पण माझी पण काही मजबूरी आहे. आर्थिक गणितं जुळवण्यासाठी करिअरसाठी मला ते करणं भागचं आहे. पण या सर्वात माझ्या कुटुंबाचा मला खुप मोठा आधार आहे. माझा नवरा योगेश संभेराव आणि माझ्या सासूबाई  रुद्राजची प्रचंड काळजी घेतात. त्याला योग्य वळण आणि शिस्त लावतात. त्यामुळेच मी निर्धास्त माझं काम करु शकते. आई घराबाहेर असल्यामुळे कुठं काही अडतंय हा गिल्ट हे दोघं माझ्यापर्यंत पोहचू देत नाहीत. या दोघांचे मी जितके आभार मानावे तितके कमीच आहेत. 
रुद्राजही गुणी मुलासारखाच नेहमी वागतो, आई नाहीय म्हणून रडणं हा प्रकारच त्याला माहितच नाही. पण मला मात्र त्याच्यापासून दूर असल्यावर दररोज रडू कोसळतं. 

तुझे धमाकेदार स्किट्स आणि त्यातील अफलातून कॅरेक्टर्स पाहताना रुद्राजची काय प्रतिक्रीया असते ? 

-  माझे सर्वच स्किट्स स्क्रिनवर तो एन्जॉय करतो. त्याला माझं लॉली कॅरेक्टर खुप म्हणजे खुप आवडतं खरं तर त्याला त्यातलं कळत नाही. पण मी दिसली की तो मला अचूक ओळखतो. एखाद्या स्किट्समध्ये जर मी काही विशेष प्रकारचे आवाज किंवा हावभाव केले असतील तर तोही त्याचं अगदी अचूक अनुकरण करतो. मध्यंतरी आमची अग्गं अग्गं आई ही हास्यजत्रेतली सिरीज खुप गाजलीय. ते पाहून रुद्राजसुध्दा त्याच्या लाडिक- बोबड्या आवाजात 'अग्गं आई' बोलायला शिकला. मलासुध्दा ते खुप भारी वाटलं. 
हल्लीच त्याली मी माझ्यासाठी खुप स्पेशल असलेलं  'महाराष्ट्राची हास्यजत्रा' म्हणायला शिकवलं. तो पार लहान असल्याने तो पूर्ण म्हणू शकला नाही, पण बोबड्या आवाजात त्याने म्हटलेलं हास्यजत्रा खुप गोड होतं. 

 

 

तुझा लेक रुद्राजकडून तु काय शिकलीस ? तुझ्या आईपणाच्या आत्तापर्यंतच्या अनुभवाने तुला कसं समृध्द केलं ?
-

रुद्राज हे दोन वर्षांचं लहान लेकरु आहे. तो आणि माझा आईपणाचा अनुभव यांना दोन वर्ष झाली आहेत. पण त्याच्याकडून मला खुप काही शिकायला मिळालंय. त्याच्या नुसत्या स्माईलनेही तो मला प्रचंड उर्जा देतो. तो माझा स्ट्रेसबस्टर आहे. शूटींगनंतर थकून-भागून घरी आल्यावर मी प्रथम आराम करण्याचं ठरवते. रुद्राजची काळजी घेण्याची मी माझ्या नव-याला  विनंतीही करते. पण जसा तो माझ्या जवळ येतो, तसा माझा सर्व थकवा- ताण क्षणार्धात निघून जातो. त्याच्यासोबत लहान होऊन मी खेळते, दंगा घालते. त्यामुळेच घरी आल्यावर माझा संपूर्ण वेळ हा त्याच्यासाठीच असतो. रुद्राज आणि आई असे मिळून धम्माल धुडगूस घालतात.

माझ्या लेकाच्या रूद्राजच्या येण्याने आमच्या आयुष्यात अमूलाग्र बदल घडलाय. आमच्या आयुष्यात आलेलं हे इवलंस लेकरू आम्हाला जगभराचं सुख देतंय, त्याच्या हसण्याने आम्ही रोजचा दिवस उत्साहानं आनंदानं साजरा करतोय, जगण्याचं औषध मिळालंय आम्हाला,आम्ही खुश आहोत,

 


 

पिपींगमून मराठीतर्फे रुद्राज आणि अभिनेत्री नम्रता आवटे-संभेराव या मायलेकाच्या गोड जोडीला मदर्स डेच्या खुप खुप शुभेच्छा !

 

 

(प्रज्ञा म्हात्रे)
 

Recommended

PeepingMoon Exclusive