Birthday special: केवळ मराठीतच नाही तर हिंदीतही आहे अशोक सराफ यांच्या अभिनयाचा दबदबा

By  
on  

मराठी प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान मिळवलेल्या कलाकारांमध्ये अशोक सराफ यांचा क्रमांक सर्वप्रथम आहे. बॅंक कर्मचारी ते सुपरस्टार हा अशोक मामांचा प्रवास थक्क करणारा आहे. अशोक सराफ यांनी साकारलेल्या भूमिकांसाठी संवादफेक करण्याची त्यांची शैली, आपल्या भूमिकेतलं वेगळेपण दाखवण्यासाठी घेतलेली मेहनत त्यांना सर्वोत्तम कलाकाराच्या सिंहासनावर बसवून गेली आहे.

अशोक सराफ यांनी अभिनयाने मराठी सिनेमात मैलाचा दगड निर्माण केला आहेच. पण हिंदीमध्येही त्यांनी लक्षवेधी भूमिका केल्या ज्या प्रेक्षकांना खळखळून हसवून गेल्या. कधी मुन्शी, कधी कंजूस बाप, कधी जीवा भावाचा मित्र या व्यक्तिरेखांमुळे अशोक सराफ यांची बॉलिवूडने आवर्जुन दखल घेतली. या आहेत त्यांच्या हिंदीतील गाजलेल्या भूमिका. 

 

मुन्शी- करण अर्जुन: ठाकुर तो गियो हे वाक्य हटके अंदाजात बोलणा-या अशोक यांच्या मुन्शीने प्रेक्षकांना हसवलं. काहीसा बेरका, धन्याशी प्रामाणिक असला तरी खोचक बोलण्याची संधी न सोडणारा मुन्शी अशोक यांनी साकारला होता. 

 

आनंद माथुर- हम पांच: मालिका विश्वात ही मालिका अजूनही प्रेक्षकांची खास आवडती आहे. पाच अतरंगी मुलींचा बाप अशोक सराफ यांनी उत्तम साकारला. पहिली पत्नी आणि दुसरी पत्नी यांच्यात बॅलन्स साधणारा, पाचही मुलींच्या कलाने घेत निखळ विनोद निर्मिती करणारा आनंद माथुर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला नसला तर नवलच. 

जॉनी- येस बॉस: शाहरुख खान आणि अशोक सराफ ही हटके जोडी या सिनेमाच्या निमित्ताने पडद्यावर दिसली. या सिनेमात अशोक यांनी जॉनी ही व्यक्तिरेखा साकारली आहे. शाहरुखचा जिवलग मित्र, सल्लागार अशा अनेक छटा त्यांनी जॉनीच्या व्यक्तिरेखेत लीलया साकारल्या. 

वेदजी- कोयला: जॉनी लिव्हर आणि अशोक सराफ यांना एकत्र पडद्यावर पाहणं कोणत्याही पर्वणीपेक्षा कमी नाही. अशोक यांनी या सिनेमात जॉनी यांच्या वडिलांची भूमिका साकारली. लालची, चतुर पण कुठेतरी नैतिकता असणारा वेदजी यावेळी सगळ्यांना आवडला. 

हेड. कॉन्स्टेबल सावळेकर- सिंघम: नेहमीपेक्षा हटके भूमिका यात अशोक सराफ यांनी साकारली. खोचक बोलणारा, चेह-यावर हसू ठेवत काळजातील वेदना बोलून दाखवणारा हा हेड कॉन्स्टेबल सावळेकर मनात घर करून गेला.

Recommended

Loading...
Share