PeepingMoon Exclusive: मायबाप प्रेक्षकांना विनोदांचा सतत नवा खुराक देण्यासाठी कटिबध्द - समीर चौघुले

By  
on  

विनोदांचं अचूक टाईमिंग साधत हास्यजत्रेच्या स्टेजवर नुसता धुमाकूळ घालणारे आणि अवघ्या महाराष्ट्राला खळखळून हसवणारे प्रसिध्द अभिनेते म्हणजेच समीर चौघुले . समीर हे एक उत्कृष्ट लेखकसुध्दा आहेत. छोट्या पडद्यावरील विविध मालिका,सिनेमे, नाटक आणि कॉमेडी शोच्या माध्यमातून समीर यांनी रसिकांचं भरपूर मनोरंजन केलं आहे. 'फू बाई फू', कॉमेडीची बुलेट ट्रेन या कार्यक्रमांमधून समीर चौघुले हे नाव घराघरांत  पोहचलं, पण आता महाराष्ट्राची हास्यजत्रेच्या माध्यमातून त्यांनी रसिकांच्या हदयात स्थान मिळवलं. 

महाराष्ट्राचे लाडके हास्यसम्राट समीर चौघुले यांनी नुकतीच पिपींगमून मराठीसोबत दिलखुलास आणि खुसखुशीत बातचित केलीय.  

 

 तुमच्या विनोदांचं इंजिन सुस्साट सुटलंय, प्रत्येक वेळेस नवनवे स्कीट अफलातून आणि बहारदार सादर करण्यामागची तुमची प्रेरणा काय आहे?

-    लोकांना हसवण हे माझं आयुष्यातलं ध्येय आहे. तसंच माझं एक ब्रीदवाक्य आहे, जे माझ्या सोशल मिडीयावरसुध्दा प्रत्येक पोस्टमध्ये पाहायला मिळतं ते म्हणजे हास्यमेव जयते. प्रत्येक समस्येवर ताणावर हसणं हा उपाय आहे. विनोद करणं,लोकांना हसवणं तुम्हाला एकदा जमतं दोनदा जमतं पण सतत तुम्हाला काहीतरी नवीन प्रेक्षकांना द्यावं लागतं. प्रत्येकवेळेस काहीतरी नवं घेऊन यावं लागतं. त्यासाठी मला वाटतं स्वत:ला अपग्रेड करणं खुप गरजेचं आहे. कारण एकदा विनोद केल्यावर तो संपतो. तुम्ही एकदा एकलेला विनोद पुन्हा ऐकलात तर साहजिकच तुम्ही कंटाळणार त्यामुळे  प्रत्येकवेळेस तुमच्यासमोर नवीन विनोदच सादर करावा लागणार. म्हणून सतत नवीन आणि आधीपेक्षा आणखी बहारदार कसं आपल्याकडून देता येईल यासाठी प्रयत्नशील रहावं लागतं व हीच यामागची आमची प्रेरणा असते. तसंच सतत लोकांचं मनोरंजन करणं, त्यांना हसवणं आणि त्यांची दु:ख हलकी करायला मदत करणं हे आमचं ध्येय असतं. त्यात कुठे बाधा येता कामा नये हे आम्ही कायम लक्षात ठेवतो. 

टीम वर्क असतं महत्त्वाचं

 आमची हास्यजत्रेची संपूर्ण टीम प्रेक्षकांना सतत नवा मनोरंजनाचा आणि विनोदांचा खुराक कसा देता येईल यासाठी खुप मेहनत घेत असते. महिन्याला जवळपास आम्ही 48 विषय देतो. 10-10 तास आम्हा सर्वांच्या स्कीट्सचे विषय फायनल करायच्या मिटींग्ज सुरु असतात. स्किट हा असा विषय आहे की तोसुध्दा कधी कधी फसतोच. कुठेतरी काहीतरी गणतं. आमच्या बाबतीत होतं असं. पण आम्ही त्या चुकांमधून शिकतो.पुन्हा ती चुक होणार नाही याची जास्त खबरदारी घेतो. आजचे प्रेक्षक खुप चोखंदळ आहेत. लोकांना हसवण्याची एक मोठी जबाबदारी आमच्या खांद्यावर आहे.

 

 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाबद्दल काय सांगाल ?

महाराष्ट्राची हास्यजत्रेतील सर्व सद्स्यांची टीम आहे नाही म्हणणार मी . आमचं हे मोठं कुटुंबच आहे.ईश्वराच्या कृपेने आमचं छान कुटुंब तयार झालं आहे. इथे आम्ही गुण्या-गोविंदाने नांदतो. कोणीच कोणावर कुरघोडी करत नाहीत. सर्व मिळून-मिसळून काम करतो. तरुण कलाकार असतील आणि माझ्यासारखे थोडे सिनिअर्स  असतील तर आम्ही सर्वचजण एकोप्याने काम करतो. लहानांना आमच्यात सामावून घेतो एकमेकांच्या स्किट्सचा कधी कधी आम्ही छोटासा भाग असलो तरी त्यात मनापासून जीव ओतून काम करतो आणि त्यांचं स्किट्स आणखी कसं फुलवता येईल याचा प्रयत्न करतो. 

 

 

करोनासारख्या संकटकाळात आणि नैराश्येच्यावेळी ही तुमची लाफ्टर थेरेपी अनेकांना उपयोग पडलीय याबद्दल काय सांगाल ? 

कोवीड काळात अस्वस्थ असलेल्या लोकांना, रुग्णांना, कोवीड योद्ध्यांना, डॉक्टर्स, कर्मचारी, पोलीस अशा अनेकांना या कार्यक्रमानी दोन घटका रमवलं, हसवलं. या कार्यक्रमामुळे त्यांना काही क्षण आपल्या त्रासाचा, दुःखाचा, वेदनेचा विसर पडला, आणि या कार्यक्रमाचं हे खूप मोठं यश आहे. तुम्हाला विश्वास नाही बसणार ह्यासाठीच आभार मानणारे 500 ते700 मेसेजेस माझ्या इनबॉक्समध्ये ओसंडून वाहतायत. यापेक्षा मोठी दाद किंवा पुरस्कार मला वाटत नाही कोणता असेल. 

नागपूरमध्ये तर एका कोविड सेंटरमध्ये दररोज संध्याकाळी महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम आवर्जून दाखवतात. ही लाफ्टरथेरेपी त्यांच्या आरोग्यात सुधारणा करण्यास मदत करते. इतकंच नाही तर अनेक कॅन्सर पेशेंट्सकडूनही आमच्या कार्यक्रमाला प्रचंड दाद मिळते. कधीकधी व्हिडीओ कॉलवर त्या रुग्णांसोबत बोलण्याची विनंती केली जाते.आम्ही त्यांच्याशी संवाद साधतो, तुम्ही लवकरच बरे होणार आहात असा धीरही देतो. 
अनेकदा तर नैराश्येत बुडालेल्या आणि आत्महत्या करण्याचं पाऊल उचलणा-यांनासुध्दा आमच्या कार्यक्रमामुळे जगण्याची नवी दिशा मिळालीय. त्यांच्या मते, 15 मिनीटं सिक्ट्स पाहून आम्ही जग विसरु शकतो तर जगाकडे सकारात्मक दृष्टीने आम्ही नक्कीच पाहू शकतो. जेव्हा अशा प्रतिक्रीया आम्हा कलाकारांना मिळतात, तेव्हा आमची जबाबदारी आणखी वाढते.

मराठीच नाही तर अनेक अमराठी रसिक प्रेक्षकांकडूनसुध्दा आमचं आणि आमच्या कार्यक्रमाचं भरपूर कौतुक होतं. तेव्हा खुप भरुन येतं. की प्रेक्षक आमच्यावर इतकं प्रेम करतात. 

विशाखा सुभेदार आणि समीर चौघुले ही जोडी अवघ्या महाराष्ट्राची लाडकी आहे, तुमच्यातल्या भन्नाट केमिस्ट्रीचं खुप कौतुक होतं, पण कधी तुमच्यात बिनसतं का ?

-    होय ब-याचदा बिनसतं. आमची मैत्री आजची नाहीय. आम्ही एकत्र मालिका-नाटकं केली आहेत. यामुळे वर्षानुवर्ष एकमेकांना ओळखतोय. दोन क्रिएटिव्ह माणसं एकत्र येतात तेव्हा त्यांच्या मतांमध्ये तफावत असू शकते.विशाखा एक सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्री आहे. सध्या मोजक्याच सशक्त विनोदी अभिनेत्री मनोरंजनविश्वात आहेत त्यामध्ये विशाखा आघाडीवर आहे. ती अनेकदा मला सांगते की सम्या अमूक अमूक चुकीचं वाटतंय बदलावं लागेल आणि ते मला पटतं. त्यामुळे क्रिएटिव्ह गोष्टीला धरुन  वाद  होणं गरजेचंच आहे तरच त्यातून चांगलं प्रोडक्ट येऊ शकतं. पण ते फक्त तात्पुरते असतात. कायमस्वरुपी असं काही नसतं. आमचं छान ट्यूनिंग ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन जमतं. एकमेकांसोबत काम करायला आम्हाला खुप मजा येते. 

 

   तुम्ही महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमात जितकी धम्माल करता आणि  तुमच्या विनोदांच्या वर्षावात चाहत्यांना भिजवून टाकता तसं ख-या आयुष्यातसुध्दा तुम्ही तितकेच विनोदी आहात का?

-    अनेकजण मला हा प्रश्न आवर्जून विचारतात. पण मी आहे हा असाच आहे. कार्यक्रमात तुम्हाला जसा दिसतो आणि वागतो तसाच धमाकूळ मी ख-या आयुष्यातसुध्दा घालतो. गंभीर राहणं मला जमत नाही किंवा उगीचच ओढून ताणून वागायची मला गरज वाटत नाही. मस्त, मनमौजी जगायला आवडतं. जरा खोडसाळ असा माझा स्वभाव आहे. 
  मी घरीसुध्दा असाच वागतो. माझ्या बायकोलासुध्दा याची आता चांगलीच सवय झालीय. आम्ही एकमेकांना कॉलेजपासून ओळखतो. आमचं लव्ह मॅरेज आहे. नाटकांपासून तिला माझी अभिनयाची पॅशन माहितीय. त्यामुळे घरीसुध्दा सतत धम्मालच सुरु असते. कधी कधी तर ती मला लाडिकपणे दरडावतेसुध्दा की, सेलिब्रिटी तोरा वगैरा इथे घरात चालणार नाही. घरात तु माझा नवरा आहेस. तेव्हा लवकर उठ आणि सर्व कामं आवरुन घे पटपट.  यादी देतेय ते सामान बाजारातून घेऊन ये. 

 

 

लेखन, रिहर्सल्स, स्किट्स आणि शूटींग या सर्व बिझी शेड्यूलमधून तुमचं स्ट्रेस बस्टर काय आहे?

-    खरं सांगायचं झालं तर चार्ली चॅप्लिन हे माझे स्ट्रेसबस्टर आहेत. मी फावल्या वेळेत सतत त्यांच्या क्लिप्स पाहत असतो. लहानपणापासून माझे चार्लीन चॅप्लिन देव आहेत. तसे माझे एकूण तीन देव आहेत. चार्ली चॅप्लिन , पु.ल. देशपांडे आणि रॉन ऐन्टिक्सन म्हणजेच मिस्टर बिन यांचेच व्हिडीओ मी दिवसभर पाहत असतो. तर कधी कधी इंग्लिश एक्शन मसालापट पाहायलासुध्दा मला आवडतात. छान आवडीची गाणीसुध्दा ऐकतो.
  घरी असल्यावर मला स्वयंपाकघरात विविध पदार्थ बनवायला फार आवडतं. लॉकडाऊनच्या काळात तर मी ऑनलाईन व्हिडीओज् पाहून अनेक पदार्थ बनवले होते तेसुध्दा बायकोची मदत न घेता. त्यामुळे स्वयंपाक करणं हा माझा ताणमुक्तीसाठीचा बेस्ट फंडा ठरतो.  

 


 

अभिनेते -लेखक नसता तर तुम्ही आता कोणत्या क्षेत्रात असता?

-    खरं सांगू का अभिनेता नसतो तर  मी शेफ असतो. मी कॉलेजला होतो आणि जेव्हा नाटक माझ्या आयुष्यात नव्हतं तेव्हा मला शेफ व्हायची खुप इच्छा होती. मला जेवण बनवायला फार आवडायचं. एखाद्या क्रूझवर मी शेफ म्हणून नक्कीच आता काम करत असतो. 

Recommended

Loading...
Share