By  
on  

Father’s day Exclusive: बाबांच्या एका फिमेल फॅनचा घरी फोन आला आणि..... गश्मीर महाजनीने शेअर केला धमाल किस्सा

मराठी सिनेमातील हॅंडसम अभिनेत्यांमध्ये रविंद्र महाजनींचं नाव सगळ्यात वर आहे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत मुलगा गश्मीरही अभिनय क्षेत्रात चमकतो आहे. फादर्स डे निमित गश्मीरने वडिलांबाबतच्या अनेक बाबी, किस्से पीपिंगमून मराठीच्या चाहत्यांशी शेअर केल्या आहेत.  

या क्षेत्रात येताना बाबांचा सल्ला किंवा अनुभव कसा उपयोगी पडला? 

गश्मीर: माझा जन्म झाला त्यानंतर दोनच वर्षांनी बाबांनी फिल्म इंडस्ट्री सोडली आणि कंस्ट्रक्शन लाईन जॉईन केली. त्यामुळे मी मोठा होत असताना घरी फारसं फिल्मी वातावरण अजिबात नव्हतं. माझ्या मोठ्या बहिणीने हे वातावरण अनुभवलं आहे.पण मी ज्यावेळी या क्षेत्रात आलो तेव्हा काही खास असा सल्ला दिला नाही. तुला जसं योग्य वाटेल त्यापद्धतीने काम कर असा त्यांचा कायमच दृष्टीकोन आहे. अनेकदा ते मला एखाद्या भूमिकेबाबत सल्ला देतात. पण मी ते म्हणतील तसंच करावं असा आग्रह नसतो. मी त्यांचं कामाप्रती असलेलं प्रेम, समर्पण पाहिलं आहे. बाबा रात्रीच्या वेळी टॅक्सी चालवून दिवसभर निर्मात्यांकडे जायचे हे मी आईकडून ऐकलं आहे. त्यामुळे तेच डेडीकेशन मला माझ्या कामात प्रेरणा देत असतं. 

 

महाजनींच्या तिस-या पिढीने अभिनय क्षेत्रात यावं असं तुला वाटतं का? 

गश्मीर: नक्कीच. व्योमबाबतीत मी नक्कीच हे म्हणू शकतो. कारण अभिनयासोबतच मी आता निर्मिती क्षेत्रातही पाऊल ठेवणार आहे. 2022 मध्ये मी पहिलं प्रॉडक्शन आणणार आहे. त्यामुळे स्वत:चं ऑफिस असेल, संबंधित स्टाफ असेल तर त्यावर लहानपणापासूनच सिनेमाचे संस्कार होतील. आता त्याने पुढे या क्षेत्रात यायचं आहे की नाही हा सर्वस्वी त्याचा निर्णय असेल. 

 

बाबांनी साकारलेली कोणती व्यक्तिरेखा तुझी सगळ्यात लाडकी आहे? 

गश्मीर: मला त्यांच्या दोन व्यक्तिरेखा आवडतात. एक म्हणजे त्यांचा आराम-हराम है’ या दुस-याच सिनेमातील भूमिका आणि मुंबईचा फौजदार या सिनेमातील त्यांची भूमिका. या दोन सिनेमांचा रिमेक व्हावा आणि मला त्यात भूमिका साकारण्याची संधी मिळावी अशी खुप इच्छा आहे. 

 

महाजनी बॉईज त्यांच्या फिमेल फॅन फॉलोविंगबाबत काय सांगतील? 

गश्मीर: बाबांचं फिमेल फॉलोविंग मोठं होतं. याबाबत अनेकदा मस्करी होते. पण एक सांगायचं म्हणजे घरी मोकळं वातावरण आहे. त्यामुळे फिमेल फॅन्समुळे घरच्या वातावरणात कधीच फरक पडला नाही. आई याबाबत कायमच एक किस्सा सांगते. एकदा एका फिमेल फॅनचा घरी फोन आला होता. त्यावेळी बाबा शुटिंगला असले तर आई त्यांचे कॉल अटेंड करायची. अशावेळी पलीकडून अनेकदा तुम्ही त्यांच्या कोण अशी विचारणा व्हायची. त्यावेळी आई ‘मी त्यांची बहीण बोलते’ हे सांगायची. यामागे आईचं स्वत:चं खास कारण असायचं. त्या फॅनने तिच्या हिरोशी बोलण्यासाठी फोन लावलेला असायचा. अशावेळी मी त्यांची पत्नी बोलते हे सांगितल्यावर तिचा मूड खराब होऊ नये म्हणून आईने अनेकदा हे कारण सांगितलं आहे. या समंजसपणामुळे घरात वातावरण खेळीमेळीचं राहिलं आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive