Exclusive: मला अवघड काळात मानसिक स्थैर्य मिळवण्यासाठी योगाची मदत झाली: मयुरी देशमुख

By  
on  

खुलता कळी खुलेना या मालिकेतून रसिकांची लाडकी बनलेली अभिनेत्री म्हणजे मयुरी देशमुख. आपल्या सहज सुंदर अभिनयाने तिने सर्वांचीच मनं जिंकली. त्यानंतर मयुरी नाटक, सिनेमा अशा सगळ्याच माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली. 
मयुरी आता इमली या हिंदी मालिकेतून समोर येते आहे. आयुष्यातील एका वाईट घटनेनंतर मयुरीने योगा आणि मेडीटेशनच्या मदतीने स्वत:ला सावरलं आहे. आजच्या जागतिक योग दिनाच्या निमित्ताने मयुरीने तिच्या योग प्रेमाबाबत पीपिंगमून मराठीच्या चाहत्यांशी शेअर केलं आहे. 

तुझ्या डेली रुटीनमध्ये योगा करतेस का ? तुला कसा फायदा होतो?

मयुरी: हो. मी डेली रुटीनमध्ये योगा करते. आठवड्यातले 4-5 दिवस योगा करण्यावर माझा भर असतो. किती थकले असले तरी मी शक्यतो योगा करणं चुकवत नाही. शुटिंगच्या आधी किंवा पॅक अप नंतरचा वेळ मी योगासाठी देतेच. अर्थातच मला याचा फायदाही होतो. शरीरातील नाडी संस्था, चेता संस्था, रक्ताभिसरण या गोष्टी सुरळीत सुरु राहतात. 

 

सध्या जे नकारात्मक वातावरण आहे, यासाठी स्वतः ला मानसिक दृष्ट्या सक्षम कसं ठेवलंस ?

 

मयुरी: यामध्ये मेडिटेशन आणि योगाने महत्त्वाची भुमिका बजावली आहे. या काळात शक्यतो मी स्वत: कामाला व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये सकारात्मक बाबींचा सगळ्यात जास्त विचार करणं हे आलंच. मी रात्री झोपताना नकारात्मक बाबींपासून लांब राहणं पसंत करते. कोणतीही अशी बाब वाचणं, पाहतं मी आवर्जुन टाळते. 

 

रूटीनमधील एखादी चांगली सवय जी तू चाहत्यांना रेकमेंड करशील?

 

मयुरी: मी चाहत्यांना हेच रेकमेंड करेन की झोपताना कोणतीही नकारात्मक बाब सोबत ठेवू नका. आपल्यापैकी अनेकांना झोपताना बातम्या पाहायची सवय असते. कधी डार्क सिरीज पाहतो. त्यामुळे कळत नकळत का होईना आपल्या मनावर परिणाम होतच असतो. त्यामुळे झोपताना आसपासचं वातावरण हलकं फुलकं राहिल याची काळजी घ्या. म्हणजेच येणारी सकाळ देखील तितकी उत्साहवर्धक असते. 

 

इमलीनंतर पुढच्या कोणत्या माध्यमात तुला काम करायला आवडेल. म्हणजे सिनेमा, मालिका, वेबसिरीज की नाटक ?

मयुरी: खरं तर मी सगळ्याच माध्यमात काम केलं आहे. सुदैवाने मला सगळ्याच माध्यमांमध्ये खुप चांगल्या भूमिका मिळाल्या आहेत. अशा वेळी ओटीटी हे माध्यम आहे जे मला एक्सप्लोअर करायचं आहे. त्यामुळे अशा एका प्रोजेक्टसच्या शोधात मी नक्कीच आहे.

Recommended

Loading...
Share