अशी होती रमेश देव आणि सीमा देव यांची लव्हस्टोरी, यंदा लग्नाला झाली होती 60 वर्ष पूर्ण!

By  
on  

मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते रमेश देव यांचं निधन झालं आहे. वयाच्या 93 व्या वर्षी हदयविकाराच्या झटक्याने रमेश देव यांची प्राणज्योत मालवली. त्यांना धिरुबाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रमेश देव यांच्या निधनाने संपू्र्ण मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.  त्यांच्या पश्चात पत्नी अभिनेत्री सीमा देव, मुलगा अजिंक्य देव व दिग्दर्शक मुलगाus अभिनय देव, सुना नातवंड  असा परिवार आहे. मराठी सिनेसृष्टीसोबतच ते हिंदीतलेसुध्दा मोठे अभिनेते म्हणून नावाजले जायचे. पत्नी सीमा देव यांच्या सोबत सिनेमातील त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खुप भावली. 

रमेश देव आणि सीमा देव यांच्या सदाबहार जोडीचे दाखले आजही पिढ्यान् पिढ्या मोठ्या अभिमाने दिले जातात. रमेश देव आणि सीमा देव हे मराठी सिनेमातील सर्वोत्कृष्ट जोडपे म्हणून ओळखले जाते. या दोघांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रमाणेच त्यांची ऑफस्क्रीन केमिस्ट्रीने रसिकांची मनं जिंकली. मराठी सिनेमांसोबतच या जोडप्याने हिंदीतहाी आपल्या जोडीची कमाल दाखवली. या जोडी प्रेमकहाणी अमर राहील. यंदा या दोघांच्या लग्नाला 60 वर्ष पूर्ण झाली. 

रमेश देव हे पत्नी सीमा देव यांच्यापेक्षा 12 वर्षांनी मोठे आहेत. रमेश देव हे अनेक सिनेमांमधून छोट्या-मोठ्या भूमिका साकारत सिनेसृष्टीत आपले पाय रोवू इच्छित होते. हा तो काळ होता जेव्हा नलिनी सराफ (सीमा देव) यांनी मराठी चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवायला सुरुवात केली होती. नलिनी यांनी त्यांचे पडद्यावरचे नाव 'सीमा' ठेवले होते. त्यांनी १९६० मध्ये मनोरंजन क्षेत्रात पदार्पण केलं. 'जगाच्या पाठीवर' हा त्यांचा पहिला सिनेमा होता, ज्यात रमेश देवदेखील होते. या पहिल्याच सिनेमापासून ही जोडी सुपरहिट ठरली होती. त्यानंतर जवळपास दोन दशकं या जोडीने मराठीसोबतच हिंदीतही आपल्या अभिनयाची जादू दाखवली. या जोडीला रसिक प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. 

याच काळात दोघांनी १९६२ मध्ये 'वरदक्षिणा' हा चित्रपट केला होता. चित्रपटाच्या कथेनुसार, सीमा यांना दुसऱ्या पुरुषाशी लग्न करण्यास मदत करताना रमेश यांचे पात्र प्रेमात पडते. हा तोच चित्रपट होता ज्यातून दोघांनाही एकमेकांबद्दलचे प्रेम वाटू लागले आणि त्याच वर्षी दोघांनी अधिक वेळ न दवडता लग्न केलं.

१ जुलै २०१३ रोजी त्यांच्या लग्नाला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल रमेश देव म्हणाले होते की, 'माझी सीमासोबत खूप चांगली केमिस्ट्री होती. आमचा अभिनय आणि पात्रं नैसर्गिक दिसतात कारण माझा सहकलाकार मजेशीर होता. आमच्या ऑफस्क्रीन केमिस्ट्रीबद्दल सांगायचं झालं तर १ जुलै रोजी आम्हा दोघांच्या वैवाहिक जीवनाची ५० वर्ष पूर्ण होणार आहेत. यावरूनच कळतं की आमची केमिस्ट्री किती चांगली असेल. मला नाही वाटत की चित्रपटसृष्टीत आमच्यापेक्षा वयाने मोठं कोणी जोडपं आहे आणि ते अजूनही एकत्र आहेत.'
 

 

Recommended

Loading...
Share