वाचा विशेष लेख : रमेश देव शांत कसे? -दिलीप ठाकूर

By  
on  

 रमेश देव निपचित पडून राहिलेले असू शकतात? ते शांत असू शकतात? अशी आपण साधी कल्पनाही करु शकत नाही पण दुर्दैवाने ही वस्तुस्थिती होती.... जुहू वर्सोवा लिंक रोडवरील  रुपरंग सोसायटीत ते चक्क अशा स्थितीत दिसले. आणि याला कारण होते ते, त्यांच्या आयुष्याचे शतक हुकले. जगण्यावरती मनोमन, मनोसक्त प्रेम करणारे रमेश देव यांच्या निधनाच्या वृत्ताचा धक्का आश्चर्यकारक होता. ९३ वय हे तसे फारच कमी जणांना मिळणारे आयुष्य! पण रमेश देव यांच्या रोजच्या जगण्यात, उत्साहात, सकारात्मक दृष्टिकोनात त्यानी वयाची नव्वदी ओलांडली आहे असे कधी जाणवायचे नाही. कोरोना प्रतिबंधक उपाय म्हणून जवळ जवळ दोन वर्षे सर्व सामाजिक सांस्कृतिक जीवन विस्कळीत झाले, त्यात रमेश देव यांनाही या लाॅकडाऊनच्या काळात आपल्या घरीच राहावे लागले. घरात बसून राहणे हा त्यांचा स्वभाव कधीच नव्हता. शूटिंग नसेल तर जुहूचा क्लब असेल अथवा घरी वाचन असेल. अन्यथा सीमाताईंसोबत शिवाजी मंदिर अथवा अन्यत्र कुठे तरी नाटक पाह्यला जात. तेव्हाच नवीन पुस्तकांची खरेदी करीत आणि कधी आपण ते पुस्तक वाचतोय असे त्यांना होई. या सगळ्यातून त्यांना अभिनय अथवा दिग्दर्शन यासाठी उर्जा मिळत राहिली.

चित्रपटात भूमिका साकारताना त्याचे तुकड्या तुकड्याने शूटिंग होत असते, नाटकात भूमिका साकारत असताना त्या व्यक्तीरेखेचे बेगरिंग सांभाळावे लागते. प्रत्येक प्रयोगात ते करावे लागते. तर मालिकेत भूमिका साकारत असताना त्याचे शूटिंग अनेक दिवस सुरु असते. आठवड्यात एक सुट्टी मिळते इतकेच. पण विनातक्रार, तसेच कंटाळा न करता दररोज सेटवर जावे लागते आणि त्या मालिकेतील वळणे स्वीकारत आपली भूमिका साकारावी लागते. तात्पर्य, ही तीनही माध्यमे भिन्न असूनही रमेश देव यांनी या प्रत्येक माध्यमाशी छान जुळवून घेतले.

ते स्वतः चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक होते, पण इतरांच्या चित्रपटात भूमिका साकारत असताना त्यांनी कधीही आपल्यातील दिग्दर्शक जागा होऊन दिला. अन्य दिग्दर्शकांच्या चित्रपटातून भूमिका साकारत असताना त्यांनी त्या दिग्दर्शकाच्या सूचनांचे पालन केले. उगाच ढवळाढवळ केली नाही. 


    रमेश देव आणि सीमाताई हे पडद्यावर आणि प्रत्यक्षात आदर्श दामप्त्य. विशेषतः सुखी संसाराचे उत्तम उदाहरण म्हणून या दाम्पत्यांचे नाव घ्यावे. त्या दोघांनी एकत्र येऊन भूमिका साकारलेला पहिला चित्रपट 'आलीया भोगासी '. या चित्रपटात त्यांची भूमिका बहिण भावाची होती. त्यानंतर राजा परांजपे दिग्दर्शित 'जगाच्या पाठीवर ' या चित्रपटात रमेश देव यांची छोटीशी भूमिका होती तर राजा परांजपे हे सीमा देव यांचे नायक होते. विशेष म्हणजे राजा परांजपे हे रमेश देव आणि सीमा यांचे गुरु होत. त्यांनीच दिग्दर्शित केलेल्या 'सुवासिनी ' या चित्रपटात या दोघांनी प्रथमच नायक आणि नायिका अशा भूमिका साकारली. त्यानंतर त्यांनी माझी आई, चार दिवस सासूचे चार दिवस सूनेचे, सोनियाची पाऊले, वरदक्षिणा या चित्रपटात त्या दोघांनी एकत्र येऊन भूमिका साकारली आणि त्यातूनच त्यांची मने जुळली आणि त्यानी लग्न केले. त्यानंतर त्यांनी मोलकरीण, ते माझं घर, वैभव, शोधा म्हणजे सापडेल, जुनं ते सोनं, काळी बायको, ओवाळिते भाऊराया तसेच अनेक वर्षांनी जेता या चित्रपटात एकत्र भूमिका साकारली. तर अपराध या चित्रपटात त्यांनी एकत्र भूमिका साकारली तरी ती खलनायक आणि खलनायिका अशी भूमिका होती. हिंदीतही त्यानी सरस्वतीचंद्र, आनंद अशा काही चित्रपटातून एकत्र भूमिका साकारली. विशेष म्हणजे देव दाम्पत्यांच्या दत्तात्रय फिल्म या बॅनरखाली निर्माण झालेल्या आणि राजदत्त दिग्दर्शित  'सर्जा ' या चित्रपटात हे देव दाम्पत्य आणि त्यांचा पुत्र अजिंक्य यांच्या भूमिका आहेत. देव कुटुंबाच्या याच दत्तात्रय फिल्म या बॅनरखाली निर्माण झालेल्या रमेश देव दिग्दर्शित  'जीवा सखा ' या चित्रपटातून आशुतोष गोवारीकर, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर यांनी चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले. रमेश देव यांनी चल गंमत करु, चोर चोर, सेनानी साने गुरुजी या चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन केले. तर त्यांनीच निर्माण केलेल्या 'क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके ' या चित्रपटाचे दिग्दर्शन गजेन्द्र अहिरे याचे आहे. 


    रमेश देव यांच्या चौफेर कारकिर्दीचा पट हा असा यशस्वी आणि लक्षवेधक. आता राहिल्या फक्त आणि फक्त आठवणी. कधीही शांत नसलेले रमेश देव आता मात्र निपचित पडून असल्याचे मी पाहत असताना त्यांच्याशी झालेल्या अगणित भेटीगाठी, गप्पा आणि त्यांचे चित्रपट आठवत होते...

Recommended

Loading...
Share