Peepingmoon Special: एकेकाळी एक्टींग स्कूलच्या एडमिशनसाठी अक्षयजवळ नव्हते पैसे तरीही आज करतो बॉलिवूडवर राज्य

By  
on  

सिनेसृष्टीच्या चंदेरी दुनियेत येणारा प्रत्येक कलाकार मोठं होण्याचं एक स्वप्न घेऊन येतो. प्रत्येकालाच यशाच्या शिखरावर पोहचायचं असतं. पण तो मार्ग तितकाच खडतरसुध्दा असतो. कठोर मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावरच फक्त तिथपर्यंत पोहचता येतं.

अक्षय कुमारने पिपींगमून मराठीसाठी खास संपूर्णपणे मराठीत मुलाखत दिली होती. बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा सुपरस्टारपर्यंतच्या प्रवासाचा श्री गणेशा कसा झाला ते जाणून घ्या  फक्त Marathi.PeepingMoon.com वर


 

जीवनात जेव्हा दोन मार्ग निवडण्याची वेळ आली तेव्हा तुम्ही नेमकी कशी सुरुवात केली, या प्रश्नाला उत्तर देताना फारच हद्यस्पर्शी आठवण अक्षय कुमारने आमच्या टीमसोबत शेअर केली, “ मी जेव्हा अभिनय करण्याचा निर्णय घेतला तेव्हा मला समजलं त्यासाठी अॅक्टींग स्कूलमध्ये अॅडमिशन घ्यावे लागते आणि त्यासाठी 11 हजार फी भरावी लागते. पण माझ्याकडे तेव्हा इतके पैसे अजिबातच नव्हते. मग मी असाच चर्चगेटला जिथे रस्त्यावर पुस्तकांचे छोटे छोटे स्टॉल्स असतात तिथे ‘अभिनय कसा शिकावा’, याविषयीचे पुस्तक शोधू लागलो."

थोडासा भावूक होत अक्षय म्हणतो, "आजही मला आठवतंय चर्चगेट स्टेशनच्या उजवीकडे हे सर्व पुस्तकविक्रेते बसले होते. ‘एकाकडे मला अभिनय कसा शिकावा’, हे पुस्तक सापडले. लेखकाचं नाव मला आता आठवतं नाही. मी पुस्तकाचं पहिलं पान उघडलं. त्यात किंमत लिहीली होती 125 रु. पण मी खिशात हात घातला, परिस्थितीमुळे माझ्याकडे तेव्हा तेवढे पैसेपण नव्हते. मग मी सहज पुस्तकाचं पुढचं पान उघडलं व त्यात लिहलं होतं, ‘जर तुम्हाला उत्तम अभिनेता व्हायचं असेल, तर सर्वप्रथम एक चांगला माणूस व्हा’, हे वाचलं आणि तेव्हाचं मी ठरवलं, मला अभिनय आता करता येईल. ही शिदोरी घेऊनच आपण अभिनय शिकायचा ही मी मनाशी गाठ बांधली. फक्त याचीच सतत स्वत:ला आठवण करुन देत, मी सिनेमे करण्यास सुरुवात केली. पहिला सिनेमा ब-यापैकी हिट ठरला. मग दुसरा फ्लॉप झाला. तिसराही फ्लॉप झाला आणि मग चौथ्या ‘खिलाडी’ सिनेमाने मला लोकप्रियता दिली.”

अक्षय पुढे सांगतो, “अशा आगळ्यावेगळ्या पध्दतीने अभिनय प्रवासाला सुरुवात केल्यापासून कधीही मागे न वळता मी फक्त ही एकच शिकवण घेऊन पुढे चाललोय, ते म्हणजे उत्तम अभिनेता होण्यासाठी एक चांगला माणूस होणं गरजेचं आहे आणि हा फार मोलाचा धडा मला आयुष्यात मिळाला आहे.”

Recommended

Loading...
Share