Movie Review: कथानकात भरकटलेला प्रवास 'डोंबिवली रिटर्न'

By  
on  

दिग्दर्शक:  महेंद्र तेरेदेसाई

कलाकार: संदीप कुलकर्णी,राजेश्वरी सचदेव,हृषीकेश जोशी,अमोल पराशर,त्रिश्निका शिंदे,सिया पाटील

वेळ: 2 तास

रेटींग : 2 मून

मध्यमवर्गीय सामान्य माणूस म्हटलं की तिच सरकारी किंवा खासगी 9 ते 5 ची नोकरी. चाळीतील किंवा एखाद्या यथातथा इमारतीतील घर, कुटुंब,आपली माणसं हेच आपलं जग मानणारा आणि याभोवती अक्षरश: गुंतलेला असणारा.मुंबईकर असल्याने धकाधकीचं आयुष्य व रोजची लोकल पकडण्याची कसरत हा त्याच्या दिनक्रमातला सर्वात मोठा आणि अविभाज्य भाग. तेच रटाळ जीवन जगण्यात तो धन्यता मानणारा. आपल्या कामाशी प्रामाणिक राहणारा. कधीतरीच आनंद साजरा करणारा. राजकारण्यांच्या नावे खडे फोडणारा. यापलिकडे तो कधीच कुठली आयुष्यात मोठं होण्याची किंवा श्रीमंत होण्याची स्वप्नंसुध्दा पाहायला घाबरतो. ह्याच सामान्य माणसाचं आयुष्य ठरवलं तर किंवा काही अनपेक्षित घटनांमुळे कसं बदलु शकतं आणि रंजक वळण घेऊ शकतं ह्याचं एक वेगळं उदाहरण जर तुम्हाला अनुभवायचं असेल तर 'डोंबिवली रिटर्न' हा सिनेमा पाहा.

कथानक

अनंत वेलणकर (संदीप कुलकर्णी) हा मंत्रालयातील जनसंपर्क विभागात कार्यरत असणारा मध्यमवर्गीय. पत्नी उज्ज्वला (राजेश्वरी सचदेव) आणि मुलगी अंतरा (त्रिश्निका शिंदे) अशा त्रिकोणी कुटुंबासह डोबिंवलीत गुण्या-गोविंदाने राहतो. या कुटुंबातला आणखी एक तरुण व उत्साही सदस्य म्हणजे अनंतचा लहान भाऊ श्रीधर सावंत (अमोल परशार). श्रीधर नेहमीच आपल्या भावासोबत आणि त्याच्या कुटुंबियांसोबत सावलीसारखा उभा असतो. अनंत वेलणकर या कथेचा नायक जरी सामान्य सरकारी नोकर असला तरी नोकरी करता करता तो आपला फोटोग्राफीची आवड सुट्टीच्या वेळेस आणि वेळ मिळेल तशी जपतो. यात त्याचा मित्र सावंत (हृषीकेश जोशी) ज्याचा फोटो स्टुडिओ असल्याने दोघांची छान मैत्री असते. पण वेलणकर कधी आपलं सर्वसामान्य आयुष्य सोडून कधीच चाकोरीबाहेरचा विचार करत नाही. पण अचानक त्याच्या फोटोग्राफीच्या आवडीमुळे एक वादळ निर्माण होतं आणि त्याचं आयुष्य कसं संपूर्ण बदलून जातं, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला सिनेमा पाहावा लागेल.

 

दिग्दर्शन

सिनेमाचं कथानक आणि त्याची मांडणी ह्यात काहीशी त्रुटी जाणवते. अनेकदा सिनेमात आपल्याला संदर्भ लावायला वेळ लागतो. त्यामुळे दिग्दर्शकाला नेमकं काय सांगायचं हेच समजत नाही. काही प्रसंग तर उगीचच ओढून-ताणून टाकल्यासारखे वाटतात. सिनेमाचं संगीत थोड कथानकात जान आणतं. काही व्यक्तिरेखांचा नेमकं कनेक्शन व प्रसंग नीट स्पष्ट होत नाहीत.

 

अभिनय

संदीप कुलकर्णी यांनी साकारलेला अनंच वेलणकर अगदीच आपल्या भूमिकेशी प्रामाणिक आहे. राजेश्वरी सचदेव यांनी आपल्या अभिनयातून त्यांना योग्य साथ दिली आहे. या सिनेमात विशेष कौतुक करावं लागेल तर अभिनेता अमोल पराशरचं. लहान भाऊ असला तरी आपल्या मोठ्या भावाच्या प्रत्येत ब-या-वाईट प्रसंगात त्याच्यासोबत उभा राहणारा आणि चुकेल तिथे खडसावून सांगणारा या सहाय्यक व्यक्तिरेखेतसुध्दा तो खुलून दिसला आहे. हृषीकेश जोशीसुध्दा नेहमीपेक्षा वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळतोय.

 

सिनेमा का पाहावा?

एखाद्या मध्यमवर्गाीय सामान्य व्यक्तीच्या आयुष्यात जर पैसा कमिविण्यासाठी अशी निर्णायक संधी काही घटनांमुळे चालून आली तर त्याने नेमकं कोणत्या मार्गाने जायला हवं, हे जाणून घ्यायची इच्छा असेल तर तुम्ही हा सिनेमा जरुर पाहावा.

 

Recommended

Share