Movie Review: कोलमडलेल्या जगण्याला पुन्हा नवी उभारी देणारा 'पुन:श्च हरिओम'

By  
on  

कालावधी : दोन  तास 

कथा - 

दिग्दर्शन: विविध कोरगांवकर 
कलाकार : स्पृहा जोशी, विठ्ठल काळे, 
रेटींग : 3 मून्स 

 

मराठी सिनेमांमध्ये नेहमीच नवनवे विषय हाताळले जातात. ते नेहमीच वाखाणण्याजोगेच असतात. संकंट कशी धडकतात हे आपल्यातल्या प्रत्येकानेच या करोना काळात अनुभवलं. लॉकडाऊन लागू झाल्यामुळे एकच हाहाकार उडाला. रोगाशी लढा देण्यासोबतच दोन वेळच्या पोटाची आग शमविण्यासाठी प्रत्येकालाच संघर्ष करावा लागला आणि अजूनही करावा लागतोय. या काळात जगण्याची लढाई जिंकण्याची धडपड प्रत्येक जण करताना दिसला. संकंट एकामागून एक येत गेली पण कोलमडून गेल्यावरसुध्दा पुन्हा नव्याने उभारी घेण्याची जिद्द ज्याने दाखवली तो सूर्यासारखा तेजस्वी झळाळून निघाला
अशाच तुमच्या आमच्या साऱख्या एका सामान्य कुटुंबाच्या असमान्य जिद्दीची गोष्ट पुनश्च हरिओम या सिनेमात पाहायला मिळतेय.

 


 

कथानक 

ही गोष्ट आहे कोकणात राहणा-या पारकर कुटुंबियांची आणि दिपाली पारकरच्या जिद्दीची. दिपाली तिचे पती रवी लेक सायली आणि सासू- सासरे असं छोटंसं कुटुंब असतं. परिस्थिती बेताचीच. पण सर्वचजण सुखा-समाधानाने नांदतात. रवी इलेक्ट्रीकचं दुकान चालवतो. पण कर्जाच्या ओझ्याखाली दबल्याने त्याला संसाराचा गाडा रेटणं मुश्कील होतं. संसाराला आपणही थोडा हातभार लावावा यासाठी दिपालीसुध्दा तालुक्याच्या ठिकाणी एका साड्यांच्या दुकानात नोकरी करते. जे काही ते कमवतात त्यातूनच दोन घास सुखाचे मिळवतात. परंतु कर्जाची टांगती तलवार ही सतत त्यांच्या डोक्यावर असतेच. अचानक करोनाचं संकंट देशावर ओढवतं. सुरुवातीला अगदीच महत्त्व न देण्याइतपत वाटलेलं हे संकट अचानक  रौद्र रुप धारण करतं आणि सरकारकडून संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर होतो. रवीलासुध्दा दुकान बंद ठेवावं लागतं. तर दिपालीचं साड्याचं दुकानही बंदच होतं. दुष्काळात तेरावा महिना अशी त्यांची गत होते. याच दरम्यान दिपाली-रवीची 10-12 वर्षांची लेक  सायली हिला एक कल्पना सुचते. पहिल्यापासूनच चुणचुणीत हुशार आणि तंत्रज्ञानाशी मैत्री करणारी सायली एक मार्ग शोधते. आपल्या सुगरण आईच्या हाताला असलेली अप्रतिम चव ती अचूक जाणते आणि आईला असे पदार्थ करुन त्याचे व्हिडीओ बनविण्याचं  प्रोत्साहन देते. पण हे व्हिडीओ  करुनही पैसे मिळतील की नाही, याची शाश्वती नसतेच.  पण तरीसुध्दा दिपाली आणि सायली मिळून हे करण्याचं ठरवतात. पण समोर अनेक अडचणीसुध्दा आ वासून उभ्या ठाकलेल्या असतात. ते म्हणजे हे पदार्थ बनवण्यासाठी लागणारं साहित्य विकत घ्यावं लागणार, तसंच घरात कोणाला कळलं तर त्यांच्या प्रतिक्रीया काय असणार. सुरुवातीला दिपालीला यासाठी पतीकडून कडाडून विरोध झाला पण तरीसुध्दा जिद्दीने यातून ती कशी उभी राहिली, तिच्या कुटुंबाने तिची यात  साथ कशी दिली. त्यातच वादळासारखं ओढवलेलं नैसर्गिक संकट या सर्वांवर मात करत दिपाली व पारकर कुटुंब खचून न जाता पुन्हा उभं कसं राहिलं हा रंजक  प्रवास तुम्हाला ह्या सिनेमात पाहायला मिळेल. 

दिग्दर्शन 

एका सामान्य कुटुंबाची साधी –सरळ आणि सहज गोष्ट दिग्दर्शकाने पडद्यावर अगदी सुंदर मांडली आहे.  एका अतिसामान्य कुटुंबाचं चित्रण सिनेमात अचूक करण्यात आलं आहे. अनेक गोष्टींचं बारकाईने चित्रण यात पाहायला मिळतं. गावातलं कुटुंब त्यांना येणा-या अडचणी. हे सर्व पाहताना अनेकांना ते दृश्य रिलेट करणारं वाटतं. दिग्दर्शकाने कोकणातील निसर्गरम्य लोकेशन्स, जुनं घर, समुद्रकिनारा यांचा  केलेला योग्य वापर ही ह्या कुटंबाची गोष्ट पाहण्याचा अनुभव सुखद करतो. फक्त सिनेमा थोडासा लांबल्यासारखा वाटतो.पण मोजक्याच व्यक्तिरेखांमध्येसुध्दा हा सिनेमा खुलतो हे विशेष. 

 

 

अभिनय 
 

स्पृहा जोशीने दिपाली पारकर या व्यक्तिरेखेला पूरेपूर न्याय दिला आहे. एका अतिसामान्य कुटुंबातली सून ,आई आणि पत्नी ही भूमिका तिने उत्तम वठवली आहे. या पुनश्च हरिओंम ही गोष्ट तिच्या नजरेतूनच प्रेक्षकांपर्यंत पोहचते. स्पृहा इतकंच कौतुक तिच्या पतीच्या भूमिकेतील अभिनेता विठ्ठल काळेचं. त्याने एक मध्यवर्गीय पतीची भूमिका चोख बजावलीय. प्रत्येक सीनमध्ये स्पृहाला उत्तम साथ दिलीय. या सिनेमात सायली ह्या चिमुरडीची भूमिका साकारणा-या बालकलाकाराचं कौतुक करावं तितकंच थोडं आहे. आप्लाय सहज-सुंदर अभिनयातून तिने रसिकांची मनं जिंकली आहेत. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Zee Talkies (@zeetalkies)

 

सिनेमा का पाहावा 

मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेउन, फक्‍त लढ म्हणा'! कुसुमाग्राजांच्या कवितेची आठवण करुन देणारे अनेक प्रसंग सिनेमात पाहायला मिळतात. ते तुम्ही आम्हीसुध्दा अनुभवले या काळात. असतील . कितीही संकटं आली तरी खचून न जाता पुन्हा नव्याने उभं रहाण्याची प्रेरणा आणि ताकद हा सिनेमा देतो. या काळात प्रत्येकालाच तु चाल पुढे गड्या ...अशा प्रोत्साहनाची गरज आहे. 

 

Recommended

Loading...
Share