chandramukhi Review : अमृता खानविलकर आणि आदिनाथ कोठारेच्या दमदार अभिनयाने सजलेली सर्वौत्तम कलाकृती

By  
on  

सिनेमा - चंद्रमुखी 

दिग्दर्शक - प्रसाद ओक 

कलाकार- अमृता खानविलकर, आदिनाथ कोठारे, मोहन आगाशे, मृण्मयी देशपांडे, अशोक शिंदे, वंदना वाकनीस, सुरभी भावे, समीर चौघुले, राधा सागर, सचिन गोस्वामी, नेहा दंडाळे

रेटिंग्ज्- 4 मून्स 

 

कच्चा लिंबू, हिरकणी यांसारखे सुपरहिट सिनेमे दिल्यानंतर दिग्दर्शक प्रसाद ओक चंद्रमुखी हा सिनेमा घेऊन प्रेक्षकांसमोर आला आहे. लावणीसम्राज्ञीच्या आयुष्याभोवती फिऱणारी ही सुंदर कलाकृती विश्वास पाटील यांच्या कादंबरीवर आधारित आहे. सिनेमाची पटकथा आणि संवाद ही चिन्मय मांडलेकरच्या लेखणीतून साकारलं आहे. चंद्रमुखी साकारणारी अमृता खानविलकर आणि ध्येयधुरंधर राजकारणी साकारणारा आदिनाथ कोठारे ह्या सिनेमाच्या जोडीने प्रदर्शनापूर्वीच रसिकांच्या हदयात स्थान मिळवलंय. 

मराठीत तमाशा-लावणीवर बेतलेले अनेक सिनेमे ब्लॅक आणि व्हाईट काळापासून प्रेक्षकांच्या भेटीला आलेले आहेत. लावणीचं महत्त्व सर्वदूर म्हणजेच लार्जर दॅन लाईफ या म्हणीनुसार दाखवणारा चंद्रमुखी हा सिनेमा प्रदर्शित होतोय, याचीच उत्सुकता जास्त आहे. भव्य-दिव्य सेट, गाणी, उत्कृष्ट कलाकार आणि दमदार कथानक. 

आपल्या घुंगराच्या ठेक्यांनी सर्वांना मोहित करणारी ही सौंदर्यवती चंद्रा जीवनात आलेल्या चढ-उतारांना  कशी सामोरी जाते, हे सिनेमात उलगडत जातं. चंद्रमुखीच्या निमित्ताने एक भव्य-दिव्य कलाकृती मोठ्या पडद्यावर अनुभवण्याची संधी मिळतेय. 

कथानक 

चंद्रा ही प्रसिध्द शाहिराची एकुलती एक लेक असते.  घरच्या बेताच्या  परिस्थितीमुळे फडात नाचणारी अप्रतिम नृत्यांगना आणि सौंदर्यवती चंद्रा आपल्या मोहक अदाकारीने सर्वांनाच वेड लावते.  तिच्या सौंदर्याला आणि नृत्यावर सारेच भुलतात. पण एकेदिवशी राजकारणात सक्रीय असलेलं एक युवा नेतृत्व दौलतराव देशमाने अचानाक चंद्राच्या फडाला उपस्थिती लावतात आणि चंद्राला पाहताचक्षणी तिच्या प्रेमात पडतात. इथूनच सुरु होते चंद्रा आणि दौलतची निखळ आणि निरागस प्रेमकहाणी. मग भेटी-गाठी वाढतात. जवळीक होते व एकमेकांच्या प्रेमात ते आकंठ बुडतात.  पण इथूनच पुढे खरा ट्विस्ट येतो, तो म्हणजे चंद्रावर जीव ओवाळून टाकणारा ध्येयधुरंधर राजकारणी दौलतराव देशमाने हा विवाहीत असतो. त्यामुळे दमयंती दौलतराव देशमाने ही त्याची पत्नी त्याला चंद्राला सोडण्यासाठी धमकी देते. पण ह्या दौलत-चंद्राच्या प्रेमकहाणीत राजकीय रंगही देण्यात आला आहे, तो कसा आहे. नेमकं काय घडतं, की चंद्रासुध्दा पत्रकारपरिषदेत पोहचते. दौलतराव देशमानेची राजकीय कारकिर्द पणाला लागलीय म्हणून तो नेमकं काय पाऊल उचलतो, त्याला कुणी मुद्दाम या प्रकरणात गोवतंय का या सर्व प्रश्नांची उत्तरं सिनेमा पाहताना मिळतीय. 

 

अभिनय

अमृता खानविलकरने आपल्या बहारदार नृत्याप्रमाणेच चंद्रमुखी या व्यक्तिरेखेला 100 टक्के न्याय दिलाय. तिने या व्यक्तिरेखेला खरा चेहरा दिला आहे. तिच्या अभिनयाचं आणि नृत्याचं करावं तितकं कौतुक कमी आहे. प्रत्येक सीन्समधून तिने छाप पाडलीय. पिळदार शरीरयष्टीचा रुबाबदार दौलतराव देशमाने अभिनेता आदिनाथ कोठारेने अचूक साकारला आहे. चंद्रा आणि दौलतरावची केमिस्ट्री अप्रतिम. आपापल्या भूमिकेसाठी त्यांनी घेतलेली मेहनत दिसून येतेय. तर मृण्मयी देशपांडेने दमयंती देशमाने साकारुन लक्ष वेधून घेतलं आहे. तिने साकारलेल्या दमयंतीची असाह्यता आपण समजूच शकतो. याशिाय मोहन आगाशे, समीर चौघुले, राधा सागर, अशोक शिंदे, वंदना वाकनीस, सुरभी भावे आदी कलाकारांनीही आपाआपल्या व्यक्तिरेखा चौख बजावत ही कलाकृती पूर्णत्वास नेलीय. 

 

दिग्दर्शन 

80 च्या दशकातलं तमाशा आणि राजकारण यांची सांगड घालणारं कथानक भव्यदिव्य रुपात पडद्यावर मांडण्याच्या यशस्वी प्रयत्न दिग्दर्शक प्रसाद ओकने केला आहे. सिनेमा पाहताना त्याची भव्य-दिव्यता लक्षात येते. संजय लीला भन्साळींच्या सेटची आठवण आल्यावाचून राहत नाही. सिनेमाची पटकथा व संवाद चिन्मय मांडलेकरने उत्कृष्टरित्या लिहले आहेत. कथानक कुठेच अपूर्ण वाटत नाही. एकामागोमाग घडामोडी घडत घडतात. फक्त मध्यांतरानंतर सिनेमा थोडासा उगीच ताणल्यासारखा वाटतो.  पण एकूणच एक भव्य कलाकृती पडद्यावर पाहिल्याचं समाधान मिळतं. 

 

संगीत 

सिनेमातील गाण्यांनी बहार आणलीय. अजय-अतुलचं संगीत म्हटल्यावर विषयच संपतो. चंद्रा आणि तो चांद राती ही गाणी आपल्याला वेड लावल्याशिवाय राहत नाही. 

 

सिनेमा का पाहावा

महाराष्ट्राची संस्कृती असलेल्या लावणीवर बेतलेल्या एका सर्वौत्तम कथानकाची भव्यता अनुभवायची  असेत तर चंद्रमुखी सिनेमागृहात जाऊन नक्की पाहावा. 

Recommended

Loading...
Share