Dharmaveer Review: ज्वलंत विचारांचा जीवनपट 'धर्मवीर'-मुक्काम पोस्ट ठाणे !

By  
on  

सिनेमा : धर्मवीर- मुक्काम पोस्ट ठाणे
कथा, पटकथा, लेखन आणि दिग्दर्शन : प्रविण विठ्ठल तरडे 
रंगभूषाकार : विद्याधर भट्टे
निर्माते : मंगेश देसाई, झी स्टुडीओज्
संगीत : अविनाश- विश्वाजीत, चिनार-महेश, नंदेश उमप 
गीतकार : मंगेश कांगणे, संगीता बर्वे, डॉ. प्रसाद भिवरे
कलाकार : प्रसाद ओक in and as धर्मवीर आनंद दिघे, क्षितिश दाते, स्नेहल तरडे, अभिजीत खांडकेकर, श्रृती मराठे, गश्मिर महाजनी, मकरंद पाध्ये, शुभांगी लाटकर

रेटिंग - 4 मून्स  

बायोपिक हा सिनेमप्रकार मराठी-हिंदीसाठी नवीन नाही. अनेक बायोपिक आजवर प्रदर्शित झाले आहेत आणि होतीलसुध्दा. पण हा बायोपिक सर्वांत उजवा ठरतोय. गेले अनेक दिवस अभिनेता प्रसाद ओक अभिनीत आणि प्रवीण तरडे दिग्दर्शित धर्मवीर-मुक्काम पोस्ट ठाणे या सिनेमाची चर्चा सुरुय. अखेर हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. शिवसेनेचे झुंजार नेते आणि ठाण्याचे जिल्हाप्रमुख दिवंगत आनंद दिघे यांच्या कारकिर्दीभोवती आणि त्यांनी समाजसेवेसाठी वाहून घेतलेल्या आयुष्याभोवती हा सिनेमा बेतला आहे. 

ठाणे हे मुंबईलगतचं मोठं शहर. याच ठाण्याने आनंद दिघेंचा झंझावात पाहिला. तळागाळातील लोकांचा विचार, गोर-गरिबांच्या-गरजवंताच्या मदतीला धावून जाणं, भगिनी-महिलांचा आदर जपणं आणि अन्याय-जुलूम करणा-यांना जरब बसवणं हे आनंद दिघेंच्या व्यक्तिमत्त्वाचं वैशिष्ट्य. 
हा सिनेमा कथानकावर नाही तर आनंद दिघेंच्या आयुष्यातील ठळक घडामोडींवर, प्रसंगावर बेतला आहे. संघटना बांधणीसाठी आणि समाजसेवेसाठी आपलं संपूर्ण आयुष्य वाहून घेणारं हे सामान्यातलं असामान्य व्यक्तिमत्व. 

दिघेसाहेबांच्या पुण्यतिथीचं कव्हरेज करायला आलेल्या एका न्यूज चॅनेलच्या महिला रिपोर्टरचं ठाण्यात पाऊल पडतं आणि इथूनच सिनेमाची सुरुवात होते. या कार्यक्रमाबद्दलची तिची उदासीनता तिला दिवसभर भेटणा-या प्रत्येक व्यक्तिरेखांमधून उत्सुकतेमध्ये कशी बदलते हे सिनेमात पाहायला मिळतं. वर्तमानकाळातून भूतकाळात दिग्दर्शक अलगद प्रेक्षकांची ने-आण करतो, हे विशेष. एन्ट्रीपासून ते शेवटापर्यंत प्रसाद ओक आपल्या धारदार अभिनयाने प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. चालणं-बोलणं, हात कमरेवर ठेवणं, दाढीवरुन हात फिरवणं आणि राग अनावर झाला की ओठांची एक विशेष हालचाल करणं  हा  दिघेसाहेंबाचा लहेजा त्याने अचूक पकडलाय. आपल्या कार्यकर्त्यांबद्दलची आत्मियता,त्यांची जपणूक  शिवसेना पक्षाला पुढे घेऊन जाण्यासाठीचं खंबीर नेतृत्व आणि माणुसकी हे दिघेसाहेबांचें सगळे गुण त्याने आत्मसात केले आहेत . त्याचा  पडद्यावरचा वावर आपल्याला अवाक करुन टाकतो. सिनेमाभर सतत प्रसाद नाही तर खरेखुरे दिघे साहेबच आहेत, असा भास झाल्यावाचून राहत नाही. यात रंगभूषाकार विध्याधर भट्टे यांचा महत्त्वाचा वाटा आहे. प्रसादच्या कारकिर्दीतला हा बायोपिक माईलस्टोन ठरलाय, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

दिग्दर्शक  प्रवीण तरडे यांनी दिघेसाहेबांच्या आयुष्यातील प्रत्येक प्रसंगांचे बारकावे पडद्यावर सिनेरुपात मांडले आहेत. इतकंच नव्हे तर त्यांच्या सहवासातील अनेक व्यक्तिरेखांचं अगदी बारकाईने चित्रण केलं आहे. त्यांनी केलेला आनंद दिघे या व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास, जीवनाचा घेतलेला वेध, त्यांच्या जुन्या-जाणत्या सहका-यांशी बोलून त्यांना जाणून घेण्याचा केलेला प्रयत्न या सर्वांतून त्यांना दिघे साहेब गवसले आहेत, हे पडद्यावर पाहताना लक्षात येतं. एकापेक्षा एक दमदार संवादांनी सिनेमा जिवंत होतो. गद्दारांना क्षमा नाही.., जंगलात राहून वाघाशी आणि महाराष्ट्रात राहून माझ्याशी वैर नाही घ्यायचं असे अनेक संवाद हे प्रदर्शनापूर्वीच लोकप्रिय ठरले आहेत. 

सिनेमातले अनेक प्रसंग आपल्या आ वासून टाकतात. ठाण्याच्या शिवसेना महिला आघाडीप्रमुख बिरजे बाईंच्या घरावर मुसलमानांनी केलेला हल्ला आणि या हल्ल्याचा बिरजे बाईंनी (स्नेहल तरडे)  या शिवसेनेच्या वाघीणीने केलेल्या एकटीने सामना..तिच्या मुलानं आनंद काकांना बोलाव ना... अशी केलेली आर्त केविलवाणी  विनवणी व त्याचक्षणी आनंद दिघेंचं तिथे त्यांना वाचवण्यासाठी येण हे प्रसंग मनाला स्पर्शून जातात. कार्यकर्त्यापेक्षा आपला सोबती म्हणून त्याला जपणं हा दिघेंच्या व्यक्तीमत्त्वाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू. वैयक्तिक आयुष्यात आलेल्या वादळाने जगणं विसरलेल्या एकनाथ शिंदेंच्या (क्षितीश दाते) खांद्यावर मी सोबत आहे, असा  विश्वास देऊन त्यांना दिघे साहेबांनी पुन्हा उभं केलं. बलात्का-याची कोर्टाने पुराव्याअभावी मुक्तता केली खरी पण दिघेंच्या न्यायालयात त्याला कठोर शिक्षेला सामोरं जावं लागलं.  कधी कायद्याच्या चौकटीत राहून तर कधी कायद्याच्या चौकटीबाहेर राहून दिघे साहेबांनी मिळवून दिलेला न्याय कुणीच विसरु शकणार नाही. त्यांच्या दरबारात आलेला कुठलाच व्यक्ती निराश होऊन परतणार नाही. हे सगळेच प्रसंग दिग्दर्शकाने उत्कृष्ट मांडले. तसाहेबांसाठी हॉस्पिटलबाहेर आणि कोर्टाबाहेर दिवसरात्र तात्कळत उभा असलेला शिवसैनिक, त्यांचा सच्चा भक्त असा अथांग जनसमुदाय पाहून अचंबित व्हायला होतं. 

सिनेमातल्या प्रत्येक व्यक्तिरेखेने आपली छाप सोडलीय. या सिनेमाची आणखी एक अधोरेखित करणारी गोष्ट म्हणजे सिनेमाचं पार्श्वसंगीत. दमदार पार्श्वसंगीतासोबत हा जीवनपट पाहणं खुपच रंजक होऊन जातो. सिनेमातील गुरुपोर्णिमा, आनंद हरपला, अष्टमी ही गाणी सिनेमाला चार-चॉंद लावतात. बारकावे टिपण्याच्या नादात सिनेमाची लांबी जास्त वाटत असली तरी तो परिपूर्ण ठरतो. प्रत्येक फ्रेम, ड्रोन्सने घेतलेले सगळे शॉर्ट्स अप्रतिम आहेत. 

ठाणेकर नसलेल्या प्रत्येकाला या लोकप्रिय लोकनेत्याचा हा धगधगत्या अग्निकुंडातला जीवनप्रवास प्रभावित केल्यावाचून राहणार नाही, त्यामुळे आवर्जुन पाहावा असाच हा सिनेमा आहे. 

 

 

 

 

 

 

Recommended

Loading...
Share