By  
on  

Medium Spicy Review : निस्सीम प्रेम त्रिकोणाची चविष्ट अशी 'मिडीयम स्पायसी' गोष्ट

कालावधी : २.३० तास
कथा : इरावती कर्णिक
दिग्दर्शक : मोहित टाकळकर 
कलाकार : ललित प्रभाकर, सई ताम्हणकर, पर्ण पेठे, सागर देशमुख, स्पृहा जोशी, नीना कुलकर्णी, इप्शीता चक्रवर्ती, अरुंधती नाग, रवींद्र मंकणी, नेहा जोशी, पुष्कराज चिरपुटकर

हॉटेलमध्ये आपलं सर्व कौशल्य पणाला लावून खवय्यांसाठी उत्तमोत्तम पदार्थ तयार करणारे शेफ आणि त्यांची नातीगोती, मैत्री, त्यांचं भावविश्व प्रेक्षकांपुढे आणणारा तसेच शहरी जीवनातील नातेसंबंध,  करिअर, प्रेम, लग्नसंस्था यावर भाष्य करणारा सिनेमा म्हणजे 'मिडीयम स्पायसी'.

 

कथानक :
ही गोष्ट आहे निस्सीम (ललित प्रभाकर), गौरी (सई ताम्हणकर) आणि प्राजक्ता (पर्ण पेठे) या तीन शेफच्या लव्ह ट्रँगलची...

निस्सीमला पॅरिसहुन एक्सिक्युटिव्ह शेफची ऑफर येते. याचा इंटरव्ह्यू त्याने दिलाय मात्र अधिकृतरित्या पॅरिसहुन त्याला बोलावणं आलं नाहीये, यादरम्यान त्याचं लग्न व्हावं अशी निस्सीमच्या आईची (नीना कुलकर्णी) यांची इच्छा असते. जी बहुतेक प्रत्येक भारतीय आईंची आपल्या मुलांबाबत असते. मात्र निस्सीमच्या मित्रपरिवारातील आणि त्याच्या अवतीभवतीच्या माणसांचे वैवाहिक जीवन पाहून त्याचं लग्नाबाबतचं मत हे जरा नकारात्मक असल्याचं वाटतं. 

सिनेमाची सुरुवात एका रियुनियन पार्टीने सुरू होते. त्या पार्टीत कृष्णा (स्पृहा जोशी) ही देखील आलेली असते. कृष्णा ही निस्सीमची शाळेपासूनची मैत्रीण आहे. शाळेपासून ते एकमेकांना पसंत करत असतात. पार्टीनंतर कृष्णा आणि निस्सीम एकमेकांशी बोलत असताना कृष्णा निस्सीमला त्याने वेळीच त्याची प्रेमभावना व्यक्त केली नाही याबद्दल विचारते आणि निघून जाते.

सिनेमाचं कथानक हे शेफ्सशी संबंधित असल्यामुळे साहजिकच हॉटेलचं किचन, तिथली धावपळ आणि ते किचन सांभाळणारी एक टीम आलीच. अशीच एक टीम या सिनेमात देखील आहे. ज्या टीममध्ये निस्सीम (ललित प्रभाकर), गौरी (सई ताम्हणकर), शुभंकर (सागर देशमुख) यांच्यासह इतर शेफ्स देखील आहेत. मग यांच्यात मॅनेजर पदावर असणारी आणि होटेलमध्ये आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करणारी प्राजक्ता (पर्ण पेठे) हिची एंट्री होते. जिला पाहून निस्सीम तिच्या प्रेमात पडतो. इतकंच काय तर तो तिच्याबरोबर आयुष्य एकत्र घालवण्याचं स्वप्नं देखील पाहतो. मात्र त्याच्या योग्यवेळी भावना व्यक्त न करण्याच्या स्वभावामुळे तो तिला गमावतो. निस्सीमने वेळीच भावना व्यक्त न केल्याने प्राजक्ता तिच्या लग्नाचा निर्णय घेऊन टाकते आणि मग एकेदिवशी निस्सीमला लग्नाबद्दल सांगते. तिचा हा निर्णय निस्सिमला अनपेक्षित असल्याने डिप्रेस आणि नाखूष झालेला निस्सीम शेवटी लग्नाच्या विचाराने मॅट्रिमोनी साईट वर त्याचं नाव रजिस्टर करतो. याचवेळी गौरी आणि निस्सीम यांच्यातील गैरसमजामुळे त्यांच्या मैत्रीत देखील दुरावा निर्माण होतो.

पुढे निस्सीमला त्याचे बाबा (रवींद्र मंकणी) हे आयुष्यात पार्टनर किती महत्वाचा असतो, हे निस्सीमच्या आईचे उदाहरण देऊन सांगतात. पुढे निस्सीमच्या मित्राची शुभंकरची (सागर देशमुख) सोडून गेलेली बायको (ईप्शीता चक्रवर्ती) देखील त्याच्या आयुष्यात परत येते. निस्सीमच्या या मित्रा मुळे (सागर देशमुख) सिनेमात मध्ये मध्ये हलक्या फुलक्या गंमती निर्माण होतात, ज्यामुळे सिनेमा कंटाळवाणा वाटत नाही.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by @lalit.prabhakar

त्याचबरोबर वरवर साध्या सोप्या असणाऱ्या या कथेला दिग्दर्शकाने एक अनोखी झालर देखील आहे, ती म्हणजे आंतरधर्मीय विवाहाची. निस्सीमच्या आत्याने (अरुंधती नाग) एका मुस्लिम फोटोग्राफर सोबत पळून जाऊन लग्न केल्याने निस्सीमच्या नातेवाईकांनी तिच्याशी संबंध तोडून टाकले. मात्र एके दिवशी आईबाबा बाहेर गावी गेले असताना निस्सीम त्याच्या आत्याकडे जातो. तो तिथे गेला असताना आत्याबरोबरच्या संवादाने त्याचे प्रेमभावनेच्या संबंधाविषयी मतपरिवर्तन होते. आत्याच्या आणि आत्याच्या नवऱ्याच्या वैवाहिक नात्याकडे बघून निस्सीमचे त्याच्या आयुष्यातील नात्यांविषयीचे विचार बदलतात. मग लग्नाविषयी आणि आयुष्यातल्या नात्यांविषयी संभ्रमित असलेला निस्सीम सकारात्मक होतो आणि याच वेळी आत्याने लिहलेलं एक पुस्तक तो खास व्यक्तीसाठी घेतो.

यानंतर मग निस्सीमचं हे लग्नाविषयी बदललेलं मत काय आहे? निस्सीमच्या आयुष्यात कुणी येतं की नाही? भावना व्यक्त न करणारा निस्सीम आपला स्वभाव बदलतो का? आपल्या भावना व्यक्त करायला शिकतो का? ह्या सर्व    प्रश्नांची उत्तरं तुम्हाला सिनेमा बघूनचं कळतील.

याचबरोबर सिनेमाच्या कथानकाच्या हातात हात घालून कथानकाला पुढे घेऊन जाणारी, "चाल का बदललेली" आणि "बोलायला शब्द का पाहिजे?" ही दोन गाणी देखील या सिनेमात आहेत. यातील 'चाल का बदललेली' गाण्यात निस्सीम (ललित) हळुवारपणे प्रेमभावना व्यक्त करत आहे. या गाण्यात प्राजक्ता (पर्ण) आणि निस्सीम (ललित) एकमेकांबरोबरची थोडी मस्ती, थोडं प्रेम आणि खेळकरपणा दिसत आहे. गीतकार जितेंद्र जोशीने या गाण्याचे शब्द लिहिले असून ऋषीकेश, सौरभ, जसराज यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं आहे. तसेच अभय जोधपूरकरने हे गाणं गायलं आहे. त्याचबरोबर 'बोलायला बोल का पाहिजे' या गाण्यात निस्सीम (ललित) गौरीच्या (सई) मागे चालत आहे आणि बॅकग्राऊंडला सुरू असलेल्या या गाण्यातून दोघेही निःशब्द संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत. या गाण्यात निस्सीमला गौरीला बरेच काही सांगायचे आहे मात्र दोघांमधला संवाद हरवला आहे. त्यांच्या मनातले हे प्रश्न संगीतकार जितेंद्र जोशीने सुंदर शब्दात मांडले आहेत आणि हृषिकेश, सौरभ, जसराज यांनी हळुवार चालीने या गाण्याची योग्य गुंफण केली आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by @lalit.prabhakar

दिग्दर्शन :
 

मराठी, हिंदी, उर्दू, कन्नड भाषिक रंगभूमीवरील प्रसिद्ध आणि आघाडीचे नाव आणि एक उत्तम संकलक म्हणून प्रसिद्ध असलेले युवा नाटककार मोहित टाकळकर "मीडियम स्पाइसी" या सिनेमाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीत दिग्दर्शक म्हणून पदार्पण करत आहेत. त्यांनी या चित्रपटातून सध्याच्या शहरी वातावरणातील तरणाईचे नातेसंबंध वेगवेगळ्या दृष्टिकोनातून उलगडण्याचा प्रयत्न 'मिडीयम स्पायसी' मध्ये केला आहे. 

 

सिनेमा का पाहावा?
 

हल्ली शहरी भागातील माणसांचे नातेसंबंध हे गुंतागुंतीचे होऊ लागले आहेत. दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टी गुंतागुंतीच्या असतात किंवा आपण त्यात अधिक गुंतागुंत करून ठेवतो. सिनेमाच्या सुरुवातीपासून प्रेक्षकांना कथानकाला खिळवून ठेवणारा हा सिनेमा मध्यंतराला थोडासा रटाळ वाटतो. पण कौटुंबिक नात्यांसह शहरी जाणिवांचा अनुभव घेण्यासाठी 'मिडीयम स्पायसी'चा आस्वाद जरूर घेतला पाहिजे...

 

 

पाहा ट्रेलर 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive