Y Review : आवर्जून पहावी अशी, कल्पनेपलीकडील वास्तवाची 'तिची' गोष्ट!

By  
on  

कालावधी : २.३० तास
कथा आणि दिग्दर्शन : अजित सूर्यकांत वाडीकर
लेखक : अजित सूर्यकांत वाडीकर, स्वप्नील सोजवाल
कलाकार : मुक्ता बर्वे, नंदू माधव, प्राजक्ता माळी, ओंकार गोवर्धन, संदिप पाठक, रोहित कोकाटे, सुहास सिरसाठ, काव्या पाठक, प्रदीप भोसले. 

 

'वाय' या सिनेमाची कथा महाराष्ट्रातील विश्रामपूर या गावातली असली तरी सिनेमात मांडलेली व्यथा ही संपूर्ण महाराष्ट्राची आहे. वाय हा थरारक आणि अंगावर शहारा आणणारा आहे तितकाच तो डोळ्यात अंजन टाकणारा देखील आहे. आजसुध्दा खेड्या-पाड्यात किंवा अगदी शहरातसुध्दा हे राजरोसपणे घडतं, पण क्वचितचं त्याचं बिंग फुटतं. ही तिच्या अस्तित्वाची लढाई आहे. 

'वाय' सिनेमाची सुरुवात गर्भलिंग निदान चाचणीच्या कॉम्प्युटरवर दिसणाऱ्या दृश्यांनी होते. विश्रामपूर येथे रेडिओलॉजिस्ट पुरुषोत्तम गायकवाड (नंदू माधव) यांचा स्वतःचा दवाखाना आहे. वरकरणी प्रोफेशनल दिसत असलेला आणि साधा दवाखाना चालवणारा हा डॉक्टर पुरुषोत्तम गायकवाड त्याच्या दवाखान्यात बेकायदेशीर गर्भलिंगनिदान चाचण्या करतो आणि हा गर्भ स्त्रीचा असल्यास तिचा गर्भपात करण्यात येतात. याच उद्देशाने मुलींना गर्भातच मारण्यासाठी या पुरुषोत्तम डॉक्टरकडे महिन्याच्या शेवटच्या शनिवारी अनेक स्त्रिया येत असतात.

'वाय' सिनेमाचे कथानक हे साधेसरळ असले तरी कथानकाची मांडणी ही थ्रिलर पद्धतीने केलेली आहे. त्यामुळे सिनेमाच्या थ्रिलरचा भाग लक्षात घेऊन काही नॉन-लाइनर कथा वापरून दिग्दर्शकाने हा सिनेमा प्रेक्षकांसमोर मांडलेला आहे. एकामागून एक घटनांची मालिका सादर करून सिनेमाची सुरुवात होते आणि ते नंतर फ्लॅशबॅक पद्धतीने एकेक घटना उलगडून शेवटी त्या मुख्य कथानकाला कश्या जोडलेल्या आहेत हे सिनेमा बघितल्यावरचं लक्षात येते.

'वाय' सिनेमात ग्रामीण भागाच्या बाहेर उद्भवणाऱ्या धोक्याचेही यशस्वीपणे चित्रण करण्यात आले आहे. या सिनेमातील काही घटना, काही प्रसंग हे अंगावर शहारे आणणारे आहेत. त्याचबरोबर सिनेमातील काही दृश्य ही त्रासदायक देखील आहेत, परंतु सिनेमाची गरज म्हणून आणि सिनेमाचं कथानक प्रेक्षकांसमोर यशस्वीपणे मांडण्यासाठी ही थरारक दृश्ये महत्वाची ठरतात आणि मुळात या सिनेमाचे दिग्दर्शक वाडीकर हे स्वत: प्रॅक्टिस करणारे डॉक्टर असल्याने चित्रपटातील वास्तववाद त्यांनी प्रकर्षाने मांडला आहे. 

डॉ. आरती देशमुख (मुक्ता बर्वे) ही एक वैद्यकीय अधिकारी आहे जी विश्रामपूर मधील दवाखाने (PCPNDT) या कायद्याचे पालन करत आहेत की नाही हे तपासण्याचे काम करते. डॉ. आरती देशमुख हिला पुरुषोत्तम दवाखान्यातील काही संशयास्पद घटनांमुळे दवाखान्याच्या एकूण कारभाराची शंका येते. पण पुराव्यांअभावी ती काहीही सिद्ध करू शकत नाही. पण तरी ही आरती देशमुख काही हार मानण्यातली नाही हे सिनेमात वारंवार दिसते.

अभिनेत्री मुक्ता बर्वेची (डॉ. आरती देशमुख) सिनेमात थोडी उशीरा एंट्री होते, मात्र तिची उशिराची एंट्रीचं सिनेमाच्या दृष्टीने न्याय्य असल्याचे जाणवते. सिनेमात मुक्ताची साधारण ओळख झाल्यानंतर तिच्या पात्राला स्क्रिनवर जास्तीत जास्त वेळ मिळतो आणि मग अभिनेत्री म्हणून मुक्ता बर्वे सिनेमावर राज्य करते. मुक्ताच्या चेहऱ्यावर भ्रष्ट लोकांना पकडून त्यांना शिक्षा करण्याचा दृढनिश्चय आणि धडपड संपूर्ण सिनेमात आपल्याला दिसते. त्याचबरोबर काही वेळेस तिची सहानुभूती देखील वाटते आणि मध्ये मध्ये तिची दया देखील येते.

वाय सिनेमातला डॉ. पुरुषोत्तम हा निर्दयी आहे पण अभिनय नंदू माधव यांनी तो उत्तम साकारला आहे. सिनेमात निगेटिव्ह भूमिका असली तरी त्या भूमिकेचा अतिरेक दिसून येत नाही. त्यामुळे नंदू माधव यांनी साकारलेला डॉ. पुरुषोत्तम हा पूर्ण सिनेमात त्याची नकारात्मक भुमीका प्रेक्षकांसमोर आणण्यात यशस्वी झालेला दिसतो. त्याचबरोबर सुहास शिरसाट यांनी साकारलेला मुन्ना हा देखील त्याच्या अभिनयाची छाप प्रेक्षकांवर सोडतो. तसेच प्राजक्ता माळीची छोटीशी भूमिका देखील लक्षवेधी ठरते. आणि सहाय्यक पात्राच्या भूमिकेतले ओंकार गोवर्धन, रोहित कोकाटे आणि बालकलाकार काव्या यांचा देखील अभिनय चांगला आहे. 

'वाय' सिनेमात राकेश भिलारे यांनी उत्तम कॅमेरा वर्क्स केले असून सिनेमाचं पार्श्वसंगीत हेदेखील कथानकाला साजेसे आहे. त्याचबरोबर सिनेमाचं एडिटिंग ही जमेची बाजू आहे. एडिटिंग उत्तम प्रकारे केली गेली असून त्याचा योग्य तो प्रभाव सिनेमावर झाला आहे.

सिनेमा उत्तम प्रकारे हाताळला गेला असला तरी सिनेमाचा मध्यांतर आणि शेवट हा न पटण्यासारखा आहे. सिनेमाचा मध्यांतर हा अनपेक्षितपणे येत असल्याने सिनेमा बघताना मध्येच लिंक तुटते. त्याचबरोबर सिनेमाचा शेवट हा कथा पूर्ण व्हायच्या आधीच येतो असे वाटते. प्रेक्षक सिनेमात गुंतला असताना शेवटी अचानक क्रेडीट्सची सुरुवात होते आणि सिनेमा संपतो.

 

दिग्दर्शन :
 

'वाय' सिनेमाचं दिग्दर्शन अजित वाडीकर यांनी उत्तम रित्या हाताळले आहे. दिग्दर्शक अजित वाडीकर यांनी सिनेमातील पात्र आणि त्यांच्या घटनांचा हायपरलिंक थरार ज्यापद्धतीने मांडला आहे, त्यावरून त्यांचा हा पहिलाच सिनेमा असल्याचं वाटतं नाही. त्याचप्रकारे अजित वाडीकर यांना वैद्यकीय क्षेत्रातला अनुभव गाठीशी असल्याने त्यांनी या सिनेमातील वास्तवदर्शी चित्रण अचूक आणि नेमके मांडलेले दिसून येते.

 

 

सिनेमा का पहावा ?
 

अनेक वर्षांनी हायपरलिंक असलेला थरारपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे असून या सिनेमाच्या माध्यमातून दिग्दर्शकाने स्त्रीभ्रूणहत्या यासारख्या महत्वाच्या मुद्द्यावर भाष्य केले आहे. त्याचबरोबर या सिनेमाचं शीर्षक हे 'वाय' का आहे? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला वाय हा सिनेमा पाहणे गरजेचे आहे.

Recommended

Loading...
Share