By  
on  

‘स्वराज्यजननी जिजामाता’ मालिकेत दिसणार पन्हाळ्याहून सुटकेचा थरार

पन्हाळगडाच्या कडेकोट वेढ्यातून निसटून विशाळगडावर पोहोचेपर्यंतचा थरार रोमांचकारी आहे. स्वराज्यसंघर्षातील रणसंग्रामात सह्याद्रीच्या पर्वतरांगांतून, खडतर मार्गावरून पन्हाळा ते विशाळगड असा प्रवास शिवरायांनी आणि त्यांच्या ३०० बहाद्दर मावळ्यांनी केला. अंगावर शहारे आणणारा या रक्तरंजित पर्वाचा इतिहास सोनी मराठीवरील ‘स्वराज्यजननी जिजामाता’ या मालिकेच्या येत्या भागांतून उलगडणार आहे. बुधवार १२ मे ते शुक्रवार १४ मे दरम्यान रात्रौ ८.३० वा. या पर्वाचा विशेष भाग सोनी मराठी वाहिनीवर पहायला मिळणार आहे.

 

प्रतापगडाचा पराभव आदिलशहाला चांगलाच जिव्हारी लागला. या पराभवानंतर आदिलशहाने सिद्धी जौहर यास महाराजांच्या बंदोबस्तासाठी पन्हाळ्यास पाठवले. प्रचंड पावसात वेढा चालवणं विजापूरी सैन्यास अशक्य होईल हा छत्रपती शिवरायांचा अंदाज सिद्धीने खोटा ठरवला. या कडेकोट वेढ्यातून निसटून जाण्यासाठी निवडक मावळे घेऊन दुर्गम मार्गाने विशाळगडाकडे भर पावसात रात्रीच्या वेळी निसटण्याची मोहीम महाराजांनी आखली. या मोहिमेतील शिवा काशिदांचे हौतात्म्य, बाजी-फुलाजी बंधूंचा पराक्रम, बांदलांच्या अज्ञात मावळ्यांचे शौर्य आणि बलिदान, विशाळगडाच्या पायथ्याशी महाराजांचा घनघोर संग्राम या साऱ्या पराक्रमी प्रसंगांची गाथा या विशेष भागातून उलगडणार आहे.

सिद्धी जोहरच्या वेढ्यातून शिवरायांची सुटका हा मराठेशाहीच्या इतिहासातील रोमांचक अध्याय मालिकेतून प्रभावीपणे प्रेक्षकांपर्यत पोहचावा यासाठी मालिकेच्या टीमने विशेष मेहनत घेतली आहे. कृत्रिम पावसाच्या सहाय्याने रात्रीच्या वेळी हे सारे प्रसंग चित्रित करण्याचे जिकीरीचे आव्हान मालिकेच्या संपूर्ण टीमने पेलल्याचे निर्माते सांगतात.
 

Recommended

PeepingMoon Exclusive