By  
on  

'सूर नवा ध्यास नवा'चं नवीन पर्व प्रेक्षकांच्या सांगितिक मेजवानीसाठी सज्ज

केवळ महाराष्ट्रातीलच नव्हेतर जगभरातील मराठी रसिक श्रोते ज्याची चातकासारखी वाट पहात असतात तो रसिकजनांच्या हृदय सिंहासनावर अधिराज्य गाजवणारा… मराठी संगीत रिॲलिटी शोमधील ‘मेरूमणी’ अर्थात कलर्स मराठीवरील सर्वाधिक लोकप्रिय आणि दर्जेदार कार्यक्रम “सूर नवा ध्यास नवा “- पर्व गाण्याचे मराठी बाण्याचे हे ब्रीद समोर ठेवू आपलं पाचवं लखलखतं पर्व घेऊन अवतरत आहे.  १५ ते ३५ वयोगटातील या महत्त्वपूर्ण पर्वात फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर सिंगापूर, नेपाळ, इंदूर, भोपाळ, दिल्ली अशा भाषा, प्रांत, देश यांच्या सीमा पार करत  सुमारे पाच हजार स्पर्धकांनी या मंचावरून आपलं सुरांचं नशीब आजमावण्याचं स्वप्न पाहिलं. आणि त्यातून विविध चाचणी फेऱ्यांची कसोटी पार करत सुरेल १६ स्पर्धक आपल्या सुरांचा कस लावण्यासाठी आता सज्ज झाले आहेत. आता दर शनिवार आणि रविवारी रात्री साडे नऊ वाजता सुरांची ही खास मैफिल कलर्स मराठीवर सजणार आहे. मराठी संगीतक्षितिजावरचे हे उगवते सुरेल १६ गायक सुरांची आतषबाजी करणार आहेत, सूर नवा ध्यास नवा -पर्व गाण्याचे मराठी बाण्याचे ग्रँड प्रिमियर मध्ये येत्या रविवारी २४ जुलैला सायं ७ वा. आणि पुढील भाग शनि – रवि रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

“सूर नवा ध्यास नवा “या स्पर्धेने आपले वेगळेपण जपण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे. फक्त परीक्षकाच्या भूमिकेतून नाहीतर निर्मात्याच्या भूमिकेतून कार्यक्रमाला लोकप्रिय करण्यासाठी जीव ओतणारे महाराष्ट्राचे जोशिले रॅाकस्टार गायक आणि लाडके संगीतकार अवधूत गुप्ते …. तसंच शास्त्रीय संगीत नव्या पिढीत रूजवण्याचा नि ते जगभर पसरवण्याचा ध्यास घेतलेले राष्ट्रीय पुरस्कार विजेते शास्त्रीय गायक महेश काळे.. ही या कार्यक्रमाची अत्यंत महत्वाची बलस्थाने आहेत. 

संगीत आणि महाराष्ट्राचे अतूट नाते असे म्हंटले जाते, आणि म्हणूनच या पर्वामध्ये मराठी बाण्याचा नजराणा आणला आहे. महाराष्ट्राच्या मातीतून अनेक दर्जेदार गायक आजवर आपल्याला मिळाले, ज्यांनी सादर केलेली गाणी आजवर आपल्या स्मरणात आहेत. त्याच संगीताला पुन्हाएकदा ऐकण्याची सुवर्णसंधी आपल्याला सूर नवा ध्यास नवाच्या मंचाद्वारे मिळणार आहे. सूर नवा ध्यास नवाच्या नव्या पर्वाची घोषणा झाल्यापासूनच त्याबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता होती. मराठी वाहिनीवर असं प्रथमच घडणार कि, सूरवीर फक्त मराठी गाणीच सादर करणार आहेत. मागील आठवड्यामध्ये सिटी ऑडिशनचे भाग प्रसारित झाल्यानंतर या गोड गळ्यांच्या सूरवीरांमधून कुणाची निवड होणार याचे वेध आता प्रेक्षकांना लागले आहेत. मेगा ऑडिशनमधून याचे उत्तर प्रेक्षकांना मिळणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संवेदनशील गुणी अभिनेत्री आणि कवी मनाची आपली लाडकी स्पृहा जोशी करणार आहे.

“सूर नवा” कार्यक्रमाच्या पाचव्या पर्वाबद्दल बोलताना कलर्स मराठीचे व्यवसाय प्रमुख, अनिकेत जोशी म्हणाले, “सूर नवा ध्यास नवा या सूरतालाच्या मैफिलीला आजवर भरभरून प्रेम मिळाले. कार्यक्रमाच्या चारही पर्वानंतर आता नवीन काय ? याची उत्सुकता असतानाच हे पर्व मराठी बाण्याला अणि मराठी गाण्याला समर्पित करावे असा निर्णय घेण्यात आला. आपल्या मराठमोळ्या संस्कृतीचा आत्मा संगीत असं बोललं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. कारण महाराष्ट्रात प्रत्येक क्षणाला साजेस अस गाण आहे. मुख्य म्हणजे ही गाणी आपली संस्कृती अणि परंपरेसोबत मराठी बाणा देखील जपतात. आता मराठी बाण्याची गाणी म्हटलं म्हणजे दर्जेदार, सुश्राव्य गाणी तर आलीच. पण, याचसोबत अलौकिक, समृध्द मराठी संगीत यात्रेची दिंडी असेल शंका नाही. कार्यक्रमाच्या वेळेमध्ये आणि दिवसामध्ये देखिल बदल करण्यात आला आहे. आम्हांला आशा आहे या पर्वाला देखील रसिक प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळेल.”
 
कलर्स मराठीचे प्रोग्रामिँग हेड, विराज राजे म्हणाले, “सूर नवा ध्यास नवा हा कार्यक्रम रसिकांच्या विशेष जवळचा आहे. या कार्यक्रमाकडून काही अपेक्षा आहेत आणि म्हणूनच या पर्वाद्वारे काहीतरी खास आपल्या भेटीस आणावे अशी आमची इच्छा होती. मग हे पर्वचं मराठी गण्याचे असावे अशी कल्पना सुचली जे आजवर कधीच झाले नाही. संत तुकारामांचे अभंग इंद्रायणीच्या पाण्यावर तरंगून अमर झाले, तसं मराठी गाण्यांना सूर नवा ह्या श्रवणीय आणि दर्शनीय कार्यमात सादर करून, मराठमोळ्या गाण्यांचा अनमोल खजिना लोकांपर्यंत पोहचवावा हा कलर्स मराठीचा प्रयत्न आहे. कार्यक्रमाच येणारं सत्र हे पाचवं सत्र आहे आणि रसिक प्रेक्षकांचा दणदणीत प्रतिसाद मिळेल हा विश्वास वाटतो. महाराष्टाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या या स्पर्धकांची तयारी वाखाण्याजोगी आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळेच या पर्वामध्ये आपल्याकडे असलेला संगीताचा ठेवा, मराठी गाणी अत्यंत अप्रतिमरित्या सादर होणार यात शंका नाही.”

सूर नवा ध्यास नवाच्या या नव्या पर्वाची घोषणा झाल्यापासूनच त्याबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता होती. पहिल्या पर्वांना मिळालेल्या भरघोस यशानंतर आता या पर्वामध्ये काय नवं असणार आहे हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहचली होती. मागील आठवड्यामध्ये सिटी ऑडिशनचे भाग प्रसारित झाल्यानंतर या गोड गळ्यांच्या सूरविरांमधून कुणाची निवड होणार याचे वेध आता प्रेक्षकांना लागले आहेत. येत्या २ जुलैपासून प्रक्षेपित होणाऱ्या मेगा ऑडिशनमधून याचे उत्तर प्रेक्षकांना मिळणार आहे.

कार्यक्रमाविषयी बोलताना महेश काळे म्हणाले की, “लॉकडाऊनच्या काळात सूर नवाचं मागील सत्र अत्यंत जोखीमेचं आणि आव्हानात्मक गेलं. तीन वेगवेगळया प्रातांत फिरून देखील आम्ही ते सत्र यशस्वीरित्या पार पाडलं. आता सगळं पूर्ववत होत असताना संगीताने आपण त्याचा उत्सव साजरा करतो आहे याचा खूप आनंद आहे. सूर नवा ध्यास नवा नेहेमीच चांगलं दर्जेदार संगीत हे घेऊन येतं. जरी स्पर्धा असली तरी त्याला मैफिलीचं स्वरूप येतं अश्या पध्दतीचा हा निराळा असा कार्यक्रम आहे. यावेळेस १५ ते ३५ असा वयोगट आहे, महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून, वेगवेगळ्या गावातून मुलं – मुली आली आहेत. जेव्हा ते येतात आपआपल्या मातीचा सुगंध, प्रातांची खासियत घेऊन येतात त्यामुळे शास्त्रीय, उपशास्त्रीय, लोकसंगीत अशा महाराष्ट्रातल्या वेगळ्या ज्या धारा आहेत त्या आपल्याला ऐकायला मिळणार आहेत त्याची मी स्वत: देखील वाट बघतो आहे. या सत्रामध्ये माझ्यासाठी विशेष असं आहे की, प्रत्येक नवीन स्पर्धक जेव्हा येतो तो स्वत:ची नवीन ऊर्जा, नवीन गाणी घेऊन येतो. कुठेतरी आपल्याकडंच सगळ्यात चांगलं देण्याच्या उमेदीने येतो. काही नवीन गाणी यानिमित्ताने मला ऐकायला मिळतात, त्यामुळे मला असं वाटतं मी परीक्षकाच्या भूमिकेत जरी असलो तरी त्या स्पर्धेचे परीक्षण करत असताना मी सुध्दा नवीन गाणी ऐकून, नवीन ऊर्जा मिळून समृध्द होतो आणि चार गोष्टी मलादेखील शिकायला मिळतात.”
 
कलर्स मराठीच्या कुटुंबाचाच भाग असलेले तसेच कार्यक्रमाचे निर्माते आणि परीक्षक अवधूत गुप्ते म्हणाले, “आम्ही सूर नवा ध्यास नवाचे पाचवे पर्व घेऊन येत आहोत. सूर नवा... सुरू झाल्यापसून आम्ही वेगवेगळ्या पध्दतीने विशेष पर्व केली. या पर्वाचे वैशिष्ट्य असं आहे की, यामध्ये जी गाणी स्पर्धक गाणार आहेत ती फक्त मराठी गाणी असणार आहेत. अर्थात स्पर्धेची मराठी गाणी सोडता त्यापलिकडे काही विशेष औचित्य घडलं तर काही हिंदी गाणी देखील सादर होतील, परंतू त्याचा अंतर्भाव गुण देण्यासाठी होणार नाही हे मात्र नक्की ! करोनाच्या या दोन वर्षाच्या वर्च्युल जगामधून अॅक्चुअल जगामध्ये येताना आम्ही कार्यक्रमाच्या ऑडीशन्स महाराष्ट्राच्या चार शहरांमध्ये केल्या आणि त्याला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला. या पर्वामध्ये सेटपासून ते राऊंड पर्यंत अनेक नवनवीन गोष्टी होणार आहेत. याचसोबत तुमचा प्रत्येक वीकेंड सांगितीक होईल याची आम्ही जबाबदारी घेत आहोत”.


कार्यक्रमाची सूत्रसंचालक स्पृहा जोशी कार्यक्रमाबद्दल म्हणाली, “गेल्या चार वर्षात मी या कार्यक्रमामुळे इतक्या वेगवेगळ्या पध्दतीचे अनुभव घेतले आहेत आणि या कार्यक्रमाने मला इतकं भरभरून दिलं आहे की माझे या संपूर्ण टिमसोबत जिव्हाळ्याचं नातं तयार झालं आहे. या पर्वा दरम्यान मला देखील अनेक गोष्टी शिकता आल्या, नवीन लोकांशी संवाद साधता आला. हर्षद नायबळ सारखा खूप गोड असा नवा मित्रा मिळाला... कोविडच्या या काळात आमच्या एकवीरा प्रॉडक्शने अप्रतिमरित्या निर्मितीची धुरा सांभाळली, त्यातूनही लोकांना कसं एकत्र बांधून ठेवायचं हे शिकता आलं. या सगळ्यात महत्वाची आणि माझ्या आवडीची गोष्ट म्हणजे गाण्यात रमता येणं आणि इतक्या वेगळ्या प्रकारच्या सुंदर गाण्यांचा आस्वाद जवळून घेता येण ही माझ्यासाठी खूप छान गोष्ट आहे. वादक कलाकार, तसेच अवधूत, महेश त्यांच्या एक्स्पर्ट कॉमेन्टस, त्यांच बोलणं, त्याचे विचार यातून मला असं वाटतं माझाही कान घडत गेला. मी एक चांगला श्रोता म्हणून तयार होते आहे त्याचं श्रेय खूप अंशी सूर नवा ध्यास नवाचं आहे. या पर्वाची आम्हांला सगळ्यांना खूप उत्सुकता आहे कारण कोविड नंतरचं हे पर्व असणार आहे. एक नवा विश्वास आणि उमिद घेऊन आम्ही प्रेक्षकांसमोर येणार आहोत.”
 
या सुरेल प्रवासाचे आपण देखिल साक्षिदार होऊया नक्की बघा सूर नवा ध्यास नवा -पर्व गाण्याचे मराठी बाण्याचे ग्रँड प्रिमियर येत्या रविवारी २४ जुलैला सायं ७ वा. आणि पुढील भाग शनि – रवि रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive