अग्निहोत्र 2 Teaser: वाड्याच्या इतिहासाशी जुळली आहे नव्या पिढीची नाळ

By  
on  

जुन्या मराठी मालिकांचा उल्लेख होईल तेव्हा ‘अग्निहोत्र’ या रहस्यमय मालिकेचा उल्लेख अपरिहार्य आहे. दिग्गज कलाकार, उत्तम कथेची गुंफण आणि तितकंच उत्तम दिग्दर्शन अश्या गोष्टी जुळून आल्यामुळे ‘अग्निहोत्र’ मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली.  या मालिकेने स्वत:चा असा खास प्रेक्षक वर्ग तयार केला. 

 

 

आता तब्बल १० वर्षांनंतर ‘अग्निहोत्र' या लोकप्रिय मालिकेचा पुढचा भाग नव्या कथेसह स्टार प्रवाहवर सुरु होतेय. या मालिकेचा टीजर नुकताच समोर आला आहे. या टीजरमध्ये राजन भिसे, रश्मी अनपट, अनुराधा राजाध्यक्ष आणि शरद पोंक्षे हे कलाकार समोर येत आहेत. अग्निहोत्रच्या पहिल्या भागात मोहन आगाशे, विनय आपटे, मुक्ता बर्वे, सुहास जोशी, सिद्धार्थ चांदेकर, शुभांगी गोखले, विक्रम गोखले, गिरीश ओक, मोहन जोशी, सई ताम्हणकर याशिवाय शरद पोंक्षे हे मातब्बर कलाकार होते. 

 

 

मलिकेचा नवा सीझन नव्या पिढीसह सुरु होत आहे. त्यामुळे या सीझनमध्ये कोण कोण कलाकार असणार याची उत्सुकताही वाढली आहे. या मालिकेत रश्मी अनपट मुख्य भूमिकेत दिसणार असल्याचं समोर येत आहे. रश्मी या मालिकेविषयी खुप उत्साहात आहे. तिने म्हणते, ‘दोन वर्षांच्या गॅपनंतर मी पुन्हा प्रेक्षकांसमोर येणार आहे. अग्निहोत्र २ मध्ये काम करण्याची संधी मिळणं ही माझ्यासाठी खूप मोठी संधी आहे. या मालिकेत मी अक्षरा ही व्यक्तिरेखा साकारतेय.

 

 

 

अतिशय शांत, साधी सरळ आणि आपल्या तत्वांशी ठाम असणारी ही मुलगी आहे. अक्षराच्या वडिलांच्या बाबतीत एक घटना घडलीय ज्याचा संबंध वाड्याशी आहे. अक्षराला पडलेल्या याच प्रश्नांची उत्तर शोधण्यासाठी ती अग्निहोत्री वाड्यात येणार आहे. ही गोष्ट नव्या पिढीची असल्यामुळे पहिलं पर्व जरी प्रेक्षकांनी पाहिलेलं नसलं तरी हरकत नाही.’ आता नव्यापिढी समोर वाड्याचं कोणतं रहस्य समोर येणार याची उत्सुकता प्रत्येकाला आहे. ही मालिका 2 डिसेंबर पासून रात्री 10 वाजता रसिकांच्या भेटीला येत आहे.

Recommended

Loading...
Share