बिग बॉस फेम या जोडीच्या वेबसिरीजला मिळतोय रसिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

By  
on  

अभिनेता पुष्कर जोग आणि सई लोकूर यांच्या सनम हॉटलाईन या वेब सीरिजला प्रेक्षकांचा दमदार प्रतिसाद मिळत आहे. हंगामा डिजिटल मीडियाच्या 'हंगामा प्ले' या प्लॅटफॉर्मवर मराठी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये ही सीरिज लाँच करण्यात आली आहे.

कॅफेमराठी स्टुडीओजने या वेब सीरिजची निर्मिती केली आहे. तर आकाश गुरसाले यांनी या वेबसीरिजचं दिग्दर्शन केलं आहे. पुष्कर जोग आणि सई लोकूर यांच्यासह ज्येष्ठ अभिनेते विनय येडेकर, उदय नेने यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. अतिशय धमाल असं कथानक या वेब सीरिजमध्ये दाखवण्यात आलं आहे. इशान (पुष्कर जोग) आणि त्याचा मित्र अभिजीत (उदय नेने) यांना कॉल सेंटरमधली नोकरी गमवावी लागते. त्यानंतर काहीतरी रोमांचक करण्यासाठी हे दोघे सनम हॉटलाईन ही अडल्ट हॉटलाईन सुरू करतात. ग्राहकांच्या कल्पना आणि इच्छांचे समाधान तंत्रज्ञानाच्या साह्याने करणारी ही सेवा असते. शिवानी (सई लोकूर) ही दोघांची सहकारी आणि इशानची प्रेयसी ही या मित्रांच्या लहानशा स्टार्टअपमध्ये सहभागी होते. त्यांच्या छोटेखानी व्यवसायाला मिळणाऱ्या यशाचा आनंद फार काळ टिकत नाही. त्यांच्या काही ग्राहकांना खंडणीसाठी कॉल येऊ लागतात. तिघांच्या आयुष्याला विनोदी कलाटणी मिळते. सनम हॉटलाईनचे ग्राहक खंडणी जाळ्यात अडकत जातात आणि पुढे काय होते हे जाणून घेण्यासाठी ही वेब सीरिज पहावी लागेल. वेब सीरिज लाँच झाल्यानंतर प्रेक्षकांचा दमदार प्रतिसाद लाभतो आहे.

कॅफे मराठी स्टुडीओजचे सह-संस्थापक आणि सीईओ निखिल रायबोले म्हणाले की, “कॅफेमराठी’मध्ये आम्ही मनोरंजक आणि प्रेक्षकांना गुंतवून ठेवणाऱ्या वेब सीरिजची निर्मिती करत आहोत. ‘सनम हॉटलाईन’ ही विनोदी ढंगाची वेब सिरीज आहे. त्यामुळेच वेबसिरीज प्रेक्षकांना आवडते आहे. मराठी मनोरंजन क्षेत्रातील काही नामवंत कलाकारांनी उत्तम भूमिका साकारल्या आहेत."

Recommended

Loading...
Share